चालू घडामोडी आणि दिनविशेष - 07 मे 2023

Date : 7 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शाही सोहळ्यात चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक
  • लंडनमधील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये शनिवारी झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे चाळिसावे राजे म्हणून संगीतमय वातावरणात  थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला. पावसाळी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे, चार्ल्स यांच्या मातोश्री, राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांपूर्वी झालेल्या राज्याभिषेकाच्या आठवणी जाग्या झाल्या.
  • ‘गॉड सेव्ह दि किंग’चा उद्घोष, चर्चच्या घंटा आणि ट्रम्पेट वाजत असताना ७४ वर्षे वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना ३६० वर्षे जुना ‘सेंट एडवर्डस क्राऊन’ हा मुकुट घालण्यात आला.
  • राजे चार्ल्स व राणी कॅमिला हे नंतर पारंपरिक पोशाख परिधान करून बकिंगहॅम राजवाडय़ाच्या सज्ज्यात आले. त्यांच्या सोबत राजपुत्र व राजपुत्री वेल्स, विल्यम व केट आणि मोजके राजनिष्ठ लोक होते. नव्याने अनभिषिक्त सम्राट- सम्राज्ञीची झलक पाहण्यासाठी पावसाची पर्वा न करता अनेक तास वाट पाहात थांबलेल्या हजारो नागरिकांना या सर्वानी अभिवादन केले.
  • या ऐतिहासिक सोहळय़ाचा भव्य समारोप रॉयल एअर फोर्सच्या फ्लायपास्टने करण्याचे नियोजन होते, मात्र सर्द वातावरणामुळे हा कार्यक्रम थोडक्यात आटोपण्यात आला. लष्करी वाद्यवृंद ब्रिटनचे राष्ट्रगीत वाजवत असताना गर्दीने जल्लोष केला.
  • यापूर्वी, जवळजवळ एक हजार वर्षांची परंपरा असलेला दोन तासांचा धार्मिक समारंभ पावित्र्य राखून साजरा करण्यात आला. राजे चार्ल्स यांनी आर्चबिशप ऑफ कँटरबरी यांच्यासमोर ‘सेवेची शपथ’ (ओथ ऑफ सव्‍‌र्हिस) घेतली. या पवित्र समारंभाचा भाग म्हणून चार्ल्स व कॅमिला यांनी प्रतीकात्मक पुनर्विवाह केला. मे १९३७ मध्ये राजे पाचवे जॉर्ज व राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वापरल्या गेलेल्या खुर्च्याच याही राज्याभिषेकासाठी वापरण्यात आल्या. ब्रिटनमधील आतापर्यंतचे सर्व राज्याभिषेक सोहळे वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्येच झाले आहेत.
मुस्लीम विद्यार्थ्याची कमाल! संस्कृत बोर्डाच्या परिक्षेत राज्यात अव्वल, १३ हजार मुलांना टाकलं मागे
  • उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षा परिषद बोर्डाने हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बलिया येथील रहिवासी असलेल्या आदित्य सिंह हायस्कूल परिक्षेत ९२.५० टक्के गुणांसह अव्वल ठरला आहे. तर चंदौलीच्या इरफानने ८२.७१ टक्के गुणांसह इंटर परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे. तर गंगोत्री देवीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तर प्रदेशात यंदा १३,७३८ विद्यार्थ्यांनी १२ वीची (संस्कृत) परिक्षा दिली. तर ५० हजारांहून अधिक विद्यार्थी १० वीच्या (संस्कृत) परिक्षेला बसले होते.
  • १२ वीच्या परिक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या इरफानला संस्कृत शिक्षक व्हायचं आहे. मेरिट यादीत पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये तो एकमेव मुस्लीम विद्यार्थी आहे. इरफान हा उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे वडिल सलाउद्दीन हे शेतमजूर आहेत. संस्कृत परिक्षेत तो राज्यात पहिला आला आहे. मंडळाकडे संस्कृत भाषा आणि साहित्य हे दोन अनिवार्य विषय आहेत, यासह इतर विषय देखील आहेत.
  • इरफानचे वडील सलाउद्दीन म्हणाले, “मी एक शेतमजूर आहे. मला दिवसाला ३०० रुपये मजुरी मिळते. महिन्यातले काहीच दिवस काम मिळतं. आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने मला इरफानला खासगी किंवा इतर कोणत्याही शाळेत पाठवणं शक्य नव्हतं. परंतु तो माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मला त्याला शिकवायचं होतं. मग मला संस्कृत शाळेची माहिती मिळाली. या शाळेत ४०० ते ५०० शुल्क घेतलं जातं.”
  • सलाउद्दीन म्हणाले, इरफान अभ्यासात उत्तम आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्याने संस्कृत भाषेत रस घेतला. त्याने खूप अभ्यास केला. दरम्यान, कोणतीही तक्रार केली नाही. आमचं घर लहान आहे, घरात कोणत्याही सुविधा नाहीत. तरीदेखील त्याने चांगलं यश मिळालं.
“जर भारताने ‘ही’ लेखी हमी दिली, तर आम्ही भारतात येऊ”; पाकिस्तानची भारतासमोर मोठी अट
  • एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन यंदा भारतात होणार आहे. त्यामुळे पीसीबीने आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी बीसीसीआय समोर एक अट ठेवली आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून लेखी हमी हवी आहे, की २०२५ मध्ये होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत सहभागी होईल.
  • यावर्षी ५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी, बीसीसीआयने अहमदाबाद (भारत विरुद्धचा सामना), चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांना पाकिस्तानच्या सामन्यांसाठी संभाव्य यजमान म्हणून निवडले आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाखालील एसीसीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी प्रस्तावित ‘हायब्रीड मॉडेल’ची पुष्टी केली नाही. ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये, भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल, तर पाकिस्तान इतर सामने आयोजित करेल.

