चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ मे २०२०

Date : 9 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदच्या विजयामुळे भारत पाचव्या स्थानी :
  • माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नेशन्स चषक सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. परंतु तिसऱ्या दिवसाच्या पाचव्या फेरीत रशियाने बरोबरीत रोखले. मग सहाव्या फेरीत अमेरिकेने भारताला २.५-१.५ अशा फरकाने नामोहरम केले असले तरी भारताला पाचवे स्थान गाठता आले आहे.

  • पाचव्या फेरीत ५० वर्षीय आनंदने रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोमनियाचशीला फक्त १७ चालींत पराभूत केले. मग बी. अधिबान आणि द्रोणावल्ली हरिका यांनी अनुक्रमे सर्जी कर्जकिन आणि ओल्गा गिर्या यांना बरोबरीत रोखले. परंतु व्लादिस्लाव्ह आर्टेमीव्हने पी. हरिकृष्णाला पराभूत केल्यामुळे रशियाला सामन्यात २-२ अशी बरोबरी साधता आली.

  • अमेरिकेविरुद्धच्या सहाव्या फेरीत आनंद, विदीत गुजराती आणि कोनेरू हम्पी यांनी अनुक्रमे हिकारू नाकामुरा, फॅबिओ कारूआना आणि इरिना कृश यांच्याशी बरोबरी साधली, मात्र वेस्ली सो याच्याकडून अधिबानला दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताचा पराभव झाला.

CBSC बोर्डाच्या १० वी १२ वीच्या परीक्षा १ जुलैपासून :
  • CBSC बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या ज्या परीक्षा लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या या परीक्षा आता १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. ट्विटवर एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

  • सीबीएससी बोर्ड १० आणि १२ वीच्या उर्वरित परीक्षा घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आता ही घोषणा करण्यात आली आहे.

  • मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकाडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत.

टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास वर्षाअखेरीस आयपीएल शक्य :
  • देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे.

  • यासाठीच स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद आहेत. आयसीसीलाही याचा मोठा आर्थिक फटका बसतोय.

  • वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मध्यंतरी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा खेळवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मात्र आयसीसीच्या बहुतांश सदस्यांचा याला विरोध असल्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल असे संकेत मिळतायत. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करु शकतं. याविषयीवर बीसीसीआय अधिकाऱ्यांची टेलिकॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५६ हजार ३४२ वर :
  • गेल्या चोवीस तासांमध्ये ३,३९० नव्या करोना रुग्णांची भर पडली असून देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ५६,३४२ झाली असून १,८८६ मृत्यू झाले आहेत. १६,५३९ रुग्ण बरे झाले आहेत. रुण बरे होण्याचे प्रमाण २९.३३ टक्के इतके झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांपैकी ४.७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

  • ३.२ टक्के रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. १.१ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. देशातील २१६ जिल्हे करोनामुक्त असून ५२ जिल्ह्य़ांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. २७ जिल्ह्य़ांमध्ये २१ दिवस तर, ३७ जिल्ह्य़ांमध्ये १४ दिवसांमध्ये, ६९ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

  • तर दुसरीकडे महाराष्ट्रात १०८९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ६३ इतकी झाली आहे. मागील २४ तासात ३७ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत ३ हजार ४७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

“२०२० संपेपर्यंत Work From Home करा”; फेसबुक, गुगलने दिली कर्मचाऱ्यांना मुभा :
  • करोनाचा प्रादुर्भाव जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. या कंपन्यामध्ये अगदी गुगल आणि फेसबुकसारख्या बड्या कंपन्यांच्याही मसावेश आहे. आता या दोन कंपन्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० संपपर्यंत घरुन काम करण्याची मुभा देणार आहेत. लवकरच दोन्ही कंपन्या यासंदर्भातील औपचारिक घोषणा करणार असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

  • फेसबुक ६ जुलैपासून आपली सर्व कार्यालये पुन्हा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे प्रवक्त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितले आहे. मात्र असं असलं तरी ज्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची इच्छा आहे ते घरुन काम करु शकतात अशी मुभा देण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात सर्व नियोजन झाले असून कंपनीचा संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झकेरबर्ग याबद्दलची घोषणा करु शकतो.

  • ‘द व्हर्ग’मधील वृत्तानुसार फेसबुकने हा निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार केला आहे. आरोग्य यंत्रणांनी दिलेला इशारा, सरकारने दिलेला इशारा या सर्वांचा विचार करुन कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कार्यलयातून काम करण्यासंदर्भात परवानगी देऊ शकते. सध्या तरी कंपनीचे अनेक कार्मचारी हे घरुनच काम करत आहेत. याआधीच फेसबुकने २०२१ पर्यंतचे सर्व इव्हेंट रद्द करण्याची घोषणा केली आहे.

०९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.