चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जानेवारी २०२३

Date : 7 January, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हिराबा स्मृती सरोवर - गुजरातमधील बंधाऱ्यास नरेंद्र मोदींच्या आईचं नाव : 
  • गुजरातमधील राजकोट येथे बांधण्यात येत असलेल्या एका छोट्या धरणाला (बंधारा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. हा बंधारा ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’च्या उभारण्यात येत आहे. राजकोट-कलावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळील न्यारी नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून यासाठी १५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

  • बुधवारी स्थानिक आमदार आमदार दर्शिता शाह आणि राजकोटचे महापौर प्रदीप देव यांच्या उपस्थितीत या बंधाऱ्याचं भूमीपूजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला आदरांजली म्हणून या बंधाऱ्याचं नामकरण ‘हिराबा स्मृती सरोवर’ असं करण्यात आलं आहे. यामुळे इतरही लोकांनाही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दान करण्याठी प्रेरणा मिळेल, हा यामगचा हेतू होता, अशी माहिती ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’चे अध्यक्ष दिलीप सखिया यांनी दिली.

  • पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं ३० डिसेंबर रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधम झालं. अहमदाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे हिराबेन मोदी यांच्या स्मरणार्थ राजकोट येथील बंधाऱ्याला ‘हिराबा स्मृती सरोवर’ नाव देण्याचा निर्णय ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’ने घेतला.

  • विशेष म्हणजे या ट्रस्टने देणगीदारांनी केलेल्या आर्थिक मदतीतून गेल्या चार महिन्यांत सुमारे ७५ छोटे बंधारे बांधले आहेत. या नवीन बंधाऱ्याचे काम दोन आठवड्यात पूर्ण होणार असून सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची त्याची क्षमता असेल. यात एकदा पाणी साठले की ते नऊ महिने ते आटणार नाही. यामुळे भूजल साठा वाढण्यास मदत होईल व परिसरातील गावातील शेतकरी व पशुपालकांना त्याचा लाभ होईल.

ट्विटर वापरकर्त्यांचे २०० दसलक्ष मेल आयडी लीक : 
  • मागील अनेक दिवसांपासून ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मात्र आता ट्विटर वापरकर्त्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. २०० दसलक्षपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचा इमेल अॅड्रेस लीक झाला असून तो एका ऑनलाईन हॅकिंग फोरमवर पब्लिश करण्यात आला आहे, असा दावा एका सिक्योरिटी रिसर्चरने केला आहे. मात्र या दाव्यावर ट्विटरने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.

नेमका दावा काय आहे?

  • जवळपास २०० दसलक्षपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे मेल अॅड्रेस लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत इस्रायली सायबर सिक्योरिटी मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सहसंस्थापक अलॉन गल यांनी लिंक्डइनवर सविस्तर माहिती दिली आहे. “या घटनेमुळे हॅकिंग, टार्गेटेड फिशिंग आणि डॉक्सिंग याला बळ मिळणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे,” असे अलॉन गल म्हणाले आहेत.

  • या मेल अॅड्रेस लिकबाबत अलॉन गल यांनी २४ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केलीहोती. मात्र ट्विटरने अद्याप या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ट्विटरने या दाव्यानंतर कारवाईला सुरुवात केली आहे की नाही, याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे.

  • दरम्यान, या मेल आयडी अॅड्रेसच्या कथित लिकसंदर्भात अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. तसेच या घटनेमागील हॅकर्सचीही माहिती मिळालेली नाही. अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवण्याच्या अगोदर म्हणजेच २०२१ साली सुरुवातीच्या काळात ही हॅकिंग झाली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

रशियाच्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत युक्रेन साशंक : 
  • रशियाचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या सैन्याला शुक्रवारी ३६ तासांचा युद्धविरामाचा एकतर्फी दिलेला आदेश संदिग्ध आहे, असे युक्रेनचे म्हणणे आहे.

  • युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाचे हे पाऊल एक खेळी असल्याचे सांगून फेटाळून लावला आहे. मात्र, त्यांनी युक्रेनचे सैन्य युद्धविरामाचे पालन करतील किंवा नाही, याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे युक्रेनने युद्ध सुरू ठेवल्यास प्रत्त्युत्तर देण्यात येईल किंवा नाही, याबाबत रशियानेही स्पष्टीकरण दिले नाही.

