चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ मे २०२०

Date : 8 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एवढ्यात सुटका नाही - देशात जून-जुलैमध्ये उच्चांकावर पोहोचणार करोना रुग्णांची संख्या :
  • सध्या संपूर्ण देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनदरम्यान करोनाच्या वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसला असला तरी दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांवर गेली आहे. यादरम्यान एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “सध्या दोन गोष्टींकडे प्रामुख्यानं पाहण्याची गरज आहे.

  • जशी जशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, तसं आपण चाचण्याही वाढवत आहोत. जर आपल्याला या लढाईत यशस्वी व्हायचं असेल तर चाचण्या कितीही वाढल्या तर करोनाग्रस्तांच्या केसेस कमी होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल,” असं गुलेरिया म्हणाले.

  • जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरच करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ रोखली जाईल किंवा ती संख्या कमी होईल. सरकारला कोविड सेंटर्स, चाचण्यांमध्ये वाढ आणि हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या ठिकाणी कठोरपणे नियमांचं पालन करणं सरकारला सुरू ठेवावं लागेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना :

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या महासाथीमुळे बाधित झालेल्या देशभरातील कुटुंबांना मोफत धान्यपुरवठा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून त्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली आहे.

या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे 

  1. करोनाच्या महासाथीमुळे अन्नधान्याचा तुटवडा होऊ शकतो किंवा अन्नधान्य उपलब्ध होऊ शकत नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने गरीब कुटुंबांसाठी तीन महिन्यांचे धान्य पुरवण्याचे ठरवले आहे.
  2. ८० कोटी लोकांना म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  3. त्यांना सध्या मिळत असलेल्या धान्याच्या दुप्पट धान्य पुढील तीन महिने देण्यात येणार असून ते मोफत असणार आहे.
  4. या योजनेंतर्गत करोनामुळे बाधित झालेल्या देशभरातील गरीब कुटुंबांना १२० लाख मेट्रिक टन धान्य वितरित केले जाणार आहे.
  5. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार येणाऱ्या कुटुंबांना एप्रिल, मे आणि जून २०२० मध्ये त्यांना मिळणाऱ्या धान्याच्या दुप्प्ट धान्य मिळणार असून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभधारकांनाही त्यांना मिळणाऱ्या नियमित धान्याबरोबरच ५ किलो जास्तीचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. या योजनांना राज्य सरकारकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून ६ मेपर्यंत ६९.२८ लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे.
दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे निधन :
  • दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मालविका मराठे यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मेंदूच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. गुरुवारी दुपारी अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.

  • मालविका यांनी सुरुवातीला आकाशवाणीत हंगामी उद्घोषक म्हणून काम केले. त्यानंतर त्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘हॅलो सखी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जवळपास १२ वर्षे सूत्रसंचालन करत होत्या. या कार्यक्रमामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या होत्या.

कर्नाटक - स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय :
  • रेल्वेला करण्यात आलेली विनंती एकाएकी मागे घेण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्नाटक सरकारने आता घूमजाव केले आहे.

  • राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी कर्नाटक सरकारने शुक्रवारपासून विशेष गाडय़ांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्थलांतरित कामगार ज्या राज्यांमधील आहेत त्या राज्यांकडून मान्यता देण्याची मागणी केली आहे.

  • झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देणारे पत्र कर्नाटक सरकारने गुरुवारी पाठविले असून या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याबाबत संबंधित राज्य सरकारने मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

ज्येष्ठ खो-खो सांख्यिकीतज्ज्ञ रमेश वरळीकर यांचे निधन :
  • खो-खो क्रीडा प्रकारातील ज्येष्ठ सांख्यिकीतज्ज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८३व्या वर्षी माहीमच्या सुखदा नर्सिग होम रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

  • खो-खोसाठी महत्त्वपूर्ण सांख्यिकी गोळा करण्यात वरळीकर यांचा हातखंडा होता. परंतु प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. दादरच्या लोकसेना मुलींच्या संघाचे यशस्वी प्रशिक्षक म्हणून त्यांना ओळखले जायचे. राष्ट्रीय खेळाडू डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय, दिनेश परब यांसारखे नामांकित खेळाडू घडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

  • १९७० पर्यंत त्यांनी खो-खोचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले. त्याशिवाय वरळीकर हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते. त्यांनी अनेक सामन्यांत पंच म्हणूनही काम केले. भाई नेरुरकर चषकापासून अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी व्यवस्थापकाचीही भूमिका बजावली.

  • १९७०नंतर वरळीकरांनी खऱ्या अर्थाने खो-खोमधील प्रत्येक खेळाडूची आणि स्पर्धेची सांख्यिकी गोळा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यासाठी त्यांनी खो-खोच्या नोंदींचे पुस्तक लिहितानाच सांख्यिकीविषयक पुस्तकही लिहिले. वरळीकरांनी खो-खोविषयी एकंदर १४ पुस्तके लिहिली. एखाद्या सामन्यात एखाद्या संघाने किती ‘खो’ दिले अथवा किती वेळा नियमोल्लंघन केले, याची ते अद्ययावत माहिती ठेवायचे. वरळीकरांच्या आग्रहास्तव महाराष्ट्र खो-खो संघटनेमध्ये सांख्यिकीचा विभाग सुरू करण्यात आला. यासाठी अरुण देशपांडे, मनोहर साळवी यांनीही त्यांना सहकार्य केले.

०८ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.