चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० डिसेंबर २०२०

Date : 10 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पोस्टाच्या बचत खात्यात आजपासून ‘ही’ किमान रक्कम ठेवाच; अन्यथा भरावा लागेल दंड :
  • जर तुम्ही पोस्टाचे ग्राहक आहात आणि पोस्ट कार्यालयात तुमचं बचत खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता बँकेप्रमाणं तुम्हाला पोस्टाच्या बचत खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक असणार आहे. ११ डिसेंबर २०२० पासून म्हणजेच उद्यापासून हा नवा नियम देशभरात लागू होणार आहे. तसेच जर तुम्ही ही किमान रक्कम खात्यात राखू शकला नाहीत तर तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.

  • भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, कोणत्याही बचत खात्यावर आता ग्राहकांना किमान ५०० रुपये बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर ग्राहकानं ही किमान रक्कम बचत खात्यात ठेवली नाही तर त्याला १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच जर खात्यातील रक्कम ही शून्य झाली तर ग्राहकाचं खात बंदही केलं जाऊ शकतं.

  • भारतीय पोस्टाकडून विविध छोट्या बचत योजना दिल्या जातात. यांनाच पोस्ट ऑफिस सेविंग्ज स्किम्स असं संबोधलं जातं. यामध्ये पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) या योजनांचा समावेश आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन :
  • प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ४७ वर्षांचे होते. गुरुवार( १० डिसेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘देऊळ बंद’, ‘पाऊलवाट’ अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

  • नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

  • सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

पहिल्या शंभर दिवसात अमेरिकेतील १० कोटी लोकांचे लसीकरण - बायडेन :
  • अमेरिकेतील लोकांना मुखपट्टी वापरणे अनिवार्य करू, तसेच पहिल्या १०० दिवसात १० कोटी लोकांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येईल, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले.

  • करोना दलात आम्ही समाविष्ट केलेले तज्ज्ञ हे अनुभवी असून ते देशाला आरोग्य व आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर काढतील असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील बहुतांश शाळा सुरू करण्यात येतील असे सांगून ते म्हणाले,की करोनातून मार्ग काढण्यासाठी आम्ही ट्रम्प प्रशासनाला ताबडतोबीने फायझर व मॉडर्ना कंपनीशी लस खरेदीच्या वाटाघाटी सुरू करण्यास सांगितले आहे. अमेरिकेतील लोकांसाठी पुरेसे लस उत्पादन करण्यात येणार आहे.

  • करोना पेचप्रसंग आटोक्यात आणला जाईल. आमचा चमू किमान १० कोटी लोकांचे पहिल्या शंभर दिवसात लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जर अमेरिकी काँग्रेसने निधी दिला, तर विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचे करोनापासून संरक्षण करणे सोपे जाणार आहे. निधी मिळताच पहिल्या शंभर दिवसात शाळा सुरू केल्या जातील. मुखपट्टय़ा, लसीकरण व शाळा सुरू करणे ही पहिल्या शंभर दिवसात आमची उद्दिष्टे असतील.

ऑनलाइन महामेळाव्यातून रोजगार :
  • पालघर : राज्यात येत्या १२ आणि १३ डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पालघर जिल्हयासह राज्यातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरणार आहेत.

  • अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

  • यामध्ये राज्यातील विविध उद्योग व व्यवसायांना नववी उत्तीर्ण पासून दहावी, बारावी, आय टी आय, पदविधर, डिप्लोमा तसेच बी. ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान ६५ ते ७० हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक युवक-युवतींनी दिनांक १३ डिसेंबर २०२० पर्यत पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा :
  • चेसमेन रत्नागिरी आणि के.जी.एन. सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणारी रामचंद्र सप्रे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा या वर्षी करोनाच्या साथीमुळे ऑनलाइन पद्धतीने ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

  • या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष असून Lichess.org संकेतस्थळावर ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनानुसार एकूण तीन गटांत घेण्यात येणार आहे. यंदा स्पर्धकांना विनाशुल्क  स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय गुणांकन २००० व त्यापेक्षा जास्त असलेले  खेळाडू पहिल्या गटात (अ), आंतरराष्ट्रीय गुणांकन २०००च्या खाली असलेले दुसऱ्या (ब), तर १५०० गुणांकनाखालील खेळाडू तिसऱ्या गटामध्ये (क) सहभागी होऊ शकतात, अशी माहिती चैतन्य भिडे यांनी दिली.

  • क-गटाची स्पर्धा ११ डिसेंबरपासून, ब-गटाची स्पर्धा १८ डिसेंबरपासून आणि अ-गटाची स्पर्धा २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रत्नागिरीच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून खास जिल्हास्तरीय बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

१० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.