चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 08, 2021 | Category : Current Affairs


अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यासाठीचे नोबेल :
 • टांझानियन लेखक अब्दुलरझाक गुरनाह यांना साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.वसाहतवादाच्या परिणामांचा गुरनाह यांनी ‘तडजोड न करणाऱ्या आणि कनवाळू’ दृष्टिकोनातून जो वेध घेतला आहे, त्यासाठी त्यांना हे पारितोषिक देण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने म्हटले आहे.

 • झांझिबारमध्ये जन्म झालेले आणि आता इंग्लंडमध्ये. असलेले गुरनाह हे केंट विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांच्या ‘पॅराडाईझ’ या कादंबरीचा १९९४ साली बुकर पुरस्कारासाठी लघुयादीत समावेश करण्यात आला होता. सुवर्णपदक आणि १० अब्ज स्वीडिश क्रोनोर (सुमारे १.१४ दशलक्ष पौंड) असे प्रतिष्ठित अशा नोबेल पारितोषिकाचे स्वरूप आहे.

 • लेखन संपदा - १० कादंबऱ्या व अनेक लघुकथा आणि निबंधांचे लेखन. ज्यात मेमरी ऑफ डिपार्चर (१९८७), पिलग्रिम्स वे (१९८८), पॅराडाइज (१९९४), बाय द सी (२००१), डेझर्टेशन (२००५), ग्रेवेल हार्ट (२०१७) आणि, आफ्टरलाइव्ह्स (२०२०) चा समावेश.

भारताच्या प्रत्युत्तरानंतर ब्रिटनने बदलले नियम; रद्द केली ‘ही’ अट :
 • भारताकडून योग्य उत्तर मिळाल्यानंतर ब्रिटनने आता भारतीय प्रवाशांसाठी लस घेतल्यानंतर क्वारंटाईन करण्याची अट संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनने गुरुवारी सांगितले की ब्रिटनला येणाऱ्या भारतीय प्रवाशांना कोविडशील्ड किंवा त्यांच्या सरकारने मंजूर केलेल्या इतर कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेऊन ११ ऑक्टोबरपासून क्वारंटाईन ठेवणार नाही.

 • याआधी भारताने आम्ही जशास तसे धोरण स्वीकारण्याचे ठरवले आहे असे म्हटले होते. दरम्यान, ब्रिटनने आधी कोविन लसीकरण प्रमाणपत्रास मान्यता देण्यासही नकार दिला होता.

 • ब्रिटिनच्या निर्णयानंतर भारताने जशास तसे उत्तर दिले होते. भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी ४ ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे.

‘आरआयएमसी’च्या प्रवेश परीक्षेला बसण्याची महिला उमेदवारांना परवानगी :
 • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींचा समावेश केल्यानंतर काही दिवसांतच, डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये (आरआयएमसी) प्रवेशासाठी १८ डिसेंबरला होणाऱ्या परीक्षेला महिला उमेदवारांना बसण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिली.

 • केंद्र सरकारने या दिशेने बरीच वाटचाल केली असून त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकायला हवे, असे न्यायालयाने सांगितले.

 • परीक्षेचे वेळापत्रक न बदलता या संदर्भात सुधारित जाहिरात प्रकाशित करावी, असे निर्देश न्या. एस. के. कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला दिले. योग्य ती व्यवस्था करण्यासाठी आरआयएमसीसारख्या शिस्तबद्ध संघटनेला सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे, असे खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना उद्देशून सांगितले.

 • हे निर्देश प्रतिवादी महाविद्यालयाच्या संदर्भात आहेत. तथापि, राष्ट्रीय सैनिकी शाळांच्या बाबतीत ही प्रक्रिया २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नीरज चोप्राचा ‘त्या’ सुवर्ण भाल्यावर Sold चा ठपका; ‘इतक्या’ कोटींना विकला गेला :
 • भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज देशातील पहिला खेळाडू ठरला. नीरजने ज्या भाल्याचा थ्रो करून सुवर्णपदक पटकावलं होतं, तो भाला त्याने पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला होता.

 • त्यानंतर मोदींना भेट म्हणून आलेल्या वस्तूंचा ई-लिलाव ठेवण्यात आला. या लिलावात नीरज चोप्राच्या सुवर्णवेधी भाल्यावर तब्बल दीड कोटींची बोली लागली आहे. हा लिलाव मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजेच १७ सप्टेंबर पासून सुरू होता. सर्व भेटवस्तूंपैकी नीरजच्या भाल्यावर सर्वात जास्त बोली लागली आहे.

 • हा ऑनलाइन लिलाव ७ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी संपला आहे. मात्र, मोदींनी मिळालेल्या एकूण १३४८ भेटवस्तूंपैकी काही वस्तू अद्याप विकल्या गेलेल्या नाहीत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी रात्रीपर्यंत काही वस्तूंवर बोली लावण्यात आल.

 • परंतु ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी त्यांच्या खेळादरम्यान वापरलेल्या क्रीडा उपकरणांसह बहुतेक वस्तूंची बोली संध्याकाळी बंद करण्यात आली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय की, pmmementos.gov.in. वरील ई-लिलावादरम्यान ८,६०० हून अधिक बोली लागल्या आहेत.

भाजपची ८० सदस्यांची नवी राष्ट्रीय समिती जाहीर :
 • लखीमपूर खेरीमधील हत्याकांडानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केल्यानंतर काही तासांतच खासदार वरुण गांधी तसेच, माजी मंत्री मनेका गांधी यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून गच्छंती झाली.

