चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जुलै २०२१

Updated On : Jul 09, 2021 | Category : Current Affairs


राज्यातील शिक्षण सेवकांची ६ हजार १०० पदे भरण्यास हिरवा कंदिल :
 • राज्यातील सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 • राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय :
 • केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली.

 • दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे.

 • “रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालयं आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी जे नारायण यांनी दिली आहे.

अमेरिकेत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात सादर करा :
 • नव्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) नियमावलींचे ट्विटरकडून उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्र सरकारला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचा निर्वाळा गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. त्याचप्रमाणे नव्या आयटी नियमांचे पालन करण्यात आले असल्याचे अमेरिकेत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने ट्विटरला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

 • त्यामुळे नियमांचे पालन न केल्याबद्दल किंवा नियमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई केल्याबद्दल केंद्र सरकार ट्विटरविरुद्ध कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून नव्या नियमावलीवरून संघर्ष सुरू आहे. तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती, ट्विटरवर कोणताही संदेश टाकणाऱ्या व्यक्तीची माहिती यावरून संघर्ष सुरू आहे.

 • नव्या आयटी नियमांनुसार ट्विटरने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनाही नियमांचे पालन करण्यात आले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्या. रेखा पल्ली यांच्या पीठाने दिले आहेत. नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्याची विनंती ट्विटरने केली. त्यानुसार त्यांना मुदत देण्यात आली आहे. अमेरिकेत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत देण्याची विनंती ज्येष्ठ वकील साजन पुवय्या यांनी केली. त्यानंतर न्या. पल्ली यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.

देशात करोनाचे आणखी ४५,८९२ नवे रुग्ण :
 • ४५,८९२ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख नऊ हजार ५५७ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली असून ती चार लाख ६० हजार ७०४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ८१७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख पाच हजार २८ वर पोहोचली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

 • उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या १.५० टक्के इतके असून करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात बुधवारी १८ लाख ९३ हजार ८०० चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची एकूण संख्या ४२ कोटी ५२ लाख २५ हजार ८९७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ जण करोनामुक्त झाले आहेत.

 • गेल्या २४ तासांत करोनामुळे ८१७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ३२६ जण महाराष्ट्रातील आहेत तर आतापर्यंत एकूण चार लाख पाच हजार २८ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख २३ हजार ८५७ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी :
 • टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवरील प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, असे ऑलिम्पिकमंत्री तामायो मारूकावा यांनी सांगितले.

 • सध्याची आणीबाणी रविवारी संपल्यानंतर लगेच सोमवारपासून लागू होणारी आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असेल. त्यामुळे ऑलिम्पिकचा २३ जुलैला होणारा उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्टचा समारोप सोहळा यांच्यापुढे आणीबाणीचे आव्हान असेल. दूरचित्रवाणीनुरूप ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांवर बंदी असेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद (आयओसी) आणि ऑलिम्पिक संयोजन समितीने जाहीर केले.

 • ‘‘करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.

आधीच्या मंत्र्यांशी चर्चा करा, न थकता काम करा; मोदींनी नव्या मंत्र्यांना सांगितली ‘काम की बात’ :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीमंडळ विस्तारानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी नवीन मंत्र्यांनी यापूर्वी त्यांना जबबादारी सोपवण्यात आलेल्या मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या नेत्यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. माजी मंत्र्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी ही भेट घ्यावी असं मोदींनी म्हटलं आहे.

 • मोदींनी सर्व मंत्र्यांना वक्तशीरपणे आणि न थकता लोकांसाठी काम करण्याचं महत्वही पटवून दिलं. वक्तशीर राहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थका काम करा अशी त्रिसुत्री मोदींनी या बैठकीमध्ये मंत्र्यांना सांगितली.

 • नवीन मंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पूर्वी ज्यांच्याकडे होती त्यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घ्यावा असं मोदींनी सुचवलं आहे. खास करुन सध्या जे नेते मंत्रीमंडळात नाही पण त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या त्यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला मोदींनी दिला.

 • “जे मंत्री आता मंत्रीमंडळात नाही त्यांनी आपल्या खात्याची जबाबदारी छान संभाळली होती. त्यांनी चांगलं काम केलेलं त्याचा फायदा नवीन मंत्र्यांनी करुन घ्यावा,” असं मोदी म्हणाल्याचं सुत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

०९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)