लुसान : भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकाने चौथ्या फेरीत नॅना झागनिद्झे हिचा पराभव करत फिडे महिला ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या हरिकाने चार फेऱ्यांअखेर तीन गुणांनिशी रशियाची अलेक्झांड्रा गोऱ्याचकिना हिच्यासह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले आहे.
क्विन पॉन डावानुसार सामन्याची सुरुवात करत हरिकाने आपल्या जॉर्जियाच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवले. नॅनाने केलेल्या चुकांचा फायदा उठवत हरिकाने २५व्या चालीलाच विजय संपादन केला. आता हरिकाची पाचव्या फेरीत गाठ २१ वर्षीय गोऱ्याचकिना हिच्याशी पडेल.
वर्धा : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुलींचा आदर’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून राज्यभरातील शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण खात्याने शुक्रवारी दिले.
८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, मुलींप्रती आदर व्यक्त करणे, हक्काची जाणीव निर्माण करणे व अन्य हेतू ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन शालेय पातळीवर करण्याची सूचना आहे. ८ मार्चला रविवार असल्याने ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात हे उपक्रम राबवायचे आहेत.
इयत्ता चौथी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये मुलां-मुलींसाठी चांगल्या-वाईट स्पर्शाबाबत जागृती करणे. शारीरिक, मानसिक त्रास किंवा लैंगिक शोषण यासारखे प्रसंग घडल्यास त्याची माहिती शिक्षक, पालक किंवा मित्रांना देण्याबाबत अवगत करण्याचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची सूचना आहे. या माध्यमातून मुलगा-मुलगी समानता, कौटुंबिक नातेसंबंध, हार्मोन्समुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीचे व्यवस्थापन याबाबत जागृती करायची आहे. आठवी ते दहावी इयत्तेतील मुला-मुलींसाठी ‘मुलींचा आदर’ या विषयावर चर्चासत्र होतील. मुलगा-मुलगी समान असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण होण्यासाठी मुली जी कामे करतात ती कामे मुलांनीही करावी, असे समानतेचे विचार रुजवण्याच्या हेतूने पालकसभा, माता-पालक संघाच्या बैठकी घेण्याचे निर्देश आहेत.
नवी दिल्ली : आपल्या बदलीबाबत आपल्याला १७ फेब्रुवारीलाच माहिती देण्यात आली होती आणि आपली त्याबाबत काहीच तक्रार नव्हती, असे सांगून न्या. एस. मुरलीधर यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील यांना पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या बदलीच्या घटनाक्रमाची माहिती दिली.
दिल्ली उच्च न्यायालयातील आपल्या निरोप समारंभात न्यायमूर्ती मुरलीधर यांनी सांगितले, की आपली पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्याबाबत न्यायमंडळाने केलेल्या शिफारशीवरून सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे पत्र १७ फेब्रुवारीला आपल्याला मिळाले होते. मी हे पत्र स्वीकारले. माझी दिल्ली उच्च न्यायालयातून बदली करायचीच असेल, तर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात जाण्यात मला काहीच अडचण नसल्याचे उत्तर मी दिले, असे न्या. मुरलीधर यांनी उपस्थितांना सांगितले.
कथित द्वेषपूर्ण भाषणांसाठी भाजपच्या तीन नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्या. मुरलीधर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले, त्याच दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीच्या रात्री केंद्र सरकारने न्या. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी केल्यामुळे वादाला तोंड फुटले होते.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेले देश त्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकतील यासाठी वेगाने निधी उपलब्ध होईल, अशी १२ अब्ज डॉलर्सची योजना जागतिक बँकेने मंगळवारी जाहीर केली.
या योजनेचा उद्देशच संबंधित देशाने परिणामकारकपणे कृती करावी असा आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वार्ताहरांना सांगितले. मालपास म्हणाले, ‘कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गरीब देशांकडे फार कमी साधने आहेत, त्यामुळे त्यांच्यावर या खर्चाचा अतिरिक्त बोजा टाकणे योग्य नाही.’ या योजनेतील काही निधी हा जगातील फारच गरीब देशांसाठी
आहे. त्याचा वापर वैद्यकीय उपकरणे किंवा आरोग्य सेवा घेण्यासाठी, तज्ज्ञांची सेवा आणि धोरणाबद्दल सल्ला घेण्यासाठी केला जाऊ शकेल, असे बँकेने निवेदनात म्हटले.
‘या योजनेतील ८ अब्ज डॉलरची रक्कम ज्या देशांनी मदतीची विनंती केली त्यांना दिली जाईल. बँक अनेक सदस्य देशांच्या संपर्कात आहे.’
मुंबई : देशात आर्थिक मंदीचे वातावरण असतांनाही राज्याचा ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी तसेच रोजगार वाढण्यासाठी राज्य शासन ठोस पाऊले उचलणार असून आमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे या अर्थसंकल्पात प्रतिबिंब उमटले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हा केवळ अर्थसंकल्प नाही तर जनकल्याणाचा संकल्प असून यातील सामाजिक भावनेतून आखलेल्या अनेक नव्या योजनांमुळे राज्याच्या विकासाची गती आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आमच्या सरकारने कर्जमुक्तीची व्याप्ती वाढवली आहे. आरोग्य सेवा हे या अर्थसंकल्पाचे केंद्रबिंदू आहे. तर शेतीला दिवसा वीज पुरवठा, कृषी पंपासाठी नवीन वीज जोडण्या, ५ लाख सौरपंपासारखी योजना या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यात आली आहे.
कौशल्ययुक्त आणि रोजगारक्षम महाराष्ट्रासाठी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना’ जाहीर केली आहे. यातून १० लाख सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याचा मानस स्वागतार्ह बाब असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून जिचा गौरवाने उल्लेख होतो त्या राज्यातील एसटीचा आणि एसटी स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून व्यक्त केला गेला आहे.
१६०० नवीन बसेसची खरेदी आणि आणि बसस्थानकांचे आधुनिकीकरण यासाठी मिळून जवळपास ४०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पाच्या माध्यातून केली गेली आहे यामुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या बसेस मिळतील, असेही ठाकरे म्हणाले. पुणे, पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पासाठी मागील ५ वर्षांपेक्षा जास्त निधी देण्यात येणार आहे. एकूणच मेट्रो प्रकल्पांसाठी १६५७ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल यामुळे मेट्रो प्रकल्पांना चालना मिळेल. सागरमाला कार्यक्रमांतर्गत रेडीओ क्लब कुलाबा जेट्टीच्या बांधकामासाठी ५० कोटी तसेच बंगलोर मुंबई आर्थिक कॉरिडोर अंतर्गत सातारा जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात येणार आहेत, यामुळे उद्योग व्यवसायांना चालना मिळेल.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.