चालू घडामोडी आणि दिनविशेष - 09 फेब्रुवारी 2024

Date : 9 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शिक्षक भरतीमध्ये तांत्रिक अडचणी, पसंतीक्रम नोंदवण्यासाठी मुदतवाढ
  • राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील जागांसाठी पवित्र संकेतस्थळाद्वारे उमेदवारांचे पसंतीक्रम नोंदवण्यात येत आहेत. मात्र या संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान संकेतस्थळाला येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.
  • राज्यातील हजारो उमेदवारांचे शिक्षक भरतीकडे लक्ष लागले आहे. या भरती प्रक्रियेत नुकतीच एकूण २१ हजार ६७८ पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील दोन हजार ९५१ पदे, नगरपालिकांतील ४७७, नगर परिषदांतील एक हजार १२३, खासगी अनुदानित पाच हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह चार हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची पसंतीक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • संकेतस्थळाला येत असलेल्या अडचणींबाबत डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे संतोष मगर म्हणाले, की संकेतस्थळाला अडचणी येत आहेत. अनेकदा ‘एरर’ दाखवली जात आहे. त्यामुळे पसंतीक्रम नोंदवताना उमेदवार गोंधळून गेले आहेत. या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मदत केंद्र सुरू करावे, तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
  • २ लाख १७ हजार अभियोग्यताधारकांपैकी जवळपास १ लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पसंतीक्रम नमूद केले आहेत. एकावेळी जवळपास ७५ हजार वापरकर्त्यांचे लॉगिन होत असल्यामुळे संकेतस्थळ काही प्रमाणात संथ होत आहे. सर्वांना पसंतीक्रम नोंदवता येण्यासाठी अधिक वेळ मिळण्याच्या दृष्टीने १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
मनमोहन सिंग खासदारांसाठी प्रेरणास्रोत; पंतप्रधान मोदींचे प्रशंसोद्गार, राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना निरोप
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाबद्दल विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी राज्यसभेत कौतुक केले. मनमोहन सिंग हे खासदारांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत असल्याची प्रशंसा मोदींनी केली.
  • राज्यसभेतील सदस्यत्वाचा मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्यांच्यासह अन्य निवृत्त होणाऱ्या सदस्यांना गुरुवारी सदनाने निरोप दिला. त्यावेळी वरिष्ठ सभागृहात मोदींनी तत्कालीन पंतप्रधानांबद्दल गौरवोद्गार काढले. ते दीर्घायुषी व्हावेत आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहावेत अशी मी प्रार्थना करतो, असे मोदी म्हणाले.
  • दिल्ली सरकारच्या अखत्यारितील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार काढून घेणारे विधेयक गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने संसदेत मांडले होते. लोकसभेत सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्याने तिथे विधेयेक संमत होणारच होते. पण, राज्यसभेतही केंद्र सरकारने या विधेयकासाठी पुरेसे संख्याबळ उभे केले होते. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या विधेयकावर मतदान करण्यासाठी मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून सभागृहात आले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही ते व्हिलचेअरवर बसून आले होते. त्यातून त्यांची लोकशाहीवरील निष्ठा दिसते.
  • दिल्लीच्या विधेयकावेळी राज्यसभेतही सत्ताधारी आघाडीचा विजय होणार हे निश्चित असतानाही मनमोहन सिंग मतदानासाठी आले होते. वरिष्ठ सभागृहाचा सदस्य म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले होते. त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी आहे, असे मोदी म्हणाले. नेता म्हणून मनमोहन सिंग यांचे योगदान मोठे आहे. वैचारिक मतभेद असू शकतात पण, त्यांनी प्रदीर्घ काळ या सभागृहाला तसेच, देशाला मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक वेळी झालेल्या चर्चामधील त्यांचे योगदान स्मरणात राहील, असेही मोदी म्हणाले.
पाकिस्तानात मतमोजणी सुरू; मतदानादरम्यान मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद, तुरळक हिंसाचार
  • तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर कारवाई, मतदान हेराफेरीचे आरोप आणि तुरळक हिंसाचार यामुळे वादग्रस्त झालेल्या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानानंतर पाकिस्तानमध्ये मतमोजणी सुरू झाली. संशयित दहशतवादी हल्ले अयशस्वी करण्यासाठी सरकारने मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर संपर्क समस्या निर्माण झाली होती.
