चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ मे २०२१

Date : 8 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
INS विक्रमादित्यवर आग; नियंत्रण मिळवण्यात यश, नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली माहिती :
  • भारतीय नौदलाच्या विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. ही आग अगदीच छोट्या स्वरुपाची होती. या आगीमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. यासंदर्भातील माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनीच दिलीय. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. सध्या आयएनएस विक्रमादित्य कारवारच्या बंदरामध्ये आहे.

  • आयएनएस विक्रमादित्यच्या सेलर अ‍ॅकोमोडेशन कम्पार्टेमेंट म्हणजेच नौकेवर असणाऱ्यांची राहण्याची सोय असणाऱ्या भागामध्ये आग लागली. या भागामधून आग आणि धूर बाहेर येऊ लागल्यानंतर फायर फायटिंग ऑप्रेशन लॉन्च करण्यात आलं. तातडीने ही आग विझवण्यात आली. नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यात आली असून नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

  • “ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना युद्ध विमानाच्या सैनिकांच्या राहण्यासाठी राखीव असलेल्या भागातून धूर येताना दिसला. त्यानंतर ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. युद्धनौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मोजणी करण्यात आली. कोणतेही मोठे नुकसान झालेलं नाही,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून हे जहाज सध्या बंदरावर असल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.

रशियाच्या एकमात्रा लशीस मान्यता :
  • ‘स्पुटनिक लाइट’ या लशीला मान्यता मिळाल्याची माहिती रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने दिली आहे. ही एक मात्रेची लस आहे. त्याची परिणामकारकता ८० टक्के असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ‘स्पुटनिक लाइट’ लशीने लसीकरणाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा मुकाबला करणे सोपे होणार आहे.

  • रशियाच्या गमालेया इन्स्टिट्यूट या संस्थेने तयार केलेली स्पुटनिक लस कोविड विरोधात ७९.४ टक्के परिणामकारक आहे. ‘स्पुटनिक लाइट’ लशीची एक मात्रा १० डॉलर्सला मिळणार आहे. या लशीचीही निर्यात केली जाणार आहे.

  • आरडीआयएफने निवेदनात म्हटले आहे, की एक मात्रेची ‘स्पुटनिक लाइट’ लसमात्रेची निर्यातही केली जाणार आहे. मात्रा दिल्यानंतर २८ दिवसांनी तपासणी केली असता त्यात चांगले परिणाम दिसून आले आहेत. ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान एक मात्रेच्या लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

बौद्धिक संपदा हक्कमाफीचे अमेरिकेत स्वागत :
  • अमेरिकेने कोविड १९ प्रतिबंधक लशींवरचे बौद्धिक संपदेचे व्यापारविषयक हक्क काही प्रमाणात तूर्त माफ केल्याने त्या निर्णयाचे अमेरिकी काँग्रेस सदस्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोविड १९ प्रतिबंधक लशींचे उत्पादन व वितरण यात सोय होणार आहे.

  • अमेरिकी काँग्रेसचे सदस्य जेम्स कालबर्न यांनी सांगितले की, या घोषणेने इतर देशांतील लोकांना मदत होणार आहे. त्याशिवाय इतर विषाणू उपप्रकारांपासून अमेरिकी लोकांचे संरक्षण होणार आहे. अलीकडे प्रगत देशांत जे लसीकरण झाले आहे त्याचा लाभ  गमावण्याची भीती त्यामुळे कमी होणार आहे. बायडेन-हॅरीस प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे त्यात बौद्धिक संपदाविषयक काही नियम माफ केले आहेत. त्याचे आम्ही स्वागतच करतो. कारण त्यामुळे जगातील लोकांना सगळीकडेच लस उपलब्ध होणार आहे, त्यात भेदभाव राहणार नाही.

  • डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य फ्रँक पॅलोन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. बौद्धिक संपदा अधिकारातील काही नियम माफ करण्याचा हा निर्णय अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरिन यांनी घेतला आहे. जगभरात लशी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय उपयोगी आहे.

पुढील शनिवारपासून भारतीयांना ऑस्ट्रेलियात प्रवेश :
  • करोनाग्रस्त भारतातून परत येणाऱ्या नागरिकांवर घातलेली प्रवेशबंदी ऑस्ट्रेलिया पुढील शनिवारपासून उठवणार आहे. त्याच दिवशी पहिले विमान डार्विन विमानतळावर उतरेल, असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने देशाच्या इतिहासात प्रथमच काही देशांच्या नागरिकांवर प्रवेशबंदी लागू केली आहे.

  • ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटले आहे, की आता भारतातून येणाऱ्या लोकांनी ऑस्ट्रेलियात आल्यानंतर १४ दिवस विलगीकरणात काढले तर आमची त्यांच्या परत येण्यास काहीच हरकत नाही. सरकारने भारतीय नागरिकांना ऑस्ट्रेलियात परत आल्यास पाच वर्षे तुरुंगवास व ६६ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड करण्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे  भारतात लोकांनी नाराजी व्यक्त केली होती.

  • संसद सदस्य, डॉक्टर्स, नागरी समुदाय व इतरांनी ऑस्ट्रेलियाने भारतीय नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची टीका केली होती. सरकारने १५ मे पर्यंत भारतीय नागरिकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. त्यामुळे १५ मे रोजी नागरिक ऑस्ट्रेलियात परत जाऊ शकणार आहेत.

तमिळनाडूत महिलांना मोफत बसप्रवास :
  • तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला करोनाचा मुकाबला करण्यासाठी दोन हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे  राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

  • आविन या शासकीय दूध योजनेतील दुधाचा दर १६ मेपासून तीन रुपयांनी कमी करण्याची घोषणाही स्टालिन यांनी केली.  द्रमुकचे अध्यक्ष  असलेल्या एम. के. स्टालिन यांनी शुक्रवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

  • स्टालिन यांच्यानंतर एकूण ३३ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली असून, त्यापैकी १५ जण प्रथमच मंत्री झाले आहेत.  मंत्रिमंडळात पी. गीता जीवन आणि एन. कयालविझी सेल्वराज या दोन महिला मंत्री आहेत.

ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा - मलिक, सीमा यशस्वी :
  • सुमित मलिक (१२५ किलो) आणि सीमा बिस्ला (५० किलो) यांनी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारून टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. पुरुषांमध्ये अमित धनकर (७४ किलो) आणि सत्यवर्त कडियान (९७ किलो) तर महिलांमध्ये निशा (६८ किलो) आणि पूजा (७६ किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

  • फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो भारताचा चौथा मल्ल आहे. पुरुषांमध्ये रवी दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो) आणि दीपक पुनिया (८६ किलो) तर महिलांमध्ये विनेश फोगट (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो) आणि सोनम मलिक (६२ किलो) यांनी ऑलिम्पिकमधील स्थान आधीच निश्चित केले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारताच्या चार कुस्तीपटू महिला सहभागी होत आहेत.

  • २०१८मधील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मलिक प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे २८ वर्षीय मलिकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सीमाने उपांत्य सामन्यात पोलंडच्या अ‍ॅना लुकासियाकला पराभूत केले.

०८ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.