चालू घडामोडी आणि दिनविशेष - १० ऑगस्ट २०२१

Date : 10 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“सुवर्ण पदक संपूर्ण देशाचं आहे”, नीरज चोप्राने व्यक्त केल्या भावना :
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. “ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं.

  • ‘मी कांस्य पदकाची लढत गुडघ्याच्या कॅपशिवाय खेळलो. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असती तर मला विश्रांती घ्यावी लागली असती. मात्र ही लढत माझं आयुष्य बदलणारी होती. मी माझं सर्वोत्तम दिलं.” असं कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सांगितलं.

कॅनडात जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का; प्रवासासाठी बंदीची मुदत आणखी वाढली : 
  • कॅनडात जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. कॅनडाने भारतीय प्रवाशांसाठीची बंदीची मुदत आणखी वाढवली आहे. कॅनडाने भारतातील उड्डाणे २१ सप्टेंबरर्यंत स्थगित केली आहेत. करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन कॅनडाने हा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात येत आहे. कॅनडाने आपल्या नागरिकांना पुढील सूचना येईपर्यंत करोनाचा धोका लक्षात घेऊन देशाबाहेर प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

  • कॅनडाच्या परिवहन मंत्रालयाच्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाने भारतातून येणाऱ्या प्रवासी उड्डाणांवर लादलेली बंदी वाढवण्यात आली आहे. कॅनडाने भारतातून येणाऱ्या प्रवासी उड्डाणांवरील बंदी २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कॅनडाने लादलेली ही बंदी २१ ऑगस्ट रोजी संपणार होती, पण तेथील सरकारने आता ही बंदी २१ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे.

  • करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी कॅनडामध्ये पहिल्यांदा बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी पाचव्यांदा वाढवण्यात आली आहे. १९ जुलै रोजी कॅनेडियन सरकारने २१ ऑगस्ट पर्यंत परदेशी उड्डाणांवरील बंदी वाढवली होती. या व्यतिरिक्त, भारतातून कॅनडाला जाणाऱ्या लोकांना तिसऱ्या देशात करोनाची मोलेक्युलर चाचणी करावी लागत आहे. तो नकारात्मक असेल तरच त्याला कॅनडामध्ये प्रवेश दिला जात आहे. जर आधी प्रवास करणाऱ्यांना करोना झाला असेल तर त्यांना त्यांच्या प्रवासाच्या १४ ते ९० दिवस आधी चाचणी घ्यावी लागत आहे आणि हे तिसऱ्या देशात करावे लागत आहे.

पंतप्रधान करणार उज्ज्वला योजना-२ चे लोकार्पण; लाभार्थ्यांना मिळणार मोफत स्टोव्ह, LPG रिफिल :
  • केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन पुरवण्याची योजना उज्ज्वला उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी नवीन पॅकेजिंगसह पुन्हा सुरू करणार आहे. पंतप्रधान मोदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एलपीजीची ही सुविधा महोबा येथून आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करतील. या दरम्यान, ते या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेची सुरुवात करणार आहेत. उज्ज्वला २.० अंतर्गत लाभार्थीला मोफत गॅस कनेक्शन तसेच स्टोव्ह आणि पहिल्यांदाच भरलेले सिलेंडरही मिळेल.

  • या कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील. उज्ज्वला योजना आणि जागतिक जैवइंधन दिनानिमित्त एक लघुपटही दाखवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृतसर, देहरादून, इंफाळ, उत्तर गोवा आणि गोरखपूर येथे प्रत्येकी एका महिला लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. त्यानंतर ते कार्यक्रमाला संबोधित करतील.

  • उज्ज्वला योजना २०१६  मध्ये सुरु करण्यात आली. या दरम्यान, दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांतील पाच कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानंतर, एप्रिल २०१८ मध्ये महिला लाभार्थ्यांच्या आणखी सात श्रेणींचा समावेश करण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्यात आला. ८ कोटी एलपीजी कनेक्शनचे उद्दिष्टही वाढवण्यात आले. हे लक्ष्य ऑगस्ट २०१९ मध्ये अगोदर पूर्ण झाले होते.

रशियानं मानले भारताचे आभार :
  • १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारले आहे. त्यानुसार सोमवारी सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या सागरी सुरक्षेवर डिजिटल माध्यमाद्वारे चर्चा केली.

  • सागरी सुरक्षा सहकार्याचा जागतिक आराखडा ज्या आधारे तयार करता येऊ शकेल, अशी सागरी व्यापारातील अडथळे दूर करणे आणि वादांबाबत शांततापूर्ण तोडगा काढणे यांसह पाच तत्त्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत अध्यक्षपदावरून बोलताना मांडली.

  • ‘एन्हान्सिंग मेरिटाईम सिक्युरिटी- ए केस फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन’ या विषयावरील चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवताना दूरसंवादाद्वारे केलेल्या निवेदनात मोदी यांनी सागरी मार्गाचा दहशतवाद आणि चाचेगिरीसाठी दुरुपयोग होत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. महासागर हे जगाचा सामायिक वारसा असून, सागरी मार्ग हे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेखा आहेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन :
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

  • भाजपचे लोकसभेतील खासदार गोपाल शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मेघवाल यांनी सांगितले, की या विषयावर विचार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.

  • केंद्र सरकारकडून आतापर्यंत देशातील तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय विचाराधीन असून त्याबाबत वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. केंद्र सरकार त्याबाबत सकारात्मक आहे असे मंत्री मेघवाल यांनी लोकसभेत बोलताना नमुद केले आहे.

  • लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली. त्या वेळी सभागृहात विरोधकांकडून पेगॅसस पाळत प्रकरण आणि इतर प्रश्नांवरून  गोंधळ सुरू होता. कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ती १५०० ते २००० वर्षे जुनी आहे हे ऐतिहािक पुराव्यांच्या मदतीने सिद्ध करावे लागते. त्या भाषेची मूळ परंपरा पाहिली जाते. ती एखादी भाषा बोलणाऱ्या समुदायाकडून उचललेली नाही किंवा त्याची नक्कल नाही हेही शोधावे लागते.

१६ ऑगस्टपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार :
  • करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे  सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. ११ प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • १६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.  राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेळ केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

  • अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पुर्व तयारी आता सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरावाठी १३ ऑगस्टपासून तात्पुर्ती नोंदणी करता येणार आहे. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. त्याच वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थलावर जाहीक करण्यात येईल.

१० ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.