स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत हा किताब पटकावला. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले.
दक्षिण अफ्रेकत जन्मलेल्या मस्क यांची काल १८८.५ अब्ज डॉलर संपत्तीची नोंद झाली. ही बेजोस यांच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दरम्यान, जेफ बेजोस ब्लूमबर्गच्या या यादीत ऑक्टोबर २०१७ पासून पहिल्या स्थानावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. एका निरिक्षणानुसार, गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली. चांगला फायदा झाल्याने गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत ७४३ टक्के वाढ झाली. सहा जानेवारीपर्यंत एलन मस्क यांची संपत्ती १८१ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तेव्हापासूनच बेजोस यांचे अव्वल स्थान डळमळीत झाले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलल्या. राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या. मात्र, एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर संघटनांकडून परीक्षा घेण्यास विरोध दर्शवण्यात आला.
मात्र आता सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून(एसईबीसी) अर्ज केल्यास उमेदवारांना खुल्या किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास (ईडब्लूएस) प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे परीक्षा घेण्याचा तिढा सुटला असून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात राज्य शासनाची चर्चा करून आयोगाने परीक्षांच्या तारखा ठरवल्या आहेत. त्याप्रमाणे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा व अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा मार्च महिन्यात तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. आयोगाने किमान वर्षभरापासून रखडलेल्या परीक्षांच्या तारखा तरी जाहीर कराव्या, अशी मागणी परीक्षार्थीकडून केली जात होती.
‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षेच्या तारेख संदर्भात आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार ३ जुलै २०२१ रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. यावेळी पोखरियाल यांनी आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता आणि नियमांबाबत देखील माहिती दिली.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना या घोषणेची प्रतीक्षा होती. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर, ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षा कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
या परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना पोखरियाल यांनी सांगितले की, आपण अद्याप पूर्णपणे करोनाच्या संकटातून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जेईईद्वारे आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. याची विद्यार्थ्यांना मदत होईल. आयआयटी खरगपूर या परीक्षेचं आयोजन करणार आहे.
महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला महाराष्ट्र शासनाने गुरुवारी परवानगी दिली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पाठपुरावा केला होता. करोनाविषयक सर्व शिष्टाचारांचे पालन करून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष संपर्क असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये कुस्तीचा समावेश होता. याआधी वैयक्तिक कौशल्य आणि तंदुरुस्तीपुरती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रमाणित कार्यपद्धतीनुसार परवानगी होती. मात्र शासनाच्या या आदेशाने अन्य स्पर्धा संयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.
सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मन स्कॅनिंग, इत्यादी कोविड-१९ करिता घालून दिलेल्या सर्व निकषांचे पालन करण्याच्या अटीवर स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली असल्याचे शासनाने पत्रकात म्हटले.
‘‘शासनाने दिलेल्या अटी-शर्तीनुसार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परवानगी मिळाली आहे. आता कार्यकारिणी समितीच्या बैठकीत आम्ही आयोजनाचे धोरण ठरवू,’’ अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.