  • सुमारे ११ महिन्यांच्या युद्धकाळात रशियाकडून पहिल्यांदा घोषित युद्धविराम मास्कोच्या प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी दुपारी सुरू झाला. तो शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. युद्धविरामाच्या उल्लंघनाचे आतापर्यंत कोणतेही वृत्त नाही.

  • रशियामध्ये पारंपरिक नाताळनिमित्त (ज्युलियन कॅलेंडरनुसार) सात जानेवारीला सार्वजिनक सुटी असते. या निमित्त युद्धविराम जाहीर करावा, अशी मागणी रशियाच्या पुराणमतवादी चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांनी केले होते.

  • युक्रेन आणि पाश्चमात्य अधिकाऱ्यांनी सद्भावनेच्या संकेतामागे संशयास्पद हेतू असल्याची शंका व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वालोदिमिर झेलेंक्सी यांनी रशियाच्या हेतूवर संशय व्यक्त करताना रशियाने नव्या दमाने युद्ध सुरू करण्यासाठी हा ‘युद्धविराम’ जाहीर केला आहे, असा आरोप केला.

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य; श्रीलंकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज : 
  • श्रीलंकेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल. या सामन्यात चमकदार  कामगिरी करायची झाल्यास भारतीय जलदगती गोलंदाज आणि आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर भारताला दुसऱ्या सामन्यात १६ धावांनी पराभूूत व्हावे लागले.

  • युवा वेगवान गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला पराभूत व्हावे लागले. मात्र, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना अशा परिस्थितीतूनही खूप काही शिकण्यास मिळाले असेल. दुखापतीतून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यात आपल्या दोन षटकांत पाच नोबॉल टाकले. पहिल्याच षटकात त्याने तीन नोबॉल टाकत ट्वेन्टी-२० मध्ये नोबॉलची हॅट्ट्रिक करणारा तो भारतीय गोलंदाज बनला. पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मावी आणि अर्शदीप यांच्या नोबॉलचा फटका भारताला बसला. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंडय़ाला फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे निर्णायक सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.

फलंदाजांच्या कामगिरीकडे नजर

  • आघाडीच्या फलंदाजीच्या फळीला पुन्हा एकदा अपयश आले. शुभमन गिलला सलग दुसऱ्यांदा फलंदाजीत यश मिळाले नाही. राहुल त्रिपाठीलाही पहिल्या सामन्यात चमक दाखवता आली नाही. अर्धा संघ ६० धावांच्या आत परतल्यानंतर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. अक्षरच्या रूपाने भारताला अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. निर्णायक सामन्यात संघात बदल करण्याची शक्यता कमीच आहे.

  • आशिया चषकविजेत्या श्रीलंकेने गेल्या सामन्यात विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले. तरीही त्यांच्या मध्यक्रमाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा संघाला असेल. राजकोटची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक ही या सामन्यात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०७ जानेवारी २०२२

 

पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने - थोड्याच दिवसात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा :
  • बीसीसीआयने यावर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. तर हरमनप्रीत कौरला संघाची उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

  • भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ६ मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे. हा १५ सदस्यीय संघ विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना ११ फेब्रुवारीला होईल.

  • वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताचा दुसरा सामना १० मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध, १२ मार्च रोजी वेस्ट इंडिज आणि चौथा सामना १६ मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध होणार आहे. भारतीय महिला संघ १९ मार्च रोजी ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका २२ आणि २७ मार्चला भिडणार आहेत. २०२२ च्या महिला विश्वचषकाची सुरुवात ४ मार्च रोजी यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने होईल.

  • ३१ दिवसांत एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत. ८ संघांमध्ये विश्वविजेता होण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेतील सर्व सामने न्यूझीलंडमधील ६ शहरांमध्ये ऑकलंड, ख्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, वेलिंग्टन आणि तौरंगा येथे खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील त्यांच्या स्थानांवर आधारित विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यजमान असताना न्यूझीलंडने या स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.

कायमची बंदी घालणाऱ्या Twitter ला डोनाल्ड ट्रम्प यांचं सडेतोड प्रत्युत्तर; तयार केला नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म :
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) हे त्यांचं नवं अ‍ॅप फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार आहे.

