चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ मे २०२१

Date : 9 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘या’ ४ राज्यांतील करोना स्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत करोनास्थितीचा आढावा घेत आहेत. करोना संदर्भातील उपाययोजना आणि समस्या जाणून घेत आहेत. करोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत असून प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब, कर्नाटक, बिहार आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.

  • गेल्या २४ तासात कर्नाटकात ४७,५६३, बिहारमध्ये १२,९४८, पंजाबमध्ये ९,०४२ आणि उत्तराखंडमध्ये ८,३९० रुग्णांची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला होता. महाराष्ट्र करोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्ध सक्षमपणे लढा देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.

चीनचं ‘ते’ सर्वात मोठं रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले अवशेष :
  • चीनच्या सर्वात मोठ्या रॉकेटचे अवशेष रविवारी हिंद महासागरात पडले असून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाल्याचं वृत्त चीनी माध्यमांकडून देण्यात आलं आहे. हे अवशेष कुठे पडतील याचं अनुमान बांधण्याचे दिवस संपल्याचं आता सांगण्यात येत आहे. चीनच्या अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाच्या मदतीने चीनच्या माध्यमांनी मालदीव बेटांच्या पश्चिमेला या अवशेषांमुळे महासागरात होणाऱ्या परिणामाबद्दल माहिती दिली आहे.

  • २९ एप्रिल रोजी या लाँग मार्च 5B रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर काही लोकांनी या अवशेषांना आाकाशातून पडताना पुसटसं पाहिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चीनच्या अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यावर या रॉकेटचे बरेचसे अवशेष जळून खाक झाले आहेत. चीनच्या माध्यमांच्या म्हणण्यानुसार, या रॉकेटने सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.

  • अमेरिकेच्या अंतराळ संस्थेकडून हे अवशेष पेनिन्सुलामध्ये सापडल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र, या अवशेषांमुळे जर जमीन किंवा पाण्यावर काही परिणाम झाला तर हे अवशेष अज्ञात असणार आहेत.

डीआरडीओ’च्या करोनाप्रतिबंधक औषधाला मान्यता :
  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या  ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. ते तोंडावाटे घ्यावयाचे आहे.

  • ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) हे औषध रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व कमी करत असल्याचे  नैदानिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

  • देश करोना महासाथीच्या लाटेशी झुंजत असताना आणि यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला असताना या औषधाला मंजुरी मिळालेली आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली ‘ही’ विनंती :
  • लसीकरण अॅपवर नोंदणीपासून लसीची पहिली मात्रा घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचं चित्र आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यास अडचणी आहेत.

  • करोना लसीकरणासाठी तयार करण्यात अॅपमुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवं अॅप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.

  • देशात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. मात्र लसींचा अपुरा पुरवठा आणि कोविन अॅप हाताळताना येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक वैतागले आहेत. अनेक ठिकाणी नोंदणी असूनही लस नसल्याने माघारी परतावं लागत आहे. काही ठिकाणी सर्वर डाऊन असल्यामुळेही गोंधळ उडाला आहे.

माजी हॉकीपटू-प्रशिक्षक कौशिक यांचे करोनामुळे निधन :
  • भारताचे माजी हॉकीपटू आणि प्रशिक्षक एम. के. कौशिक यांचे शनिवारी करोनामुळे निधन झाले. गेले तीन आठवडे त्यांची करोनाशी झुंज सुरू होती. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.

  • १९८०मधील मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे कौशिक सदस्य होते. १७ एप्रिलला करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  प्रकृती ढासळल्याने शनिवारी सकाळी कौशिक यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. परंतु सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • कौशिक यांनी भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. भारताच्या पुरुष संघाने कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक कमावले होते. तसेच महिला संघाने २००६मध्ये आशियाई क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक मिळवले. कौशिक यांनी १९९८मध्ये अर्जुन, तर २००२मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त केला.

सीमाला सुवर्णपदक :
  • टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने शनिवारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

  • इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने २९ वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले. २०१९मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते.

  • ग्रीको-रोमनमध्ये भारताची पाटी कोरी - जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेमधील ग्रीको-रोमन प्रकारात शनिवारी भारताची पाटी कोरी राहिली. त्यामुळे एकाही मल्लाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान निश्चित करता आली नाही. भारताला गुरप्रीत सिंगकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु ७७ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात त्याचे आव्हान संपुष्टात आले.

  • युरोपियन विजेत्या रफिग हुसेयनोव्हने (अझरबैजान) त्याचा ४८ सेकंदांत पराभव केला. हुसेयनोव्हने सुरुवातीलाच चार गुण मिळवले. त्यानंतर गुरप्रीत सावरण्याच्या आताच त्याने आणखी चार गुणांची कमाई करीत पहिल्याच सत्रात सामना जिंकला. गेल्या महिन्यात आशियाई पात्रता कुस्ती स्पध्रेत कांस्यपद मिळवणाऱ्या गुरप्रीतला पहिल्याच लढतीत पुढे चाल देण्यात आली होती.

०९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.