चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ ऑगस्ट २०२१

Date : 8 August, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रा लशीस परवानगी :
  • जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी दिली.

  • ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीला परवानगी देण्यात आल्याने करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला बळ मिळेल, असे मंडाविया यांनी सांगितले. जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकी औषध उत्पादक कंपनी आहे.

  • ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रेच्या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली असून आता आपत्कालीन वापरासाठी भारतात पाच लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या करोनाविरोधी लढाईला चालना मिळेल, असे आरोग्यमंत्री मंडाविया यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. तर लस वापरास परवानगी मिळाल्याने करोनाची साथ संपवण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे.

  • भारत सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या एक मात्रेच्या लशीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे.

  • सर्व भागांमध्ये तिच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही ती संरक्षण करते, असा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने केला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने ५ ऑगस्टला एक मात्रा लशीला आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.

“नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद” :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसारमाध्यमांसमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे.

  • महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अकाऊंटवरुन दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये काहीच दिसत नसून केवळ ब्लॅक आऊट झालेला काळा आयताकृती फोटो पोस्ट करण्यात आलाय. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पत्रकार परिषदेमध्ये आलेच नाहीत असं या फोटोमधून अधोरेखित करण्यात आलं आहे.

  • तसेच हा फोटो शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसने #BJPFearsRahulGandhi हा हॅशटॅगही वापरला आहे. पत्रकार परिषदेतील राहुल गांधी आणि कधीही पत्रकार परिषद न घेणारे मोदी अशी तुलना करत काँग्रेसने, “..म्हणूनच भाजपा राहुल गांधींना घाबरते,” असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देशभरात मागील २४ तासात ४९१ रूग्णांचा मृत्यू ; ४३ हजार ९१० जण करोनातून बरे :
  • देशातील करोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची भीती देखील तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. अद्यापही रोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.

  • तर, देशात मागील काही दिवस सलग दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर आता कालपासून पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.

  • देशभरात मागील २४ तासात ४३ हजार ९१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

  • आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही ३,१९,३४,४५५ झाली आहे. देशात ४,०६,८२२ अॅक्टिव्ह रूग्ण असून, एकूण ४,०६,८२२ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत देशात ४,२७,८६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार :
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सय्यदभाई, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, पोपटराव पवार तसेच सरस्वती सन्मान विजेते साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या कार्याचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गौरव करण्यात आला. पुण्यात आयोजित केलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपले विचार मांडले.

  • “मोदी सरकारनं पद्म पुरस्काराचे निकष बदलले. या आधी अनेक लोक पुरस्कारापासून वंचित राहिले होते. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणलं पाहीजे. वर्षानुवर्षे मूलभूत कार्य केलेल्यांचा हा गौरव आहे. दलित समाजाीची परिस्थिती पाहिती तर अजून खूप काळ आरक्षण राबवावं लागेल अशी स्थिती आहे. अनेक मागास समाजात आरक्षणाचे मिळालेले नाहीत. एक मोठा वर्ग आरक्षणापासून वंचित आहे.”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “विरोधी विचार असेल, विद्रोही विचार असेल याला प्रसिद्धी जास्त आहे.

  • प्रवाहासोबत जाणं आणि प्रवाहाविरुद्ध जाणं या दोनच गोष्टी पाहायला मिळतात. पण या दोघांचा समन्वय साधून एक वेगळा विचार देखील मांडला जाऊ शकतो. तो खरा शाश्वत विचार आहे. शाश्वत विचार हा समन्वयाचा असू शकतो. त्यामुळे खडतर मार्गाने जावं लागलं.”, असंही ते पुढे म्हणाले.

