चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जानेवारी २०२२

Updated On : Jan 08, 2022 | Category : Current Affairs


महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा लांबणीवर :
 • करोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे ६८वी महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर नवीन तारखा जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली परभणी जिल्हा कबड्डी संघटना आणि परभणी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ जानेवारी महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार होती. दोन दिवसांपूर्वीच क्रीडांगणांच्या तयारीला जोरदार प्रारंभ झाला होता. या स्पर्धेकरिता देशातील जवळपास ३० राज्यांचे संघ सहभागी होणार होते.

 • पण सध्या देशात करोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाचे नियम अधिक कठोर केले असून, याची दखल घेत व खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर विचार करून राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी, सरचिटणीस आस्वाद पाटील व संयोजन समितीचे प्रमुख आमदार सुरेश वरपूडकर यांनी संपर्क करून स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

 • कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर लवकरच स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांनी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.

सिडनी पॉइटिए यांचे निधन :
 • श्वेतवर्णीय कलाकारांचे वर्चस्व असणाऱ्या हॉलीवूडमध्ये १९५० आणि ६०च्या दशकात मुख्य भूमिकांना गाजविणारे  कृष्णवर्णीय अभिनेते सिडनी पॉइटिए यांचे वृद्धापकालाने बहामास येथे निधन झाले.

 • सिनेजगतातील परमोच्च पुरस्कार ऑस्करवर मोहर उमटविणारे ते पहिले कृष्णवर्णीय अभिनेते होत. त्यांच्या प्रेरणेतून कसदार कृष्णवर्णीय कलाकारांची फळी नंतरच्या दशकांत उभी राहिली.

 •  ‘लिलिज ऑफ द फिल्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९६३ साली ऑस्कर पुरस्कार मिळाला  होता. अमेरिकेत जन्मलेले आणि कॅरेबियन बेटांवर शेतकरी कुटुंबात वाढलेले पॉइटिए यांनी तरुणपणी अमिरिकी कृष्णवर्णीयांच्या रंगभूमीपासून अभिनयाचा आरंभ केला.

 • अनेक वर्षे नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी हॉलीवूडची वाट धरली. ‘नो वे आऊट’, ‘इन द हीट ऑफ द नाईट’, ‘गेस हूज र्कंमग टू डिनर’, ‘टू सर विथ लव्ह’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका सर्वाधिक गाजल्या.

भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा;अभिनंदनासोबतच पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन, म्हणाले :
 • करोना आला, त्याने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं नुकसान केलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना त्रास झाला, काही जण अगदी मरणाच्या दारातून परत आले. करोनाचं भयंकर रुप देशाने पाहिलं. आता या करोनाचं करायचं काय? असा प्रश्न प्रशासनासह सर्वांनाच पडला.

 • काही काळ करोनाशी निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरणाचं प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडलं आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पार केला आहे.

 • देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे.

 • पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याच्या नोंदी जतनाचे आदेश; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात याचिका :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्याशी संबंधित सर्व नोंदी त्वरित सुरक्षित जतन करून ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना शुक्रवारी दिले.

 • पंजाब सरकार, पंजाब पोलीस, एसपीजी आणि अन्य केंद्रीय तसेच राज्यस्तरीय संस्थांनी संबंधित नोंदी जतन करण्यासाठी महानिबंधकांना सहकार्य करून आवश्यक ती मदत करावी, असे निर्देश सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले.

 • या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला होणार असून तोपर्यंत पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित सुरक्षा उपायांमध्ये राहिलेल्या त्रुटींबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांचे काम थांबवण्यात यावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला दिले. मोदी यांच्या पंजाब.

 • दौऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळलेल्या कथित सुरक्षा त्रुटींबाबत सखोल चौकशीच्या मागणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरक्षा त्रुटीच्या या प्रकरणात केंद्राने ‘‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’’ असण्याची शंका व्यक्त करून तपासात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सहभागी करण्याचीही मागणी केली आहे.

‘नीट-पीजी’ला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण कायम :
 • सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण कायम ठेवत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या (नीट-पीजी २०२१) समुपदेशनास (काऊन्र्सिंलग) अंतरिम परवानगी दिली. प्रवेश प्रक्रियेसाठी ‘तातडीची गरज’ म्हणून हा निर्णय देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 • सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पदव्युत्तर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. ‘नीट-पीजी’मध्ये ओबीसींना २७ टक्के, आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला १० टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्याच्या आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या निकषाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आर्थिक दुर्बल घटक निश्चित करण्यासाठी आठ लाख रुपये वार्षिक  उत्पन्नाचा निकष लागू करण्याबाबतच्या मुद्द्यावर खंडपीठाने गेले दोन दिवस सुनावणी घेतली. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीची बाब म्हणून शुक्रवारी न्यायालयाने अंतरिम आदेश दिला.

 • २९ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिशीनुसार अखिल भारतीय जागांमध्ये (कोटा) ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाच्या आधारावर नीट-पीजी २०२१ आणि नीट-यूजी २०२१ (पदवीपूर्व)बाबत समुपदेशन करण्यात यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्या, याचिकांची अंतिम सुनावणी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.

 • सन २०२१-२२च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी केंद्र सरकार आणि वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) २९ जुलै २०२१ रोजी नोटीस प्रसिद्ध केली होती. तीत ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. या नोटिशीला दोन डॉक्टरांनी आव्हान दिले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण द्यायचे असेल तर अडीच लाखांची उत्पन्नमर्यादा घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

०८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)