चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ मे २०२०

Date : 7 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप नाही, मग होणार गुन्हा दाखल :
  • करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि करोना संबंधित माहितीसाठी केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अॅप विकसित केलं आहे. या अॅपचा वापर करण्याचं आवाहनं केंद्र सरकारच्या वतीनं वारंवार केलं जात असून, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप अनिवार्य केलं आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे आरोग्य सेतू अॅप नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत.

  • करोनाविषयीच्या माहितीत सूसुत्रता आणण्यासाठी त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आरोग्य सेतू अॅप तयार केलं. हे अॅप देशभरात वापरलं जात आहे. तर अनेक जणांकडे हे अॅप नाही. दरम्यान, नोएडा पोलिसांनी आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये ठेवण्याची सक्ती केली आहे. “ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण आरोग्य सेतू अॅप नाही, अशा नागरिकांविरुद्ध पोलीस कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीला शिक्षा द्यायची, दंड ठोठवायचा की, सोडून द्यायचं हे ठरवतील,” असं नोएडाचं कायदा आणि सुव्यवस्था पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी सांगितलं.

  • “पकडल्यानंतर लोकांनी जर हे अॅप लगेच डाउनलोड केलं, तर त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येईल. लोकांनी आदेश गांभीर्यानं घेऊन अॅप डाउनलोड करावं म्हणून पोलीस हे काम करत आहे. पण, वारंवार इशारा देऊनही जर अॅप डाउनलोड केलं नाही, पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करतील,” असं कुमार म्हणाले.

देशभरात ५२ हजार ९५२ करोनाबाधित, आतापर्यंत १ हजार ७८३ जणांचा मृत्यू :
  • जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 35 हजार 902 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 15 हजार 266 जण व एक स्थलांतरितासह आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 783 जणांचा समावेश आहे.

  • करोना विषाणूने आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह देशात 548 आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. 

  • केंद्र सरकारने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा आकडा देण्यात आला आहे. यात प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई, स्वयंपाक कर्मचारी यांच्या माहितीचा समावेश नाही. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे डॉक्टर, परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी यांना करोना संसर्ग नेमका कुठून झाला हे समजलेले नाही.

कर्नाटक सरकारचे १६१० कोटी रुपयांचे मदत पॅकेज :
  • करोना महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे संकटात सापडलेल्या लोकांसाठी कर्नाटक सरकारने बुधवारी १ हजार ६१० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. याचवळी, महसूल वाढवण्यासाठी मद्यावरील उत्पादन शुल्क ११ टक्क्य़ांनी वाढवण्याचा निर्णयही सरकारने घेतला.

  • मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांमध्ये, टाळेबंदीमुळे ज्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे अशा हजारो धोबी, न्हावी, ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांसाठी प्रत्येकी पाच  हजार रुपये भरपाईचा समावेश आहे. याशिवाय, या पॅकेजद्वारे शेतकरी, फूल बागायतदार, लघू व मध्यम उद्योजक, मोठे उद्योग, विणकर आणि बांधकाम मजूर यांनाही मदत केली जाणार आहे.

  • सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क ११ टक्क्य़ांनी वाढवले असून; अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सहा टक्के वाढीव्यतिरिक्त ही वाढ असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या सर्व वर्गातील लोकांना दीड महिन्याहून अधिक कालावधीच्या टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. टाळेबंदीतील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कुणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

करोणाविरोधी लस तयार करण्यात इटलीतील संशोधकांना यश :
  • करोना विषाणूवर पहिली लस शोधल्याचा दावा इटलीच्या संशोधकांनी केला असून या लशीने उंदरांवरील प्रयोगात करोना विरोधी प्रतिपिंड (अँटीबॉडी)  निर्माण झाले आहेत.

  • इटलीत तयार करण्यात आलेली ही लस चाचण्यांच्या पातळीवर खूप प्रगत टप्प्यात असून सार्स सीओव्ही २ या करोना विषाणूवर मात करण्यात त्यामुळे यश येण्याच्या आशा उंचावल्या आहेत.  या लशीच्या चाचण्या उंदरात बऱ्याच यशस्वी झाल्या असून त्यात मानवी पेशीत काम करू शकतील असे प्रतिपिंड निर्माण झाले आहेत. संशोधकांनी आतापर्यंत पाच लस घटकांच्या चाचण्या करून त्यातील दोन निवडले आहेत. रोम येथे असलेल्या स्पॅलनझानी नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इनफेक्शियस डिसीजेस या संस्थेतील वैज्ञानिकांनी ही लस तयार केली असून सध्या जगात शंभर लशींवर प्रयोग सुरू आहेत.