  • २१ फेब्रुवारीपासून ‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध असेल. हे अ‍ॅप ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) द्वारे बनवले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवीन मीडिया कंपनी अमेरिकेचे माजी रिपब्लिकन डेव्हिन नुनेस यांच्या नेतृत्वाखाली आहे.

  • ट्रुथ सोशल अ‍ॅप हे ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखंच दिसत आहे. प्रोफाइल पेज जवळजवळ ट्विटर अ‍ॅपसारखे दिसत आहे आणि पोस्टमध्ये प्रत्युत्तरे, रीट्विट्स, पसंती आणि शेअरिंगसाठी चिन्हे दिसत आहेत.

  • ज्यांनी माझ्यावर बंदी घातली अशा बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मीडिया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकी अध्यक्ष शांत बसले आहेत, अशी खोचक टीकाही ट्रम्प यांनी त्यावेळी केली होती.

करोनाचा पुन्हा एकदा विस्फोट; देशात सात महिन्यानंतर १ लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद :
  • करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा संपूर्ण देशाची चिंता वाढवली आहे. देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत २८.८ टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात करोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. महत्वाचं म्हणजे देशात सात महिन्यानंतर पहिल्यांदाच एक लाखाहून जास्त केसेस आल्या आहेत. याआधी ६ जूनला एक लाख रुग्ण आढळले होते.

  • देशात गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले असताना ३० हजार ८३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील पॉझिटिव्हिटी रेट ७.७४ टक्के इतका आहे.

  • देशात सध्याच्या घडीला ३ लाख ७१ हजार ३६३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८४५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एकूण ४ लाख ८३ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

६३ हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच.. ; सर्वजण निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती झालेले :
  • संपावर ठाम राहिलेले आणि गैरहजर एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनाला  मुकावे लागणार आहे. आज, शुक्रवारी ७ जानेवारीला एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवे वेतन जमा होईल. मात्र उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार असून संपात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा वेतन मिळणार नाही.

  • एकूण ८८ हजार ३४७ कर्मचाऱ्यांपैकी निलंबित, बडतर्फ, सेवासमाप्ती केलेले कर्मचारी आणि संपात सध्या सामील असलेल्या ६३ हजार ७०७ कर्मचाऱ्यांना नव्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे.

  • दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केल्यानंतरही या कारवाया मागे घेण्याचे आश्वासन दिले. त्यापूर्वी ७ डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढही लागू केली. परंतु सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची मागणी करून कर्मचारी संपावर ठाम राहिले. त्यामुळे अनेक कर्मचारी वेतनाला मुकले. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या ७ तारखेला होते.

  • दुसरे वेतन खात्यावर जमा होण्याची वेळ आली, तरीही मोठय़ा प्रमाणात एसटी कर्मचारी अद्यापही संपावर आहेत. दोन महिन्यांत काही कर्मचारी निवृत्त झाल्याने सध्या एसटीतील एकूण कर्मचारी संख्या ८८ हजार ३४७ झाली आहे. यात २४ हजार ६४० कर्मचारी कर्तव्यावरच हजर झाले आहेत. 

तूर्तास चित्रपटगृहे सुरूच राहणार :
  • राज्यातील चित्रपटगृहे सध्या बंद करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र तिसरी लाट आणि त्याच्या तीव्रतेवर चित्रपगृहांचा निर्णय अलंबून असेल. येणाऱ्या काळात बाधितांचे प्रमाण आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण याचा विचार करून चित्रपटगृहांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना सतर्कतेचा आदेश देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिली.

  • राज्यातील करोना परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबत आढावा बैठकीनंतर देशमुख यांनी ही माहिती दिली. बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, डॉ. संजय बिजवे यांच्यासह शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक उपस्थित होते. करोनाची लाट लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा करून ठेवावा.

  • उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना देशमुख यांनी अधिष्ठाता आणि अधीक्षकांना दिल्या. रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने योग्य प्रकारच्या मुखपट्टीचा, विषाणूनाशकांचा वापर करणे आवश्यक असून यासाठी रुग्णालयाने लक्ष द्यावे. , अशा सूचनाही देशमुख यांनी या वेळी दिल्या.

०७ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.