  • पाकिस्तानात आज सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही विरामाशिवाय सुरू राहिले. १२ कोटींहून अधिक मतदारांना मतदान करता यावे यासाठी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राच्या आवारात उपस्थित असलेल्या लोकांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली. मतदानाची टक्केवारी अद्याप कळू शकलेली नाही.
  • देशभरातून मतदान केंद्रांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. परंतु कोणत्याही मतदारसंघाचा संपूर्ण निकाल जाहीरा झालेला नाही.एकूण ३३६ पैकी २६६ नॅशनल असेंब्लीच्या जागांसाठी निवडणूक होती. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १३३ जागा जिंकणे आवश्यक आहे.
भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षेसाठी केंद्राचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, १९७० सालचा ‘हा’ करार केला रद्द
  • देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, भारत-म्यानमारच्या सीमेवर तब्बल १६४३ किमीचं कुंपण घालण्यात येणार आहे. आता त्याही पुढे जाऊन सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, फ्री मुव्हमेंट रिजीम (Free Movement Rigime) अर्थात ‘मुक्त संचार व्यवस्था’ करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • अमित शाहांनी यासंदर्भातील एक्सवर माहिती दिली. ते म्हणाले, देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय संरचना राखण्यासाठी भारत आणि म्यानमारमधील फ्री मूव्हमेंट रेजिम (FMR) रद्द करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने (MHA) घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालय सध्या ते रद्द करण्याच्या प्रक्रियेत असल्याने, MHA ने FMR तात्काळ निलंबित करण्याची शिफारस केली आहे.
  • काय आहे FMR?
  • भारत आणि म्यानमारदरम्यान १,६४३ किमींची सीमा असून या सीमेवर मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे चार राज्य आहेत. दोन्ही देशांनी १९७० साली मुक्त संचार व्यवस्थेचा (FMR) करार मान्य केला. यामुळे सीमाभागातील आदिवासी जमातींना दोन्ही देशांमध्ये १६ किमीपर्यंत व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, हा करार आता रद्द करण्यात आला आहे.  
  • म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्करात संघर्ष सुरू आहे. तसंच, नोव्हेंबर महिन्यात भारतात जवळपास ६०० लष्कर घुसले होते. याप्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. तसंच, सप्टेंबर महिन्यात मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयाला अवैध घुसखोरी रोखण्यासाठी एफएमआर प्रणाली रद्द कारवी, अशी शिफारस केली होती. म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. मणिपूरची म्यानमारशी ३९० किमी लांबीची सीमा आहे. यापैकी केवळ १० किमीच्या कुंफणाचे काम पूर्ण झाले आहे.
कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांनाही मुकणार?
  • भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तसेच अखेरच्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सूत्रांकडून बुधवारी सांगण्यात आले.
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेचा तिसरा सामना राजकोट येथे १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत, तर चौथा सामना रांची येथे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे. वैयक्तिक कारणास्तव कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांनाही मुकला होता. कोहलीचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नुकतेच आपल्या यूट्युब चॅनलवर कोहली आपल्या दुसऱ्या पाल्याच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले होते.
  • ‘‘क्रिकेटपटूंच्या कुटुंबाचा प्रश्न असतो, तेव्हा ‘बीसीसीआय’ ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असते. आता भारतीय संघात पुनरागमन कधी करायचे याबाबतचा निर्णय कोहलीच घेईल. सध्या तरी, तो या मालिकेत खेळेल असे वाटत नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • केएल राहुलही दुसऱ्या कसोटीला मुकला होता. परंतु तिसऱ्या कसोटीत त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. राहुल संघात परतल्यास रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाला वगळले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

“२००४ ते २०१४ हे देशाच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक, कारण…” काँग्रेसचा मोदींकडून समाचार

