चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ मे २०२१

Date : 7 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आम्ही माध्यमस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते :
  • न्यायालयीन सुनावणीदरम्यान काय घडले, याबाबत माहिती जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे सुनावणींचे वार्तांकन झालेच पाहिजे, असे नमूद करत आपण माध्यमस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. न्यायालयाच्या मौखिक निरीक्षणांचे वार्तांकन करण्यास माध्यमांना मज्जाव करण्याची निवडणूक आयोगाची मागणी न्यायालयाने फेटाळली.

  • करोनाच्या दुसऱ्या लाटेस निवडणूक आयोग जबाबदार आहे, असे निरीक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने आयोगाच्या पदाधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हे नोंदवण्याबाबत मत व्यक्त केले होते. याविरोधात निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.

  • उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या दोन घटनात्मक संस्था आहेत, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना समतोल साधण्याचा प्रयत्ना केला. मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी कठोर होती. गैरसमज होऊ शकणारी विधाने करताना न्यायाधीशांनी सावधगिरी बाळगावी, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

  • न्या. चंद्रचूड यांनी यावेळी न्यायालयीन भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. मात्र, त्याचवेळी मद्रास उच्च न्यायालयाची निरीक्षणे अधिकृत न्यायिक आदेशाचा भाग नसल्याने ती वगळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने निवडणूक आयोगाची मागणी फेटाळली.

करोनाच्या लाटेच्या थैमानाने देशापुढील आर्थिक आव्हानांत वाढ :
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येत वाढ आणि मृत्यूचे थैमान सुरू असलेले आणि परिस्थितीने असे संकटरूप धारण करण्याला जबाबदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपकडे बोट दाखविले जात असले तरी त्यांच्या राजकीय जनाधारात फारसा पडलेला नाही. त्यामुळे येत्या काळात देशापुढे कोणताही राजकीय पेच निर्माण होणार नसला तरी आर्थिक आव्हानांची मालिका मात्र उभी राहण्याची दाट शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच’ने गुरुवारी मत व्यक्त केले.

  • एका दिवसात सर्वाधिक ४,१२,२६२ इतक्या भयानक प्रमाणात बाधित रुग्णसंख्येत वाढ आणि दिवसाला सरासरी चार हजार मृत्यूंची नोंद हे करोना विषाणूजन्य साथीचे थैमान पाहता, देशाची आरोग्य यंत्रणाही मोडकळीस आल्याचे दिसून येते, असे ‘फिच’चे निरीक्षण आहे.

  • यावर नियंत्रण म्हणून योजलेल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे आर्थिक पुनर्उभारीतून जे काही कमावले त्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. अर्थात, गेल्या वर्षातील देशस्तरावरील कडक टाळेबंदीच्या तुलनेत, यंदाच्या निर्बंधांचे स्वरूप स्थानिक स्वरूपाचे आहेत, याचीही ‘फिच सोल्युशन्स’ने दखल घेतली आहे. तरीही २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात दोन अंकी वाढ शक्य दिसत नसल्याचे आणि वाढीचा दर ९.५ टक्क्यांवर सीमित राहण्याचे तिचे भाकीत आहे.

चार सदस्यीय सत्यशोधन समितीची गृह मंत्रालयाकडून स्थापना :
  • पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचाराचा उद्रेक झाला त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आणि वस्तुस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने चार सदस्यांची सत्यशोधन समिती स्थापन केली असल्याचे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील पथक पश्चिम बंगालकडे रवाना झाले आहे.

  • निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचाराचा उद्रेक झाला त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याबाबतचे स्मरणपत्र बुधवारी गृह मंत्रालयाने पाठविले होते. त्याचप्रमाणे हिंसक घटना थांबविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यासही सांगण्यात आले होते. राज्य सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत तर या घटनांची गंभीर दखल घेण्यात येईल, असा इशाराही मंत्रालयाने दिला होता.

  • निवडणुकीनंतर राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात मंगळवारपर्यंत सहा जण ठार झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या अनेक कार्यकत्र्यांची हत्या केली, महिला कार्यकत्र्यांवर हल्ला केला, अनेक घरांची मोडतोड केली आणि दुकाने लुटल्याचा आरोप भाजपने केला.

