चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ डिसेंबर २०२०

Date : 9 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना स्थान :
  • फोर्ब्सनं नुकतीच जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापन किरण मजूमदार-शॉ आणि एचसीएल एन्टरप्राईझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

  • फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

  • “फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला,” असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.

  • या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत.

मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर लसीकरण मोहिमेत करावा - मोदी :
  • कोविड १९ लस लवकरच उपलब्ध होण्याची आशा असून लशीकरणाच्या मोहिमेत मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये बोलताना व्यक्त केली.

  • त्यांनी सांगितले की, फाइव्ह जी मोबाइल सेवा ठरावीक कालमर्यादेत भारतात उपलब्ध होईल. त्यामुळे डेटा म्हणजे माहितीचा वेग वाढणार आहे. अनेक जीबी क्षमतेपर्यंत माहितीची देवाणघेवाण वेगाने करणे शक्य होणार आहे.

  • इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये त्यांनी सांगितले की, मोबाइल तंत्रज्ञानातून लाखो लोकांना कोटय़वधी डॉलर्सचा फायदा झाला आहे. रोख रकमेशिवाय व्यवहार करणे शक्य झाले आहे. टोल नाक्यांवरही संपर्कहीन टोल वसुली सेवा शक्य झाली आहे.

  • मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर लशीकरणाची मोहीम राबवण्यात  करण्यात यावा. पण तो कसा करावा याचे स्पष्टीकरण त्यांनी केले नाही. सध्या भारतात फायझर, अस्ट्राझेनेका, भारत बायोटेक व सीरम या कंपन्यांनी लशीच्या आपत्कालीन वापराचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. मोदी यांनी सांगितले, की फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यासाठी आगामी काळात एकजुटीने काम करावे लागेल. त्यातून लाखो भारतीयांचे सक्षमीकरण होणार आहे. ईशान्येकडील राज्ये, महत्त्वाकांक्षी जिल्हे, डाव्या नक्षलवादाचा प्रभाव असलेले जिल्हे, लक्षद्वीप बेटे या ठिकाणी आम्ही मोबाइल यंत्रणेच्या माध्यमातून दूरसंचार व्यवस्थेवर भर दिला आहे. स्थिर ब्रॉडबँड जोडण्या व सार्वजनिक वायफाय क्षेत्रे निर्माण करण्यात येत आहेत.

जिल्ह्य़ातील शाळा सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी :
  • पालघर : पालघर नगरपरिषद तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहत परिसरातील गावे वगळून जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरसकट सर्वच गावांमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यास शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांची संमती असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकांश भागांमधील शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी या पूर्वी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती तसेच पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील शाळा ३१ डिसेंबपर्यंत सुरू न करण्याचे निर्देश  जारी केले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आजाराचा संसर्ग व संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला आहे.

  • जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीस ठराव मंजूर असल्यास तसेच विद्यार्थी-पालक समितीने त्याला संमती दिली असल्यास जिल्ह्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे.

  • असे करताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पालघर नगरपरिषद तसेच बोईसर तारापूर औद्योगिक परिसरातील शाळा वगळून जिल्ह्यातील शाळांमधील नववी ते बारावीच्या वर्ग सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी  दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ५४ शाळा सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आता या नवीन आदेशामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा लवकरात लवकर सुरू होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचे पदार्पण :
  • ब्रेकडान्सला अधिकृत ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पॅरिसला २०२४मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्रेकडान्सच्या समावेशाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे.

  • युवा पिढीला ऑलिम्पिकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरील नृत्याला म्हणजेच ‘स्ट्रीट डान्स’ला मान्यता देण्याचा निर्णय ‘आयओसी’ने घेतला आहे. त्यानुसार २०२४मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचा समावेश असेल. याआधी टोक्यो ऑलिम्पिकमधून स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या खेळांचे पदार्पण होणार होते. मात्र करोनामुळे यावर्षीचा ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. यास्थितीत स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या तीन्ही खेळांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे.

  • लुकाशेंको यांची हकालपट्टी

  • बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्याविरोधात झालेली निदर्शने पाहता ‘आयओसी’ने त्यांना ऑलिम्पिकशी संबंधित सर्व पदांवरुन निलंबित केले आहे. लुकाशेंको हे बेलारुसच्या ऑलिम्पिक समितीवर गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.

  • ब्रेकडान्सला ऑलिम्पिकमध्ये ‘ब्रेकिंग’ हे नाव देण्यात आले आहे.
  • अमेरिकेत या खेळाचा १९७०च्या दशकात उदय झाला होता.
  • ब्युनस आयर्स येथे २०१८च्या युवा ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंग या खेळाची चाचणी पार पडली होती.
  •  पॅरिस ऑलिम्पिकच्या संयोजकांनी या खेळाच्या समावेशाचा प्रस्ताव मांडला.
  • गेल्या वर्षी या खेळाला ‘आयओसी’च्या सर्व सदस्य देशांनी मान्यता दिली.

०९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.