चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 08, 2021 | Category : Current Affairs


चांद्रयान -२ ने लावला हा शोध :
 • चंद्रावर मॅगनिज आणि क्रोमियम या मुलद्रव्यांचे अस्तित्व चांद्रयान -२ यानाने शोधले आहे. या मुलद्रव्यांचे प्रमाण नगण्य स्वरुपात आहे. चांद्रयान -२ मोहिमेला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने ‘ल्युनर सायन्स वर्कशॉप’ चे आयोजन केले होते. यावेळी या शोधाबद्द्ल माहिती देण्यात आली. चांद्रयान -२ हे चंद्राभोवती १०० किलोमीटर उंचीवर फिरत असून त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आणखी पुढील काही वर्षे नवीन माहिती मिळत राहील असा विश्वास इस्त्रोचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी यावेळी व्यक्त केला. चांद्रयान -२ ने चंद्राभोवती ९००० प्रदक्षिणा पूर्ण केल्या असल्याचंही यावेळी जाहिर करण्यात आलं.

 • चांद्रयान -२ च्या माध्यमातून चंद्राच्या निर्मितीची आणि सुर्यमालेची जडणघडण याबद्द्लची माहिती पुढे येईल. वातावरण नसलेल्या चंद्रावर सुर्यमालेच्या निर्मितीचे पुरावे असावेत असा अंदाज सीवन यांनी व्यक्त केला.

 • चांद्रयान -२ यान हे २२ जुलै २०१९ ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. २० ऑगस्ट २०१९ ला चांद्रयान -२ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. ६ सप्टेंबरला चांद्रयान -२ च्या विक्रम लँडरने चांद्रभुमिवर अलगद उतरण्याचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये अपयश आलं होतं, विक्रम लँडर हे चांद्रभुमिवर आदळत निकामी झालं होतं. असं असलं तरी चंद्राभोवती फिरणाऱ्या चा्ंद्रयान -२ यानावरील ८ वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मोठी माहिती जमा झाली आहे. विविध वैज्ञानिक संस्था, विद्यापीठे यांना ही माहिती विश्लेषणाकरता दिली जाईल. या माध्यमातून देशभरातून चंद्रायान -२ ने मिळवलेल्या माहितीचा अभ्यास केला जाईल आणि नवीन माहिती पुढे येईल असा विश्वास इस्त्रोच्या अध्यक्षांनी व्यक्त केला.

MHT CET Exam Dates 2021: ‘सीईटी’ १५ सप्टेंबरपासून :
 • अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, एमसीए, एमबीए, आर्किटेक्चर, बीएड आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल. तसेच महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी के ली.

 • सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रि या ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु, करोनामुळे बारावीच्या परीक्षांबरोबरच ‘सीईटी’ परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्र मांच्या मिळून १४ वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा २५ दिवसांत होणार आहेत. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात बीई/बीटेक, बीफार्म, डीफार्म, शेती आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांची ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देतील. या परीक्षेला ५ लाख ५ हजार ७८८ विद्यार्थी बसणार आहेत.

 • तर हे आणि इतर सर्व अभ्यासक्रमांचे मिळून ८,५५,८७९ विद्यार्थी विविध अभ्यासक्रमासाठी परीक्षा देणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरात २२६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेसाठी रोज २५ हजार संगणकांची गरज आहे. खबरदारी म्हणून ५० हजार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे सामंत म्हणाले.

परीक्षांचे वेळापत्रक..