 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात केंद्र सरकार वा भाजपच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांची पक्षाच्या ध्येयधोरणे ठरवणाऱ्या प्रमुख समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह व मोदींचे टीकाकार खासदार सुब्रमणियन स्वामी यांनाही वगळले आहे.     

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह ‘मार्गदर्शक’ लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ८० सदस्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केला आहे. नव्या कार्यकारिणीमध्ये नवनियुक्त केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव तसेच, ज्योतिरादित्य शिंदे यांना स्थान दिले असले तरी, महाराष्ट्रातून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा समावेश न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

 • नड्डा यांच्या कार्यकारिणीमध्ये ५० विशेष निमंत्रित व १७९ स्थायी निमंत्रित असतील. केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले हर्षवर्धन, रवीशंकर प्रसाद व प्रकाश जावडेकर यांना सदस्यपदी कायम ठेवण्यात आले आहे. ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

परदेशी पर्यटकांना १५ ऑक्टोबरपासून व्हिसा देण्याचा निर्णय :
 • परदेशी पर्यटकांना देशात प्रवेशाची परवानगी देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. चार्टर्ड विमानांनी प्रवास करणाऱ्यांना १५ ऑक्टोबरपासून आणि नियमित विमानांनी प्रवास करणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून पर्यटक व्हिसा देण्याची सुरुवात होणार आहे.

 • यासोबतच, करोना महासाथीमुळे मार्च २०२० पासून व्हिसा आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर घालण्यात आलेले निर्बंध, एकूण परिस्थितीत सुधारणा झाल्याने शिथिल केले जात असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.मिळालेल्या माहितीवर विचार केल्यानंतर, चार्टर्ड विमानांतून भारतात येणाऱ्या विदेशी लोकांना १५ ऑक्टोबरपासून नवे पर्यटक व्हिसा दिले जाणार आहेत.

 • चार्टर्ड विमानांव्यतिरिक्त इतर विमानांनी भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना असे व्हिसा १५ नोव्हेंबरपासून मिळू शकतील, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

 • करोना महासाथीमुळे पर्यटकांना दिले जाणारे सर्व प्रकारचे व्हिसा गेल्या वर्षी स्थगित करण्यात आले होते. याशिवाय, करोना महासाथीचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासावर इतर अनेक निर्बंधही लावले होते.

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा - भारतीय महिलांचे सोनेरी यश :
 • मनू भाकर, रिदम सांगवान आणि नाम्या कपूर यांचा समावेश असलेल्या महिला संघाने बुधवारी २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करताना ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेमधील भारताचे वर्चस्व कायम राखले.

 • भारतीय संघाने अंतिम फेरीत अमेरिकेवर १६-४ असा विजय मिळवला. या स्पर्धेमधील मनूचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. याशिवाय एक कांस्यपदकही तिने कमावले आहे. १४ वर्षीय नाम्याचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी तिने २५ मीटर वैयक्तिक पिस्तूल प्रकारात जेतेपद पटकावले आहे.

 • रॅपिड फायरच्या आठव्या मालिकेला प्रारंभ होण्याआधी मनू, रिदम आणि नाम्या या त्रिकुटाने १०-४ अशी वर्चस्वपूर्ण आघाडी घेतली. मग अखेरीस १६-४ असा विजय मिळवला. मंगळवारी पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारतीय संघाने एकूण ८७८ गुणांसह पहिला क्रमांक मिळवला, तर दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सचा संघ सहा गुणांच्या अंतरावर होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत भारताने ४४६ तर अमेरिकेने ४३७ गुणांसह अंतिम फेरी गाठली.

 • २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आदर्श सिंगने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. सहा नेमबाजांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या हेन्री टर्नर लेव्हेरेटकडून त्याचा पराभव झाला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सहा स्पर्धकांमध्ये आदर्शसह उदयवीर आणि विजयवीर सिद्धू या भारताच्या तिघांचा समावेश होता.

“समुद्र असो वा जंगल भारत जगासाठी उदाहरण” मोदींकडून करोना लसीकरण मोहिमेचं कौतुक :
 • समुद्र असो वा जंगल आम्ही देशातील सर्व भागांमध्ये करोना प्रतिबंधक लस पोचवत आहोत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. गुरुवारी (७ ऑक्टोबर) मोदी यांनी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरावर सुरु असलेल्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

 • “लसीकरण कार्यक्रमासाठी कोविनसारखा एक प्लॅटफॉर्म तयार करून इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण कसं केलं जाऊ शकतं हे भारताने जगाला दाखवून दिलं आहे”, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

 • एम्स उत्तराखंड येथे एका कार्यक्रमात आज मोदी बोलत होते. ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम केअर्स फंडाअंतर्गत स्थापन झालेल्या ३५ प्रेशर स्विंग अ‍ॅडॉर्सप्शन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी मोदी ऋषिकेशमध्ये दाखल झाले होते. आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट सुरू होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. आतापर्यंत देशभरात पीएम केअर्स फंडाअंतर्गत एकूण १ हजार २२४ पीएसए ऑक्सिजन प्लांट्स देण्यात आले आहेत.

 • उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी (७ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदी उत्तराखंडला भेट देणार असल्याचा आनंद व्यक्त केला होता. याचं कारण म्हणजे, आजच्या दिवशी मोदी यांनी उत्तराखंडला भेट दिली आहे आणि आजच्याच दिवशी २० वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

 • आज मोदींना शासकीय पदावर कार्यरत होऊन २० वर्ष पूर्ण झाली आहेत. हाच दिवस मोदींनी उत्तराखंड दौऱ्यासाठी निवडल्याने आपण आनंदी असल्याचं धामी यांनी म्हटलं होतं.

०८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)