  • आज जगभरातले अनेक देश कठीण काळातून जात आहेत. अशात आपला देश प्रगतीपथावर आहे सगळ्या जगात आपला देश चांगली कामगिरी करतो आहे. मात्र काही निराशावादी लोक हे आजही निराशेतच बुडाले आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक होतं अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  • काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी - २००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. या दहा वर्षात महागाई डबल डिजिट झाली. त्यामुळेच काही चांगलं झालं की या लोकांची निराशा वाढते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली होती त्यांनी फक्त त्यासाठीचे कायदे तयार केले. बाकी काहीही केलं नाही. आम्ही बेरोजगारी दूर करण्यासाठी कायदा केला एवढं सांगितलं. २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातलं घोटाळ्यांचं दशक होतं.
  • देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशत पसरली होती - यूपीएची ती दहा वर्षे काश्मीर ते कन्याकुमारी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. अनोळखी वस्तूला हात लावू नका, आज इकडे स्फोट झाला, आज तिकडे स्फोट झाल्या अशाच बातम्या आल्या. २००४ ते २०१४ या कालावधीत हिंसाचाराचा कहर देशात माजला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला होता. यांच्या निराशेचं कारण हे देखील आहे की आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो आहे तेव्हा यांना वाईट वाटतं आहे.
  • या दशकात घोटाळे आणि हिंसा वाढली - आपला देश आधीही सामर्थ्यशाली होता. मात्र २००४ ते २०१४ हे दशक हे अत्यंत वाईट दशक होतं. प्रत्येक संधीला संकटात नेणारा तो काळ होता. टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे टूजी मध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले. भारताचं नाव या CWG घोटाळ्यांमुळे बदनाम झालं. जगात भारताची अब्रू गेली असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’

  • निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथे या पुरस्काराची घोषणा केली.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मुलाच्या व्रतबंधन सोहळय़ासाठी रेवदंडा येथे आले होते. या सोहळय़ादरम्यान त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नानासाहेब धर्माधिकारी यांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता आप्पासाहेबांसाठी पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्या अनुयायांनी रेवदंडा येथे फटाके फोडून जल्लोष केला. या पुरस्कारामुळे जाबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अप्पासाहेबांनी दिली, तर हा दुग्धशर्करा योग असल्याचे सचिनदादा धर्माधिकारी म्हणाले.
  • आप्पासाहेबांचे सामाजिक कार्य - आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजप्रबोधनाचे बाळकडू वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळाले. समाजप्रबोधनाला मानवी उत्थानाची जोड देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापना केले. बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्यांनी हाती घेतली. त्यास श्री सदस्यांनी हातभार लावला.
  • आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य प्रेरणादायी आहे. गेली अनेक वर्षे व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता आदी क्षेत्रात त्यांचे काम अव्याहतपणे सुरु आहे. त्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे या पुरस्काराची उंची आणखी वाढणार आहे.
  • एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री - सन २००८ मध्ये वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आता तो मलाही जाहीर झाल्याचा आनंद आहेच. पण, पुरस्कारांबरोबर जबाबदारीही येत असते. त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरु असलेले सामाजिक कार्य व्यापक प्रमाणात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

