चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ ऑगस्ट २०२०

Date : 8 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच :
  • T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.

  • व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.

  • महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

केरळ विमान अपघात - राफेलची जबाबदारी असलेल्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते कॅप्टन दीपक साठे :
  • केरळमधील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमान अपघातात मृत्यू पावलेले विमानाचे पायलट कॅप्टन दीपक वसंत साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे. त्यांना ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ने गौरविण्यात आलं आहे. त्यांनी बराच काळ ‘गोल्डन अॅरोज-१७’ स्क्वॉड्रनमध्ये सेवा बजावली आहे. हे तेच स्क्वॉड्रन आहे ज्याच्याकडे नुकत्याच हवाई दलात सामिल झालेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारतात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

  • कॅप्टन दीपक साठे हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ५८व्या तुकडीचे विद्यार्थी होते. त्यानंतर सन १९८१ मध्ये हैदराबादमधील एअर फोर्स अकॅडमीमधून ‘स्वर्ड ऑफ ऑनर’ पटकावत उत्तीर्ण होऊन ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली.

  • दरम्यान, त्यांनी मिग-२१ या लढाऊ विमानाचंही उड्डाण केलंय, अशी माहिती निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी दिली. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. कॅप्टन साठे यांना बोईंग ७३७-८०० हे विमान चालवण्याचा अनुभव होता. नुकतेच त्यांनी एअरबस ए-३१० हे विमानही उडवले होते.

ऑगस्ट महिन्यात करोनानं तोडले सर्व विक्रम; जगातील सर्वाधिक रुग्णवाढ भारतात :
  • दिवसेंदिवस जभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, करोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव आता चिंतेचा विषय ठरत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत.

  • अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तर शुक्रवारीही भारतात करोनाचे ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल ९२६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला.

संशोधन, विश्लेषणातून विद्यार्थ्यांचे शिक्षण :
  • आतापर्यंत आपल्याला काय विचार करायचा हे शिकवले गेले, पण विचार कसा करायचा हे आता शिकवले जाईल. नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे संशोधन, चर्चा आणि विश्लेषणाच्या आधारावर विद्यार्थी शिकू लागतील. अभियंता, डॉक्टर, वकील बनवण्याच्या ‘कळप मानसिकते’तून ते बाहेर पडू शकतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

  • नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीची फक्त अधिसूचना काढली म्हणजे धोरण लागू होत नाही. त्यासाठी संबंधित सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांना प्रशिक्षण मिळेल. शिक्षकांची आकलनवाढ झाली की देश पुढे जातो, असे मला वाटते. त्यामुळे नव्या शिक्षण पद्धतीतून देशाचे वर्तमान आणि भविष्य बदलण्याच्या प्रक्रियेला ‘महायज्ञ’ मानले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

  • गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली. तब्बल ३४ वर्षांनंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली जाणार असून त्यानंतर कृती आराखडय़ाद्वारे पुढील २० वर्षांत ते टप्प्याटप्प्याने ते लागू होणार आहे.

  • ‘नव्या धोरणातून शालेय तसेच उच्चशिक्षणात आमूलाग्र बदल’ या विषयावरील चर्चासत्रात मोदी यांनी आगामी शिक्षण पद्धतीबद्दल मत मांडले. कुठल्याही देशाची शिक्षण पद्धती त्या देशाची मूल्ये जपणारी असावी आणि काळानुसार ती बदलत गेली पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण २१व्या शतकातील भारत घडवण्यासाठी भक्कम पाया ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अवघ्या काही रुपयांमध्ये मिळणार करोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत :
  • करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे.

  • सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.

  • GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

०८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.