चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ ऑक्टोबर २०२०

Date : 7 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीन, करोनाविरोधात ‘क्वाड’ एकजूट :
  • मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक पुढाकाराची संकल्पना ही चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी असली तरी करोना काळात निर्माण झालेल्या आव्हानांमुळे त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे, असे जपानचे नवनिर्वाचित पंतप्रधान योशिडे सुगा यांनी मंगळवारी क्वाड देशांच्या बैठकीवेळी सांगितले.

  • चार इंडो-पॅसिफिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक टोक्योत सुरू होत असून त्याआधी अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. त्यावेळी अमेरिका, जपान, भारत व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.

  • जपानचे पंतप्रधान सुगा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायापुढे करोनामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे या देशांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. एकमेकांच्या मतांचे आदानप्रदान केले पाहिजे. सुगा यांनी त्यांचे पूर्वाधिकारी शिन्झो अ‍ॅबे यांच्या प्रमाणेच सुरक्षा व राजनैतिक बाबतीत आक्रमक भूमिका चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पायने, भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर व जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांची स्वतंत्र बैठक नंतर  होणार आहे.  पॉम्पिओ यांनी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची वेगवेगळी भेट घेऊन आधी अनौपचारिक चर्चा केली. त्यांनी चीनच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली आहे. पॉम्पिओ यांनी चीनच्या एकाधिकारशाहीच्या कारवायांबाबत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पायने यांच्याजवळ चिंता व्यक्त केली. इंडो-पॅसिफिक भागात शांतता नांदावी यासाठीच क्वाड देशांचे प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कृष्णविवरांबाबतच्या संशोधनास नोबेल :
  • विश्वाच्या मानवी आकलनात मोलाची भर टाकणाऱ्या कृष्णविवरांची निर्मिती तसेच आपल्या दीर्घिकेच्या कें द्रस्थानी असलेल्या सर्वाधिक वस्तुमानाच्या कृष्णविवराचा शोध यासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना जाहीर झाला. त्यात जर्मनीचे रेनहार्ड गेन्झेल, अमेरिकेच्या आंद्रेआ गेझ आणि ब्रिटनचे रॉजर पेनरोझ यांचा समावेश आहे.

  • आतापर्यंत कृष्णविवरे हा अनेक वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यांचा विषय राहिला होता, त्याचे मूर्तरूप काही अंशी या संशोधनातून स्पष्ट झाले. त्यामुळे पूर्णपणे भिन्न योगदानासाठी या वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आला.  ब्रिटनचे वैज्ञानिक रॉजर पेनरोझ यांनी प्रथम गणिती आकडेमोडीने असे दाखवून दिले होते की, कृष्णविवरांची निर्मिती शक्य असते आणि त्यांचे ते गणित अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतावाद सिद्धांतावर आधारित होते.

  • गेन्झेल आणि गेझ यांनी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी धुळीचे आवरण असलेला एक भाग शोधून काढला. तेथे गूढ अशी क्रिया घडत होती, पण ती दिसत नव्हती. प्रत्यक्षात ते कृष्णविवर होते. ते साधे कृष्णविवर नव्हते तर सर्वाधिक वस्तुमानाचे कृष्णविवर होते. त्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या ४० लाख पटींनी अधिक होते. या संशोधनामुळे सर्व दीर्घिकांमध्ये अति जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे आहेत, याचा उलगडा शास्त्रज्ञांना झाला.

  • कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.  पुरस्काराची निम्मी रक्कम पेनरोझ यांना मिळणार आहे, असे रॉयल स्वीडिश अकादमीने म्हटले आहे.

क्वाड’ देशांच्या सहकार्याचा नवा अध्याय :
  • चीनच्या विस्तारवादी वर्तनावर चिंता व्यक्त होत असतानाच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी जपानमधील टोक्योत झालेल्या ‘क्वाड’ देशांच्या बैठकीत अप्रत्यक्षपणे चीनला लक्ष्य करीत नियमबद्ध जागतिक व्यवस्थेची अपेक्षा व्यक्त केली.  सदस्य देशांची प्रादेशिक एकता आणि सार्वभौमत्व यांचा मान राखून सध्याच्या वादांवर शांततामय तोडगा काढण्याचे आवाहन केले.

  • बैठकीत प्रारंभीच्या विवेचनात त्यांनी सांगितले की, इंडो-पॅसिफिक भागातील देशांचे आर्थिक व संरक्षण हितसंबंध जपण्याची गरज आहे.

  • जागतिक पातळीवर सध्या चीनचे आक्रमक वर्तन व भारतालगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पूर्व लडाख भागातील संघर्ष या पार्श्वभूमीवर ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू झाली.

  • गेल्या वर्षी पूर्व आशिया शिखर बैठकीत बँकॉक येथे  पंतप्रधान मोदी यांनी  ‘इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह’ ही संकल्पना मांडली होती. त्यात सागरी प्रदेशातील सुरक्षित वाहतुकीला महत्त्व देण्यात आले होते.

मागील काही काळापासून अनेक मुद्द्यांबाबत केंद्र सरकारकडून उत्तर देताना ‘नन्नाचा पाढा’ - शिवसेना :
  • मल्ल्याचे प्रकरण, ब्रिटनमधील प्रत्यार्पणाचे कायदे, त्याबाबत हिंदुस्थानातील स्थिती हा गुंतागुंतीचा आणि नाजूक विषय आहे हे खरेच. पण प्रश्न केंद्रातील सरकारच्या सध्याच्या हात वर करण्याच्या सवयीचा आहे.

  • मागील काही काळापासून अनेक मुद्द्यांबाबत केंद्र सरकार उत्तर देताना ‘नन्नाचा पाढा’ वाचत आले आहे, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.

  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सरकारने दिलेले उत्तर याच पाढय़ाची आणखी एक कडी आहे. उत्तर गैरसोयीचे किंवा राजकीयदृष्ट्या अडचणीचे असले तर ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हे धोरण कामचलाऊ आणि तात्पुरती पळवाट म्हणून ठीक असते. मात्र त्यातून सरकारची ‘घडी’ नीट नाही असे चित्र उभे राहते, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

०७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.