सर्वाधिक मूळ किंमत असलेल्या खेळाडूंत हरमनप्रीत, मानधना

  • महिला प्रीमियर लीगचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. स्पर्धेची आयोजनाचे स्थळ निश्चित झाल्यावर २४ तासांत लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची लिलावाची पद्धतीही निश्चित करण्यात आली असून, भारताच्या हरमनप्रीत, स्मृती मानधनासह २४ खेळाडूंची सर्वाधिक ५० लाख रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. महिला क्रिकेटपटूंचा १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतच लिलाव होणार असून, यामध्ये एकूण ४०९ खेळाडूंचा लिलाव होईल. लिलावासाठी १५२५ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. यातून मंगळवारी अंतिम खेळाडूंची यादी त्यांच्या मूळ किमतीसह निश्चित करण्यात आली.
  • या लीगदरम्यान महिलांची ट्वेन्टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असेल. भारत-पाकिस्तान सामना १२ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 
  • लिलावासाठी सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत मिळालेल्या खेळाडूंमध्ये १३ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डिव्हाईन, डिआंड्रा डॉटिन या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. त्यानंतर ४० लाख ही दुसऱ्या क्रमांकाची मूळ किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी ३० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. नवोदित खेळाडूंसाठी १० आणि २० लाख मूळ किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यांचा सर्वप्रथम लिलाव होईल. लीगमध्ये सहभागी पाच संघांना खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येकी १२ कोटी रुपये खर्च करता येतील. प्रत्येक संघाला १५ ते १८ खेळाडू संघात घेता येणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईत ब्रेबॉर्न आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहेत.

लिलावाबाबत..

  • नोंदणी केलेल्या एकूण

खेळाडू : १५२५

लिलावपात्र खेळाडू : ४०९  
भारतीय खेळाडू : २४६  
परदेशी खेळाडू (यातील आठ खेळाडू सहयोगी सदस्य देशांच्या) : १६३  
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या : २०२  
आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलल्या : १९९  
सर्वाधिक ५० लाख मूळ किंमत : २४  
५० लाख मूळ किंमत असलेल्या परदेशी खेळाडू : १३  
 लिलावात ४० लाख मूळ किंमत असणाऱ्या खेळाडू : ३०

NASA मध्ये पोहोचले क्रिकेट; स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणार अमेरिकेची क्रिकेट लीग

  • अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC) १९ मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-२० स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सिएटलमधील प्रत्येकी एक संघ सहभागी होईल. स्पर्धेचा पहिला हंगाम १८ दिवसांचा असेल आणि डॅलस आणि मॉरिसविले येथील एमएलसी मैदानावर खेळवला जाईल.
  • क्रिकबझच्या अहवालानुसार, मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात प्रत्येक संघ पाच लीग सामने खेळेल. संघाची टीम पर्स सुमारे US$750,000 (६ कोटींहून अधिक) असेल. हे दक्षिण आफ्रिकन लीग एसए-टी२० आणि यूएच्या आयएल टी-२० च्या प्रति सामन्याच्या सरासरी पगाराच्या जवळपास आहे.
  • या लीगमध्ये अनेक मोठे क्रिकेट स्टार दिसणार - ही स्पर्धा अशा वेळी होणार आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एफटीपीमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने नाहीत. अशा परिस्थितीत जगातील अनेक क्रिकेट स्टार या लीगमध्ये खेळताना दिसू शकतात.
  • मेजर लीग क्रिकेटचे विधान - मेजर लीग क्रिकेटचे संचालक जस्टिन गेली म्हणाले, “मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात, जगभरातील अनेक सर्वोत्तम T20 खेळाडू अमेरिकेतील प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळताना दिसतील. ह्यूस्टनमधील स्पेस सेंटरमध्ये १९ मार्च रोजी ड्राफ्ट इवेंटनंतर संघ पुढे जाताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

भारतात जाणाऱ्या पाकिस्तानी हिंदूंना रोखले

  • भारतात जाण्याच्या उद्देशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक कारण न दिल्याचे सांगून, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सिंध प्रांतात राहणाऱ्या १९० हिंदूंना भारतात जाण्यापासून रोखले असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले आहे. सिंधच्या अंतर्गत भागातील मुले व महिलांसह निरनिराळी हिंदू कुटुंबे धार्मिक तीर्थयात्रेसाठी दिलेल्या व्हिसावर भारतात जाण्यासाठी मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली.
  • मात्र, आपण भारतात का जाऊ इच्छितो याचे योग्य कारण ते देऊ न शकल्यामुळे पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ देण्यास मनाई केली, असे ‘दि एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे. हिंदू कुटुंबे बहुतेक वेळा धार्मिक तीर्थाटनासाठी व्हिसा घेतात, मात्र नंतर ते दीर्घ काळासाठी भारतात थांबतात, असे सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सध्या मोठय़ा संख्येत पाकिस्तानी हिंदू राजस्थान व दिल्ली या राज्यांमध्ये भटके म्हणून राहात आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.
  • ‘सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान’ या संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे २२ लाख १० हजार ५६६ लोक राहात असून, देशाच्या १८,९८,९०,६०१ इतक्या नोंदणीकृत लोकसंख्येपैकी हे प्रमाण केवळ १.१८ टक्के आहे. पाकिस्तानातील हिंदूंसह अल्पसंख्याक लोकसंख्या गरीब असून देशाच्या विधिमंडळ यंत्रणेत त्यांचे नगण्य प्रतिनिधित्व आहे. पाकिस्तानच्या हिंदू लोकसंख्येपैकी बहुतांश सिंध प्रांतात स्थायिक आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ फेब्रुवारी 2022