  • भाजपच्या १४ कार्यकत्र्यांची हत्या करण्यात आली आणि जवळपास एक लाख जण घर सोडून पळून गेले असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. या हिंसाचाराबाबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही त्यावरून त्यांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट होते, असेही नड्डा यांनी म्हटले आहे.

‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी तीन पर्याय :
  • १. संयुक्त अरब अमिराती - ‘आयपीएल’चा मागील हंगाम ‘बीसीसीआय’ने संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी करून दाखवला होता. भारतामधून ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हलवण्याचा निर्णय घेतल्यास अमिराती हाच पर्याय उपलब्ध आहे.

  • २. इंग्लंड - भारतीय संघ मेअखेरीस जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तिथेच ‘आयपीएल’चा दुसरा टप्पा खेळवता येऊ शकतो. ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी मिडलसेक्स, सरे, वॉर्विकशायर आणि लँकेशायर या चार इंग्लिश कौंटी संघांनी उत्सुकता दर्शवली आहे.

  • ३. ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियातील सरकारने येत्या चार महिन्यांत आपले हवाई धोरण बदलल्यास हा पर्याय अधिक सुरक्षित असेल.

भारतीय तिरंदाज विश्वचषकाला मुकणार :
  • स्वित्र्झलड दूतावासाने व्हिसा नाकारल्यामुळे भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले तिरंदाज लुसान येथे रंगणाऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला मुकणार आहेत.

  • भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून अनेक देशांनी प्रवासाच्या बाबतीत भारतावर र्निबध आणले आहेत. आता भारतीय तिरंदाज पॅरिस येथे २३ जूनपासून रंगणाऱ्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकतील. टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय महिला रिकव्‍‌र्ह संघाला ही शेवटची संधी असेल.

  • ‘‘स्वित्र्झलड दूतावासाने आम्हाला थोडय़ा कालावधीसाठीचा व्हिसा नामंजूर केला आहे. त्यामुळे आमच्याकडे विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फार कमी वेळ शिल्लत होता. आता आमचे लक्ष पॅरिसमध्ये रंगणाऱ्या तिसऱ्या टप्प्याकडे लागले आहे,’’ असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर यांनी सांगितले.

  • आतापर्यंत भारताच्या पुरुष संघाने आणि महिलांमध्ये वैयक्तिकपणे टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे. पॅरिसमध्ये दाखल झाल्यानंतर १० दिवसांच्या विलगीकरणात सूट मिळावी, अशी अपेक्षा भारतीय तिरंदाजी संघटनेला आहे.

अ‍ॅथलेटिक्स चाचणी स्पर्धाचे यशस्वी आयोजन :
  • जुलै महिन्यात होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स प्रकारातील शर्यतींचे योग्य प्रकारे आयोजन करता येईल, असा विश्वास जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख सबास्टिअन को यांनी व्यक्त केला.

  • जपानमधील सॅपपोरो येथे बुधवारी अर्ध-मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता लवकरच पूर्ण मॅरेथॉन आणि अन्य शर्यतींच्या आयोजनासाठीही जागतिक संघटना प्रयत्नशील आहे. यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, यांचा अंदाज येईल आणि त्यावर उपाय शोधून मुख्य ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा कोणत्याही अडचणींशिवाय संपन्न होतील, अशी माहिती को यांनी दिली. येत्या रविवारी आणखी एक चाचणी स्पर्धा रंगणार असून को स्वत: त्या स्पर्धेची पाहणी करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अहवाल सुपूर्द करणार आहेत.

  • ‘‘जपानमधील फक्त दोन टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अ‍ॅथलिट्सचे लसीकरण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. येथील सद्य:स्थितीची आम्हाला जाणीव आहे. मात्र ऑलिम्पिकमुळे जपानसह संपूर्ण विश्वात नवचैतन्य संचारेल,’’ असेही को यांनी सांगितले.

०७ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.