चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ नोव्हेंबर २०२१

Date : 8 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लास्को टेबल टेनिस स्पर्धा - मनिका-अर्चना यांना सुवर्ण :
  • मनिका बत्रा आणि अर्चना कामत या भारतीय जोडीने रविवारी डब्ल्यूटीटी कंटेन्डर लास्को टेबल टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली.

  • मनिका-अर्चना जोडीने अंतिम फेरीत क्युबाच्या मेलानी आणि एड्रियाना या डियाज भगिनींवर ३-० (११-३, ११-८, १२-१०) अशी सरळ सेटमध्ये मात केली. त्यांच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेत एकूण तीन पदके पटकावली. महिला एकेरीत मनिकाने कांस्य, तर मिश्र दुहेरीत अर्चनाने मानव ठक्करच्या साथीने कांस्यपदक जिंकले.

  • महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मनिकाला चीनच्या वँग यिडीकडून २-४ (७-११, ११-७, ११-१३, १२-१०, ७-११, ५-११) असा पराभव पत्करावा लागला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार; राज्य सरकारच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल :
  • महाराष्ट्राला अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनकडून प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व पुरस्कार मिळाला आहे.राज्यासाठी आनंदाची बाब म्हणजे स्कॉटलंडमध्ये अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनतर्फे तीन पुरस्कारांपैकी एक जिंकणारे एकमेव भारतीय राज्य महाराष्ट्र ठरले आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

  • “हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) हे उत्कट वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत आणि त्यांनी आम्हाला चांगल्या भविष्याची, हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे.

  • माझी वसुंधरा म्हणजेच माय प्लॅनेट नावाची चळवळ आम्ही सुरू केली आहे. आम्ही निसर्गाच्या पारंपारिक पाच घटकांवर लक्ष केंद्रित करत आहोत,” अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लासगो येथे दिली.

झायडस कॅडिलाकडे केंद्राची एक कोटी लसमात्रांची मागणी :
  • झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह डी या सुईविरहित कोविड लशीच्या १ कोटी मात्रांची मागणी केंद्र सरकारने नोंदवली असून ही लस तीन मात्रांची आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लशीचा समावेश करण्यात येणार आहे.  

  • आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील ही पहिली डीएनए लस असून ती प्रौढांना दिली जाऊ शकते. १२ वर्षांवरील व्यक्तींसाठीच्या लसीकरणासाठी ‘झायकोव्ह डी’ या लशीला मान्यता देण्यात आली होती.  

  • या लशीची किंमत कर सोडून प्रतिनग ३५८ रुपये  आहे. यात वेदनारहित जेट अ‍ॅप्लिकेटरचा समावेश आहे. त्याच्या मदतीने ही लस दिली जाते.   ही लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.  २८ दिवसांच्या अंतराने या लशीच्या तीन मात्रा द्यायच्या असून दोन्ही हातांवर त्या दिल्या जातील. झायकोव्ह डी लशीला २० ऑगस्ट रोजी आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती.

  • मुलांच्या लसीकरणासाठी या लशीचा वापर होणार आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसही २ ते १८ वयोगटासाठी योग्य असल्याचे सांगत भारतीय औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन परवानगी दिली होती. १२ ऑक्टोबर रोजी कोव्हॅक्सिनच्या २ ते १८ वयोगटातील वापरासाठी आपत्कालीन परवानगी मिळाली.

न्यूझीलंडच्या विजयामुळे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त :
  • तब्बल १४ वर्षांचा जेतेपदाचा वनवास संपवून ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने ‘अव्वल-१२’ फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले.

  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या भारताकडून तमाम देशवासीयांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र तसे न झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसऱ्या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  • ट्रेंट बोल्टच्या (३/१७) भेदक माऱ्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद ४०) आणि डेवॉन कॉन्वे (नाबाद ३६) यांच्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानवर आठ गडी आणि ११ चेंडू राखून मात केली. न्यूझीलंडने या विजयासह उपांत्य फेरी गाठली असून अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.

राज्यात दिवसभरात १ हजार ६३ रूग्ण करोनामुक्त ; ८९२ नवीन करोनाबाधित :
  • राज्यात आज दिवसभरात १ हजार ६३ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ८९२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, १६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५९,१०८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६ टक्के एवढे झाले आहे.

  • आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१७,६५४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०३८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३२,४०,७६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१७,६५४ (१०.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४८,७४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १४,५२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

०८ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.