 

प्रो लीग हॉकी (पुरुष) - भारताचा फ्रान्सवर विजय :

भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या यंदाच्या पर्वाची दमदार सुरुवात करताना मंगळवारी सलामीच्या लढतीत फ्रान्सवर ५-० असा शानदार विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानावर आहे. परंतु तरीही फ्रान्सचा संघ भारताला झुंज देईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र, मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताने धारदार आक्रमण करतानाच भक्कम बचाव करत सलामीची लढत पाच गोलच्या फरकाने जिंकली. भारताकडून उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (२१वे मिनिट), वरुण कुमार (२४वे मि.), शमशेर सिंग (२८वे मि.), मनदीप सिंग (३२वे मि.) आणि आकाशदीप सिंग (४१वे मि.) यांनी गोल झळकावले.

भारतीय संघ बुधवारी पुन्हा मैदानात उतरणार असून त्यांची यजमान दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल. त्यानंतर शनिवारी (१२ फेब्रुवारी) पुन्हा भारत आणि फ्रान्स हे संघ आमनेसामने येतील.

मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींना आरक्षण लागू करा ; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती :

इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) राजकीय आरक्षण लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकारने पूर्तता केली आहे. त्यामुळे  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी  निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण लागू करण्याची कार्यवाही करावी अशी विनंती राज्य सरकारने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगास केली आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करता येईल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.

राज्यात इतर मागास प्रवर्ग समाजाची (ओबीसी) लोकसंख्या २७ टक्क्यांपेक्षा अधिक असून या ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक पातळीवर नियोजन आणि विकासात या समाजाचा सहभाग वाढावा यासाठी या समाजास २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याबाबात राज्य मागास वर्ग आयोगाने सकारात्मक अहवाल दिला आहे. सरकारने हा अहवाल सर्वोच्च न्यायालास सादर केला असून त्याची प्रत राज्य निवड़णूक आयोगाला सादर केली आहे.

सरकारने आयोगाला पत्र पाठवून ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्क्यांपर्यंत मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे आरक्षण देण्याचा कायदा करून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख अटींचे पालन केले आहे. राज्य सरकारकडे उपलब्ध असलेली सांख्यिकी आकडेवारी मागास वर्ग आयोगाला सादर केली आहे.

अभिनेते प्रवीण कुमार यांचे निधन :

दूरचित्रवाणीवरील महाभारत या प्रसिद्ध मालिकेत भीमाची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू प्रवीण कुमार सोब्ती यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले.

७४ वर्षीय प्रवीण कुमार यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी रात्री नवी दिल्लीतील अशोक विहार भागातील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मूळचे पंजाबमधील अमृतसरचे असलेले प्रवीण कुमार वयाच्या २०व्या वर्षी सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) दाखल  झाले.  थाळीफेक आणि हातोडाफेक या क्रीडाप्रकारांत त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. १९६६ आणि १९७०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी थाळीफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर १९६६च्या स्पर्धेत हातोडाफेकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. त्याच वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हातोडाफेक खेळात त्यांनी रौप्यपदक पटकावले होते. १९६८च्या मेक्सिको आणि १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेत ते सहभागी झाले होते.