अकरावी प्रवेशांत राखीव जागांवरही ‘सीईटी’ला प्राधान्य :
  • केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) या राखीव जागांवरील प्रवेश गुणवत्तेनुसार करणे आवश्यक असल्यामुळे या राखीव जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सीईटी न देता अकरावी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशांसाठी ऑफलाइन पद्धतीने सीईटी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सीईटी ऐच्छिक असली तरी अकरावीच्या प्रवेशांत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.  केंद्रीय संस्थांतर्गत राखीव जागा १० टक्के, व्यवस्थापनासाठीच्या राखीव जागा ५ टक्के आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये अल्पसंख्याक राखीव जागा ५० टक्के असतात.

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात राखीव जागांचा तपशील दिला असला, तरी राखीव जागांवर सीईटी दिलेल्या आणि सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे धोरण स्पष्ट के ले नसल्यामुळे पालक व विद्यार्थाकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. 

  • माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप म्हणाले, ‘‘अकरावी प्रवेश प्रक्रियेत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे स्पष्ट के लेले आहे. तसेच राखीव जागांवर गुणवत्तेला प्राधान्य देऊन प्रवेश देणे आवश्यक आहे. त्यामुळे राखीव जागांवर प्रवेश देताना सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.’’

भारताच्या ऑलिम्पिक यशाचे परदेशी शिल्पकार :
  • टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताच्या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार हे परदेशी प्रशिक्षक आहेत. भारताच्या सात पदकविजेत्यांपैकी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू वगळता सहा क्रीडापटूंचे प्रशिक्षक हे परदेशी आहेत.

  • नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह शनिवारी भारताच्या टोक्यो ऑलिम्पिक अभियानाची सांगता झाली. लंडन ऑलिम्पिकच्या सर्वाधिक सहा पदकांचा विक्रम टोक्योमध्ये सात पदकांनिशी मोडित निघाला. भालफेकीसह अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात देशाला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या नीरजचे प्रशिक्षक हे जर्मनीचे उव होन आहेत.

  • होन यांनी स्वत: भालाफेकपटू म्हणून यशाची अनेक शिखरे सर केली असून १०० मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करणारे ते आजही विश्वातील एकमेव क्रीडापटू आहेत. त्याशिवाय भारतासाठी कुस्तीमध्ये पदक मिळवणाऱ्या रवी दहिया आणि बजरंग पुनिया यांना अनुक्रमे रशियाचे कमाल मालिकोव्ह आणि जॉर्जिआचे शाको बेन्टिन्डिस यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

  • बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दक्षिण कोरियाचे पार्क टाय संग यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा पराक्रम केला. सिंधूने कांस्यपदकाची लढत जिंकल्यावर पार्क यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. सिंधूसह त्यांचेही भारतात उत्साहाने स्वागत करण्यात आले. हॉकीमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक मिळवणाऱ्या पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाच्या ग्रॅहम रीड यांनी विजयाची दिशा दाखवली, तर महिला संघाला कांस्यपदक जिंकता आले नसले, तरी त्यांच्या वाटचालीत नेदरलँड्सचे शोर्ड मरिन यांनी निर्णायक भूमिका बजावली.

इतिहास घडवणाऱ्या गोल्डन बॉय नीरज चोप्राला पंतप्रधान मोदींचा फोन कॉल :
  • भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकला. ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला १३ वर्षानंतर दुसरे सुवर्ण मिळाले आहे.

  • २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमधील अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते त्याचे अभिनंदन करत आहेत.

  • दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रासोबत फोनवर बातचीत केली. नरेंद्र मोदी म्हणाले, “नीरज चोप्राशी आताचं बोलनं झालं आहे. त्याला सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढतेचे कौतुक केले. जे टोक्यो २०२० दरम्यान पूर्ण प्रदर्शनात होते. नीरज उत्कृष्ट खेळ आणि खेळाडू वृत्तीचा परिचय देतो. त्याला भावी आयुष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.”

  • यापुर्वी देखील नरेंद्र मोदींनी नीरजसाठी अभिनंदनाचे ट्विट  केले आहे. “नीरज चोप्रा यांनी टोक्योमध्ये इतिहास रचला आहे. हे यश देश नेहमी लक्षात ठेवेल.” असे मोदी म्हणाले होते.

०८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.