चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ ऑक्टोबर २०२०

Date : 8 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘आत्मनिर्भर भारत’वरून रघुराम राजन यांचा इशारा, म्हणाले :
  • काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. दरम्यान, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे.

  • “केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे परिणाम संरक्षणवादाच्या रूपात होऊ नयेत,” असं राजन म्हणाले. म्हणजेच स्वदेशी मालाच्या स्पर्धेत परदेशी माल उतरू नये यासाठी स्वदेशी मालास सरकारने दिलेले संरक्षण घातक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं राजन यांना सुचित करायचं आहे. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना राजन यांनी यावर भाष्य केलं.

  • “यापूर्वीही अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे,” असं राजन म्हणाले.

  • “जर हा संरक्षणवादाचा मुद्दा असेल तर दुर्दैवाने भारताने अलीकडेच दरवाढ केली आहे. मला वाटतं की या मार्गाचा अवलंब करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपण यापूर्वीच तसा प्रयत्न केला आहे. यापूर्वी आपल्याकडे लायसन्स परमिट व्यवस्था होती. संरक्षणवादाची ती पद्धत समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे काही कंपन्यांना फायदा झाला, परंतु काहींसाठी ते समस्या निर्माण करणारे ठरले,” असं राजन म्हणाले.

जनुकीय कात्रीच्या तंत्रास रसायनशास्त्राचे नोबेल :
  • जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.  या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक आनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य आहे.

  • रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना विभागून देण्यात येणार आहे. दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.  त्यांनी प्राणी आणि माणसातील सदोष जनुके काढून टाकण्यासाठीचे ‘क्रिस्पर’ किंवा ‘कॅस ९’ तंत्रज्ञान शोधून काढले होते. ही पद्धत वनस्पती व सूक्ष्मजीवातील घातक किंवा सदोष जनुके काढून टाकण्यासाठी वापरता येते. रेणवीय कात्र्यांचे हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचे रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष क्लेस गुस्ताफसन यांनी म्हटले आहे.

  • त्यांनी सांगितले,की क्रिस्पर किंवा कॅस ९ तंत्रज्ञानाने मूलभूत विज्ञानात मोठी क्रांती केली एवढेच त्याचे महत्त्व नसून त्यामुळे नवीन जनुकसंस्कारित पिके तयार करणेही शक्य झाले आहे. त्यातून कृषी क्षेत्रातही क्रांती झाली आहे.

भारतीय हवाई दल वर्धापनदिन: ‘या’ गोष्टी वाचून तुम्हाला IAF चा अभिमान वाटेल :
  • आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. आजच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त जाणून घेऊयात भारतीय हवाई दलाबद्दलच्या काही खास गोष्टी

  • ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं

व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।

दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा

धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥

  • या भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायातील श्लोकामधील हे वाक्य आहे. याचा अर्थ होतो, हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत

करोना काळात देश पुढे कसा न्यायचा?; आजपासून पंतप्रधान मोदींचे ‘जन आंदोलन’ :
  • सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीतच आगामी सण आणि हिवाळा आणि अर्थव्यवस्थेच्या स्थिती लक्षात घेत आणि करोनाबाबात सर्व उपाययोजनांचं पालन करत देश कसा पुढे नेता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ‘जन आंदोलना’ची सुरूवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका ट्वीटद्वारे या मोहिमेची सुरूवात करणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलं.

  • केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. “करोनापासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि हात धुणं हाच आहे. याचाच वापर करून सार्वजनिक ठिकाणी या उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिमेची सुरूवात करण्यात येणार आहे,” असं जावडेकर म्हणाले.

  • “करोना काळात घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. औषधं आणि लसीशिवाय मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हात धुत राहणं हे करोनाविरोधातील कवच आहे. या मोहिमेंअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी फलक लावले जाणार आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

भारत-जपान यांच्यात चर्चा :
  • भारत व जपान यांच्या परराष्ट्र मंत्र्यात बुधवारी धोरणात्मक पातळीवरची चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व जपानचे समपदस्थ तोशीमित्सू मोटेगी यांनी भारत व जपान यांचे सहकार्य विस्तारण्यावर भर दिला आहे. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत संयुक्त राष्ट्रांच्या बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या सुधारणा, इंडो-पॅसिफिक भागातील स्थिती हे प्रमुख विषय होते.

  • परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे की, भारत व जपान यांच्यात उत्पादन, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, आरोग्य या क्षेत्रात सहकार्यावर भर देण्यात आला. भारत व जपान यांच्यातील भागीदारी कोविडनंतरच्या काळातील स्थितीत बराच फरक पाडण्यात मदत करू शकते.

  • भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद काल झाली. भारत व जपान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवर भर देतानाच इंडो-पॅसिफिक भागात शांतता व सुरक्षा तसेच स्थिरता यांना महत्त्व दिले आहे.

भारतीय तंत्रज्ञांवर अमेरिकेत आणखी निर्बंध :
  • भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक आणि कंपन्या यांच्यात लोकप्रिय असलेल्या अस्थलांतरित एच १-बी व्हिसावर ट्रम्प प्रशासनाने आणखी नवे निर्बंध लागू केले. अमेरिकी कामगारांच्या नोक ऱ्या वाचवण्याच्या प्रयत्नात हे पाऊल उचलण्यात आले असून त्याचा सर्वाधिक फटका भारतीय तंत्रज्ञ आणि कामगारांना बसणार आहे.

  • अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे,की निकष पूर्ण करणाऱ्या कामगारांनाच कंपन्यांनी नियुक्तीचे प्रस्ताव द्यावेत. यापुढे अंतर्गत सुरक्षा व स्थलांतर खात्याचे अधिकारी कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी करणार आहेत. एच १-बी अस्थलांतरित व्हिसामुळे अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना अमेरिकी कामगारांच्या तुलनेत कमी वेतन देऊन कामावर ठेवू शकतात, पण आता ट्रम्प प्रशासनाने परदेशी कामगारांचे वेतन वाढवण्याचा नियम केल्याने आपोआप या कंपन्यांना देशी कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे लागणार आहे.

  • एच १-बी व्हिसा हा तांत्रिक कौशल्ये असलेल्या कामगारांना दिला जातो. भारत व चीन या दोन देशांच्या कंपन्या अधिक प्रमाणात  माहिती तंत्रज्ञान कर्मचारी अमेरिकेत पाठवतात. या निर्णयांमुळे भारताच्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना  फटका बसणार असून आधीच अनेकभारतीय माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि ते परत येत आहेत.

०८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.