  • ‘टॅकीस’ या लस निर्मात्या कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी ल्युगी ऑरिशियो यांनी म्हटले आहे की, या लसीने मानवातील करोना विषाणू मारला गेल्याचेही दिसून आले आहे. ही लस अत्यंत प्रगत टप्प्यावर असून मानवी चाचण्या लवकरच सुरू होतील. रोम येथील स्पॅलसनझानी रुग्णालयात या लसीचे प्रयोग उंदरावंर करण्यात आले असता त्यात मानवी पेशीतही उपयुक्त ठरू शकतील असे करोनाविरोधी प्रतिपिंड तयार झाल्याचे दिसून आले. लसीच्या मदतीने करोना विषाणू मारण्याचा पहिला प्रयोग आम्हीच केला आहे. त्यामुळे आता मानवातही तो यशस्वी होईल.

‘लॉकडाउन’मध्ये दिलासादायक वृत्त, देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने केली ‘ही’ घोषणा :
  • ‘लॉकडाउन’दरम्यान देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त आलं आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या गाड्यांचं उत्पादन पुन्हा सुरू करणार आहे. कंपनी हरयाणाच्या मानेसर येथील कारखान्यामध्ये प्रोडक्शन घेण्यास पुन्हा सुरूवात करणार आहे.

  • बुधवारी (दि.6) याबाबत मारुती सुझुकीकडून माहिती देण्यात आली. यापूर्वी 22 एप्रिल रोजीच हरयाणा सरकारने काही निर्बंधांसह मारुतीला मानेसर कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण, त्यावेळी कंपनीने नकार दिला होता. मात्र, आता सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 12 मे पासून मानेसर कारखान्यातील प्रोडक्शन घेण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती मारुती सुझुकीने दिली आहे.

  • 22 मार्चपासून देशभरात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर मारुतीचं प्रोडक्शन पूर्णतः बंद आहे. हरयाणा सरकारने 22 एप्रिल रोजी मारुती सुझुकीला 4,696 इतक्या मर्यादित कामगारांसोबतच कारखाना सुरू करण्याच्या अटीवर परवानगी दिली होती. 

९३ टक्के भारतीय कर्मचारी म्हणतात, “लॉकडाउन संपल्यानंतर ऑफिसला जायला भिती वाटेल” :
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागणी अनेक आठवड्यांपासून अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू या लॉकडाउनचे नियम शिथिल करत जनजीवन सर्वसामान्य करण्यासंदर्भातील निर्णय वेगवेगळ्या देशांमध्ये घेतले जात आहेत. मात्र करोनानंतरचे जग हे आधीसारखे नसेल असे चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे.

  • खास करुन कॉर्पोरेट ऑफिसमधील वातावरण हे पूर्णपणे वेगळं असण्याची शक्यता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कंपन्या यासंदर्भातील विचार करत असल्याचे दिसत आहे. असं असलं तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा लॉकडाउन उठवल्यानंतर ऑफिसला जाण्याची भिती ९३ टक्के कर्मचारी वर्गाला वाटत असल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

  • लॉकडाउनचे नियम शिथिल करुन पुन्हा शहरांमधील वेगवेगळी ऑफिसेस सुरु करण्यासंदर्भातील नियोजन सरकारी पातळीवर सुरु आहे. मात्र त्याचवेळी एका सर्वेक्षणामधून वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करणारे भारतीय कर्मचारी हे लॉकडाउननंतर पुन्हा ऑफिसला जाण्यासंदर्भात संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार ९३ टक्के कर्मचाऱ्यांना लॉकडाउननंतर पुन्हा ऑफिसला जाताना करोनासंदर्भातील भिती मनात असेल असं मत व्यक्त केलं आहे. तर ८५ टक्के कर्मचाऱ्यांनी पुन्हा कार्यालय सुरु होण्याआधी ते पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे असं मत व्यक्त केलं आहे.

०७ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.