चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ मार्च २०२०

Date : 9 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा रद्द : 
  • जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारा व हजारो जणांचा जीव घेणारा करोना व्हायरस हळूहळू सर्वत्र पसरत आहे. जगभरातील अनेक देश या वरील उपचार शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदी यांनी आपला बांगलादेश दौरा रद्द केला आहे.  १७ मार्च रोजी ते ढाका येथे शेख मुजीबुर रहमान यांच्या जयंती शताब्दी कार्यक्रमासाठी जाणार होते.

  • बांगलादेश सरकारनेही  करोनाचा धोका लक्षात घेता शेख मुजीबुर रहमान यांचा जयंती शताब्दी समारोह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर पंतप्रधान मोदींनी करोनामुळे आपला ब्रुसेल्स दौरा रद्द केला होता.

  • केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून देशातील रुग्णांची संख्या आता ३९ झाली आहे. या कुटुंबातील तिघांनी अलीकडेच इटलीला भेट दिली होती. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी या रुग्णांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, पण जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.

‘महाराष्ट्र श्री’शरीरसौष्ठव स्पर्धा - महेंद्र चव्हाण ‘महाराष्ट्र-श्री’ : 
  • सातारा : यंदाच्या ‘महाराष्ट्र-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत अनुभवी महेंद्र चव्हाण विजयी ठरणार की जबरदस्त तयारीत असलेला अनिल बिलावा वरचढ ठरणार, याकडे तमाम शरीरसौष्ठवप्रेमींचे लक्ष लागले होते. दोघांमध्येही कडवी चुरस रंगलेली असताना पुण्याच्या महेंद्र चव्हाणने आपल्या अनुभवाच्या जोरावर ‘महाराष्ट्र-श्री’ किताब आपल्या नावावर केला.

  • सातारा येथील तालीम संघाच्या मैदानावर रविवारी रात्रीपर्यंत रंगलेल्या ‘महाराष्ट्र-श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सातारकरांनी तोबा गर्दी केली होती. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धेचा थरार उत्तरोत्तर रंगत गेला. गटविजेत्यांपैकी बिलावा, महेंद्र, रसेल दिब्रिटो आणि नीलेश दगडे यांना किताबाचा मानकरी मानले जात होते. पण खरी चुरस रंगली ती महेंद्र आणि बिलावामध्ये.

  • अखेरच्या क्षणी पंचांनी दोघांची तुलना करण्याचे ठरवल्यानंतर यापैकीच एक विजेता होणार, हे जवळपास निश्चित झाले होते. चाहत्यांचा कौल बिलावाच्या बाजूने असला तरी पंचांनी मात्र महेंद्रच्या गळ्यात विजेतेपदाची माळ घातली. त्यामुळे तब्बल चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या महेंद्रचे ‘महाराष्ट्र-श्री’ पटकावण्याचे स्वप्न अखेर साकारले.

‘येस बँके’वरून भाजप-काँग्रेस वाक्युद्ध : 
  • येस बँकेतील पेचप्रसंगावरून रविवारी भाजप व काँग्रेस यांच्यात वाग्युद्ध झडले. सत्ताधारी भाजपने घोटाळ्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी जोडला; तर बँकेची कर्जे अनेक पटींनी वाढत असताना पंतप्रधान व अर्थमंत्रीही यात ‘गुंतलेले’ होते काय, असा प्रश्न काँग्रेसने विचारला.

  • अटक करण्यात आलेले येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांच्याकडून एक चित्र खरेदी केले होते, या एका वृत्तवाहिनीच्या वृत्ताची चित्रफीत ट्विटरवर पोस्ट करून, भारतातील प्रत्येक आर्थिक गुन्ह्य़ाचा गांधी कुटुंबांशी ‘सखोल संबंध’ असतो, असा आरोप भाजपच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी केला.

  • ‘मल्या हे सोनिया गांधी यांना विमानाची अपग्रेड तिकिटे पाठवत असत. मनमोहन सिंग आणि पी. चिदम्बरम यांच्यापर्यंत पोहोचू शकणारे मल्या फरार आहेत. राहुल यांनी ज्या नीरव मोदी यांच्या ‘ब्रायडल ज्वेलरी कलेक्शन’चे उद्घाटन केले होते, त्यांनी कर्जे बुडवली आहेत. राणा यांनी प्रियंका वढेरा यांच्याकडून चित्रे खरेदी केली आहेत.

  • भारतातील प्रत्येक आर्थिक गुन्ह्य़ाचा गांधी कुटुंबांशी सखोल संबंध आहे,’ असे ट्वीट मालवीय यांनी केले. काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला. प्रियंका गांधी यांनी एम. एफ. हुसेन यांचे चित्र कपूर यांना २ कोटी रुपयांना विकले होते आणि ही रक्कम त्यांच्या २०१० सालच्या प्राप्तिकर विवरणात दाखवण्यात आली होती, असे पक्षाने सांगितले. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्या वेळी, म्हणजे मार्च २०१४ मध्ये येस बँकेची कर्जे ५५,६३३ कोटी रुपये होती; ती मार्च २०१९ मध्ये २,४२,४९९ कोटी रुपयांवर गेली.

करोना तपासणीसाठी देशात ५२ प्रयोगशाळा : 
  • नवी दिल्ली : करोना रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात आणखी ५२ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५७ प्रयोगशाळा या रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत त्यामुळे तपासणी व निदानाची सुविधा वाढणार आहे. दरम्यान देशातील निश्चित रुग्णांची संख्या आता ३४ झाली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीओव्हीआयडी १९ विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याने आणखी  ५२  प्रयोगशाळांत नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून  ५७ प्रयोगशाळांत नमुने संकलित करण्याची सोय करण्यात आली आहे.

  • ६ मार्चअखेर एकूण ३४०४ जणांचे एकूण ४०५८ नमुने गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात वुहानमधून आलेल्या ६५४ जणांच्या १३०८ नमुन्यांचा समावेश आहे. या लोकांना आयटीबीपी छावणी, मनेसर छावणी येथे ठेवण्यात आले होते. दिवस शून्य व दिवस १४ या दोन दिवशी त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. वुहान, डायमंड प्रिन्सेस जहाज येथून आणलेल्या भारतीयांची तपासणी दिवस शून्य रोजी करण्यात आली आहे. आता १४ दिवसांनी पुढची तपासणी केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना आवाहन : 
  • भारतात कोरोना विषाणूचा संसर्गाचे ३२ संशयीत रुग्ण आढळल्याचे शनिवारी निश्चित झाले. जगभरात या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असताना देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

  • यासंदर्भातील देशातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मोदींनी शनिवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे आणि इतर उच्चाधिकारी उपस्थित होते.

  • मोदी अधिकाऱ्यांना म्हणाले, कोरोनाचे संशयीत रुग्ण सापडल्याच्या जागा निश्चित करा आणि अशा संशयीतांना वेगळं ठेवण्यासाठी पुरेशा सुविधा तयार करा. त्याचबरोबर जर हा विषाणू पसरण्याची भीती असल्यास त्या ठिकाणी अतिदक्षता विभागाची निर्मितीही करा.

  • बैठकीत उपस्थित मंत्र्यांशी बोलताना मोदी म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करु नये याबाबत सतर्क रहण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशानं तयार राहण गरजेच आहे. यासाठी अॅडव्हान्स आणि पुरेसे नियोजन गरजेचे आहे. त्याचबरोबर जर कोणाची गंभीर परिस्थिती असेल तर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याला वेळेवर प्रतिसाद देण्याचे आदेशही मोदींनी यावेळी दिले.

०९ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.