चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जुलै २०२०

Date : 9 July, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘भविष्य निर्वाहा’तील सवलतीला मुदतवाढ :
  • करोनाचा फटका बसलेले छोटे उद्योग आणि कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीची मुदत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट महिन्यांसाठी देखील निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, करोना काळात गरिबांना दिलेल्या विविध सवलती व मदत योजनांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. १०० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या छोटय़ा उद्योगांमध्ये ९० टक्के कर्मचाऱ्यांना १५ हजारांपेक्षा कमी वेतन असेल तर अशा कर्मचाऱ्यांना व कंपन्यांना ही सवलत दिली जात आहे.

  • नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी १२ टक्के हिस्सा कर्मचारी व तेवढाच निधी (१२ टक्के) कंपनीही भरत असते. मात्र गेले तीन महिने दरमहा भविष्य निर्वाह निधीचा २४ टक्के हिस्सा केंद्र सरकार भरत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात वेतनाची अधिक रक्कम मिळत असून कंपनीलाही गुंतवणुकीसाठी वा खर्चासाठी अतिरिक्त रक्कम उपयोगात आणणे शक्य झाले आहे. या सवलतीचा ३.६७ छोटे उद्योग व व्यावसायिकांना तसेच, ७२ लाख कर्मचाऱ्यांना फायदा झाला. मार्च ते जून या तीन महिन्यांसाठी ४ हजार ७६० कोटी रुपये केंद्र सरकारने भरले आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.

फिलीप बार्टन ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त :
  • भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तपदाची सूत्रे फिलीप बार्टन यांनी बुधवारी हाती घेतली. फेब्रुवारी महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदभार स्विकारण्यास त्यांना विलंब झाला.

  • बुधवारी एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात बार्टन यांनी आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द करीत सूत्रे हाती घेतली.

  • आपल्या आजवरच्या कारकीर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे बार्टन यांनी या वेळी सांगितले. दोन देशांतील हितसंबंध जोपासण्यासोबतच व्यापार आणि आर्थिक बाजू वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. दोन्ही

  • देश सुरक्षेच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करतील, अशी हमी त्यांनी दिली. ‘करोनासंकटकाळात मी ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे भान मला आहे. या कठीण काळात दोन्ही देशांच्या समन्वयातून करोनासाठी लस निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला जाईल. तसेच देशांच्या भरभराटीसाठी माझे योगदान राहील’, असे ते म्हणाले.

फेसबुक, ८९ अ‍ॅप्स काढून टाकण्याचे जवानांना निर्देश :
  • आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ८९ अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत, असे निर्देश लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

  • सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

शाळा सुरू करा अन्यथा…; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा :
  • जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेज अनेक सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जर शाळा सुरू केल्या नाही तर शाळांना देण्यात येणारा निधी रोखण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

  • सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वं अधिक कठोर असल्याची तक्रारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या तक्रारीनंतर काही वेळातच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली. तसंच करोनाच्या नियंत्रणासाठी आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील आठवड्यात नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार असल्याचंही माईक पेंस यांनी सांगितलं.

  • “पुढील आठवड्यात नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. नवी मार्गदर्शक तत्त्वे आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवतील. मार्गदर्शन अधिक कठोर नसावं अशी आमची इच्छा नसल्याचंही राष्ट्राध्यक्ष म्हणाले,” असं पेंस यांनी नमूद केलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांमी स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांवरही दबाव वाढवला आहे. परंतु अशा परिस्थितीतही न्यूयॉर्क शहर प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत ते आठवड्यात केवळ दोन किंवा तीनच दिवस शाळेत जातील आणि बाकीच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेतील, असं स्पष्ट केलं आहे.

०९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.