काश्मीरविषयक संदेशाबाबत दक्षिण कोरियाकडून दिलगिरी ; दिल्लीतील राजदूताकडे भारताचा तीव्र आक्षेप :

हुंदाईच्या पाकिस्तानातील कंपनीने (हुंदाई-पाकिस्तान) कथित काश्मीर एकात्मकता दिनानिमित्त समाजमाध्यमांवर जारी केलेल्या संदेशाबाबत भारताने दक्षिण कोरियाच्या राजदूतांना बोलावून तीव्र आक्षेप नोंदवला. हे प्रकरण भारताच्या प्रादेशिक एकतेशी निगडित असल्याने त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भारताने सुनावले आहे.

या वादाबद्दल दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग एयी याँग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी मंगळवारी सकाळी संपर्क साधून दिलगिरी व्यक्त केली. हुंदाई-पाकिस्तानच्या समाजमाध्यमावरील संदेशामुळे भारतीय लोक आणि भारत सरकारविरुद्ध जो गुन्हेगारी स्वरूपाचा प्रमाद घडला आहे, त्याबाद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी सांगितले की, सोमवारी दक्षिण कोरियाच्या दूतांना पाचारण करून भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी कंपनीकडून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. भारतात परदेशी गुंतवणुकीचे स्वागत केले जात असले तरी या कंपन्यांनी भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकतेबाबत खोटी, दिशाभूल करणारी विधाने करू नयेत असे अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हुंदाई- पाकिस्तानने रविवारी हा वादग्रस्त संदेश जारी करताच भारताच्या सेऊलमधील राजदूतांनी हुंदाईच्या मुख्यालयाशी संपर्क साधून स्पष्टीकरण मागविले होते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर समाजमाध्यमातील हा संदेश मागे घेण्यात आला होता.

PM CARES फंडात एका वर्षात आला १० हजार ९९० कोटींचा निधी; मोदी सरकारने खर्च केले केवळ ३ हजार ९७६ कोटी :

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पुढाकाराने संकलित करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडमधील एकूण निधीबद्दलची आकडेवारी माहिती अधिकार अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये समोर आलीय. कमांडर (निवृत्त) लोकेश बत्रा यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जामध्ये एकूण जमलेल्या रक्कमेपैकी एक तृतीयांश रक्कमच खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

माहिती अधिकार अर्जाला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये पीएम केअर्स फंड या निधीमध्ये २०२०-२१ मध्ये एकूण १० हजार ९९० कोटी रुपये जमा झाले आहेत. यापैकी ७ हजार १८३ कोटी रुपये स्वच्छेने केलेली मदत म्हणून जमा झालीय. या निधीतील ४९४ कोटी रुपये हे परदेशामधील लोकांनी दिलेले आहेत. याच कालावधीमध्ये म्हणजेच २०२०-२१ दरम्यान या फंडातून ३ हजार ९७६ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. यापैकी १ हजार ३११ कोटी रुपये मेड इन इंडिया व्हेंटीलेटर्सवर खर्च करण्यात आलेत. हे व्हेंटीलेटर्स देशभरातील वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये देण्यात आले होते. तर एक हजार कोटी रुपये राज्यांना स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी देण्यात आले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आलीय. २७ मार्च २०२० रोजी या फंडाची घोषणा करण्यात आली आणि सर्व सामान्यांपासून सेलिब्रिटींबरोबरच अनेक संस्थांनी यामध्ये पैसे दिले.

२०१९-२० मध्ये पीएम केअर्स फंडमध्ये एकूण ३ हजार ७६ कोटी ६२ लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे फंड सुरु केल्यानंतर पाच दिवसात जमा झालेले. पीएम केअर्स फंडच्या वेबसाईटनुसार, “हा सर्व निधी व्यक्तींनी, संस्थांनी स्वइच्छेने दिलेल्या पैशांमधून उभारण्यात आला असून अर्थसंकल्पामधून यामध्ये कोणताही निधी देण्यात आलेला नाही,” असं म्हटलंय.

०९ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.