चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ ऑक्टोबर २०२१

Date : 6 October, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हवामानाच्या प्रारूपीकरणासाठी तिघांना भौतिकशास्त्राचे नोबेल :
  • जागतिक तापमानवाढीतील बदलांचा अंदाज वर्तवण्यासाठी पृथ्वीच्या हवामानाचे प्रारूपीकरण करण्याच्या कामगिरीसाठी यंदा जपान, जर्मनी व इटली या देशांच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. स्युकुरो मनाबे (वय ९०), क्लॉस हॅझलमन (वय ८९)  यांनी जागतिक तपमानवाढीच्या प्रारूपीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर गिओरगिओ पारिसी (वय ७३)  यांनी भौतिक प्रणालींमधील आंतरिक बदल हे आण्विक पातळीपासून ग्रहीय पातळीपर्यंत ओळखण्यासाठी संशोधन केले आहे.

  • नोबेल समितीने म्हटले आहे की, मनाबे व हॅझलमन यांनी पृथ्वीच्या हवामानविषयक ज्ञानाचा पाया घातला व त्याचा मानवावर कसा परिणाम होत आहे, याचा अभ्यास केला. १९६० मध्ये मनाबे यांनी असे दाखवून दिले की, वातावरणात वाढणारे कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण हे जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहे.

  • त्यातून सध्याच्या हवामान व तापमान प्रारूपांचा जन्म झाला. त्यानंतर दशकभराने हॅझलमन यांनी हवामान व वातावरण यांची सांगड घालणारे प्रारूप तयार केले त्यातून हवामान प्रारूपांच्या मदतीने वातावरणीय बदलांचे स्वरूप व त्याचा अंदाज करणे शक्य झाले.

  • मानवी कृतींचा हवामानावर होणारा परिणाम व त्याची चिन्हे काय आहेत, याचा शोध त्यांनी घेतला. पारिसी यांनी गणित, जीवशास्त्र, मेंदूशास्त्र, मशीन लर्निंग यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीतील आंतरसंबंध स्पष्ट करणारी गणिती व भौतिकी प्रारूपे निश्चिात केली.

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” चिन्ह असणार :
  • सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

  • या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • शासकीय पत्रव्यवहाराप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात यासंबधीचे बॅनर लावण्याचे निर्देशही सर्व मंत्रालयीन तसेच प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

धोनीने केली IPL मधील निवृत्तीसंदर्भातील घोषणा; म्हणाला, “मी अखेरचा सामना :
  • चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढील वर्षीचा ‘आयपीएल’ हंगाम खेळून निवृत्ती पत्कारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आयपीएल’ कारकीर्दीतील अखेरचा सामना तो चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे.

  • “निरोपाचा सामना पाहण्याची संधी चाहत्यांना नक्की मिळेल. २०२२ च्या हंगामात चेपॉकवर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मी अखेरचा सामना खेळेन,” असे धोनीने एका ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. पुढील लिलावात चेन्नईकडून कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड या तिघांना संघात कायम ठेवण्यात येणार आहे.

  • धोनीच्या नेतृत्वाखाली ११ वेळा चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफपर्यंत मजल मारली आहे. ४० वर्षीय धोनीने आत्तापर्यंत चेन्नई संघाने खेळलेल्या सर्वच आयपीएलच्या पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

अवकाशात होणार चित्रपटाचे शुटिंग :
  • अवकाश तंत्रज्ञानात अनेक बाबतीत पहिला देश म्हणून रशियाकडे मान जातो. अवकाशात पहिला कृत्रिम उपग्रह पाठवणे, पहिला सजीव प्राणी ( ‘लाईका’ कुत्री ), पहिला अंतराळवीर ( युरी गागरीन) पाठवणे, अवकाश यानाच्या बाहेर पहिला स्पेस वॉक करणे, पहिले अवकाश स्थानक स्थापन करणे असे विक्रम रशियाने केलेले आहेत. यात आता आणखी एका पराक्रमाची भर पडणार आहे.

  • रशियाच्या ‘द चलेंज’ या चित्रपटातील ३५ मिनीटांच्या भागासाठी चक्क पृथ्वीभोवती फिरणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शुटिंग केले जाणार आहे.

  • ‘द चलेंज’ चित्रपटाचे दिग्दर्शक क्लिम शिपेंको आणि अभिनेत्री युरिया पेरेसिल्ड हे सोयुझ एमएस-१९ या अवकाश यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहचले आहेत. या प्रवासात त्यांच्याबरोबर ४ वेळा अवकाशवारी केलेले अनुभवी अन्टॉव्ह शेकप्लेरोव हे या अवकाश यानाचे कमांडर म्हणून होते.

  • सोयुझ एमएस-१९ यानाने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २.३० मिनीटांनी कझागिस्तान इथल्या बैकानुर तळावरुन उड्डाण केले. चार तासांच्या प्रवासानंतर हे तिघे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहचले आहेत.

  • ‘द चलेंज’ चित्रपटातील शेवटचा भाग हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी संबंधित आहे. यानुसार अवकाश स्थानकातील अंतराळवीर काही कारणांनी जखमी होतो आणि त्यावर एक तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. अभिनेत्री युरिया पेरेसिल्ड ही या चित्रपटात एका सर्जन-ड़ॉक्टराच्या भुमिकेत आहे. युरिया पेरेसिल्ड ही अवकाश स्थानकात पोहचते आणि शस्त्रक्रिया करते.

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा - ऐश्वर्यला विश्वविक्रमासह सुवर्ण :
  • युवा भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. याआधी पात्रता फेरीत त्याने ११८५ गुण मिळवताना विश्वविक्रमाची बरोबरी केली.

  • ऐश्वर्यने अंतिम फेरीत विश्वविक्रमी ४६३.४ गुण प्राप्त केले, तर दुसऱ्या क्रमांकावरील फ्रान्सच्या ल्युकास क्राइझ्सने ४५६.५ गुण मिळवले. अमेरिकेच्या गॅव्हिन बॅरनिकला ४४६.६ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • या प्रकारातील पात्रता फेरीत भारताच्या संस्कार हवेलियाला ११वे (११६० गुण), पंकज मुखेजाला १५वे (११५७ गुण), सरताज तिवानाला १६वे (११५७ गुण) आणि गुर्मन सिंगला २२वे (११५३ गुण) स्थान मिळाले. भारताने ८ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य अशा एकूण १७ पदकांसह स्पर्धेतील अग्रस्थान टिकवले आहे.

  • भारताची १४ वर्षीय नेमबाज नाम्या कपूरने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात १९ वर्षीय मनू भाकरपेक्षा सरस कामगिरी करीत लक्ष वेधले. अंतिम फेरीत नाम्याला ३६ वेळा अचूक नेम साधून सुवर्णपदक मिळाले. बरोबरीची कोडी फोडताना फ्रान्सच्या कॅमिली जेड्रझेजेवस्कीने (३३) मनूवर (३१) मात केली. त्यामुळे कॅमिलीला रौप्य आणि मनूला कांस्यपदक मिळाले. 

राज्यभरात दिवसभरात २ हजार ८४० रूग्ण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.३२ टक्के :
  • राज्यात दिवसभरात २ हजार ८४० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ४०१ नवीन रूग्ण आढळले आहेत. तर, ३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८८,८९९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.

  • आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६४,९१५ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३९२७२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९४,६९,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,६४,९१५ (११.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४०,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ३३,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

०६ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.