नजम सेठी दुबईत एसीसी अधिकाऱ्यांना भेटू शकतात -

  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, नजम सेठी ८ मे रोजी दुबईला रवाना होणार आहेत, जिथे ते एसीसी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईच्या भेटीदरम्यान सेठी पाकिस्तानच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू करतील अशी अपेक्षा आहे. २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसी पाकिस्तानला येण्याची लेखी हमी देत ​​नाही, तोपर्यंत ते भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळणार नाहीत.

नजम यांनी सरकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली -

  • सूत्राने सांगितले की, नजम सेठी यांनी नुकतीच काही सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून सल्लाही घेतला की जर आशिया कप लाहोर आणि दुबईमध्ये आयोजित केला गेला नाही, तर पीसीबीने आपल्या हायब्रीड मॉडेल योजनेअंतर्गत एसीसीला प्रस्ताव दिल्याप्रमाणे पाकिस्तानने आशिया कपमध्ये खेळावे का? ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये आशिया चषक आयोजित करण्याबाबत एसीसी सदस्यांना ठोस आणि स्पष्ट भूमिका देण्यासाठी सेठी यांना सरकारकडून संमती मिळाली आहे.
‘त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे’; एमएस धोनीकडून युवा गोलंदाजाचे कौतुक
  • आयपीएल २०२३ मध्ये शनिवारी (६ मे) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेपॉक स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात सीएसकेने एमआयवर ६ गडी राखून मात केली. सीएसकेकडून या सामन्यात मथीशा पाथिरानाने महत्वाची भूमिका बजावली. त्याने ४ षटकात केवळ १५ धावा देत ३ बळी घेतले. त्यामुळे येथील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून पाथीरानाची निवड करण्यात आली. सामना संपल्यानंतर कर्णधार धोनीने पाथिरानाची स्तुती करताना खास टिप्पणी केली. एमएस धोनीने म्हणाला, या गोलंदाजावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. धोनीने हे शेवटचे का सांगितले, त्यामागचे कारणही सांगितले.
  • धोनी म्हणाला, “तो (मथीशा) किती क्रिकेट खेळतोय यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. माझा विश्वास आहे की, तो अशा प्रकारचा खेळाडू नाही, ज्याने अधिक कसोटी क्रिकेट खेळावे. मला वाटते की त्याने वनडे फॉरमॅटही कमी खेळावे. होय, पण या (टी-२०)फॉरमॅटमध्ये त्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा खेळल्या पाहिजेत. तो असा गोलंदाज आहे, ज्याचा विशेष प्रसंगी वापर केला जाऊ शकतो. यासाठी, तो तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे आणि जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धा होतात तेव्हा त्यांच्यासाठी तो उपलब्ध असावा. तो श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.”

पाथिराना ‘ज्युनियर मलिंगा’ म्हणून ओळखला जातो -

  • धोनीने बहुधा पाथिरानाच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवा असे म्हटले आहे. पाथिराना काहीसा लसिथ मलिंगासारखा गोलंदाजी करतो. त्याला ‘ज्युनियर मलिंगा’ असेही म्हणतात. अशा प्रकारच्या बॉलिंग अॅक्शनसह अधिक क्रिकेट खेळणे हे गोलंदाजासाठी दुखापतीचे प्रमुख कारण बनू शकते. कदाचित त्यामुळेच धोनीने त्याला फक्त मोठ्या स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला असेल.

बदली खेळाडू म्हणून सीएसकेमध्ये सामील झाला होता -

  • चेन्नई सुपर किंग्जसाठी या मोसमात पाथिराना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील वर्षी बदली खेळाडू म्हणून पाथीरानाचा सीएसके संघात समावेश करण्यात आला होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याला फक्त काही संधी मिळाल्या, परंतु यावेळी एमएस धोनी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सतत स्थान देत आहे.

07 मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.