 • एमसीए, एम.एचएमसीटी, एम.आर्क, एम.पी.एड, बीए/बीएससी आणि बीएड  : १५ सप्टेंबर

 • एम.पी.एड (शारीरिक चाचणी) : १६ ते १८ सप्टेंबर

 • एमबीए, एमएमएस : १६ ते १८ सप्टेंबर

 • बीई/बीटेक, बीफार्म, डीफार्म, अ‍ॅग्रीकल्चर : २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

 • बी.एचएमसीटी, एम.एड, बी.एड आणि बी.पी.एड, एलएलबी (५वर्षे) : ३ ऑक्टोबर

 • बीपीएड (शारीरिक चाचणी) : ४ ते ७ ऑक्टोबर

 • एलएलबी (३ वर्षे) : ४ आणि ५ ऑक्टोबर

 • बीएड (जनरल आणि स्पेशल) : ६ आणि ७ ऑक्टोबर

 • फाईन आर्ट (ऑफलाईन) : ९ आणि १० ऑक्टोबर

शिक्षकांना आता पीकपाणी नोंदणीचा आदेश :
 • खरीप हंगामातील पीक पाहणी व मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा अफलातून आदेश नाशिक जिल्हय़ातील सिन्नरच्या तहसीलदारांनी काढल्याने शिक्षक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

 • नाशिक जिल्हय़ातील सिन्नरच्या तहसीलदारांनी कृषीखात्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्याचा आदेश काढला आहे. आदेशानुसार, खरीप हंगाम २०२०-२१ साठी मोबाइल अ‍ॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरावर शेतकरी खातेदारांना प्रबोधन करायचे आहे. राज्य शासनाने ई पीक पाहणी हे मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून सप्टेंबपर्यंत तातडीने नोंदणी करायची आहे.

 • ग्रामस्तरावर शिक्षक हा शासनाचा महत्त्वाचा प्रतिनिधी असून शासनाची धोरणे, लोकाभिमुख योजना व विविध प्रकल्प यांची माहिती ग्रामस्तरावर पोहचवणारा महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून ई-पीक पाहणी प्रकल्पात शिक्षक मोलाचा वाटा उचलू शकतात, याकडे लक्ष वेधत तसे निर्देश शिक्षकांना देण्याचा सल्ला तहसीलदारांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.  राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेश सरचिटणीस विजय कोंबे यांनी या आदेशाचा निषेध करीत तो तात्काळ रद्द करण्याची मागणी संघटनेतर्फे केली आहे.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा - जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक :
 • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ‘गोल्डन स्लॅम’च्या दिशेने यशस्वी कूच सुरू ठेवली आहे. जोकोव्हिचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जेन्सन ब्रूक्सबीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीलाही स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. महिलांमध्ये चौथ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि मारिया सकारी यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली.

 • पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचने २० वर्षीय अमेरिकन खेळाडू ब्रूक्सबीवर १-६, ६-३, ६-२, ६-२ अशी मात केली. यंदा सलग चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोव्हिचने या सामन्याचा पहिला सेट मोठय़ा फरकाने गमावला. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत पुढील तिन्ही सेट जिंकत सामन्यात बाजी मारली.

 • हा जोकोव्हिचचा यंदा ग्रँडस्लॅम स्पर्धातील सलग २५वा विजय ठरला. तसेच ब्रूक्सबीच्या पराभवामुळे अमेरिकेचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेत यजमानांच्या एकाही पुरुष किंवा महिला खेळाडूला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आल्याची ही पहिलीच वेळ आहे. जोकोव्हिचचा पुढील फेरीत सहाव्या मानांकित बेरेट्टिनीशी सामना होईल. बेरेट्टिनीने चौथ्या फेरीत जर्मनीच्या ऑस्कर ओट्टेचा ६-४, ३-६, ६-३, ६-२ असा पराभव केला.

रुग्णसंख्येत पुन्हा वाढ! देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ८७५ बाधितांची नोंद :
 • देशातील करोना रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहे. काल अवघे ३१ हजार रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३७ हजार ८७५ करोना रुग्ण आढळले असून ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 • तसेच ३९ हजार ११४ जणांनी करोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशभरातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख ९६ हजार ७१८ झाली आहे.

 • देशात सध्या ३ लाख ९१ हजार २५६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत ३ कोटी २२ लाख ६४ हजार ५१ जण करोनातूनन बरे झाले आहेत. तर, ४ लाख ४१ हजार ४११ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत केरळमध्येही पुन्हा रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात सापडलेल्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २५ हजार ७७२ बाधित एकट्या केरळमधील असून १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

०८ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)