गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १५ ऑक्टोबरपासून क्रमाक्रमाने पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने सोमवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. राज्यात मात्र शाळा कधी सुरू होणार, याबाबत संदिग्धता कायम आहे.
शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, संपूर्ण शाळेची साफसफाई, परिसराचे निर्जंतुकीकरण, उपस्थितीत लवचीकता, तीन आठवडय़ांपर्यंत मूल्यांकन टाळणे आणि टाळेबंदीच्या काळातील घरगुती शिक्षणातून बाहेर पडून सहजपणे औपचारिक शिक्षण सुरू करणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे.
राज्यांनी आपापल्या गरजेनुसार आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी स्वत:ची आदर्श कार्यपद्धती तयार करावी, अशी सूचनाही आरोग्य विभागाने केली आहे. शाळांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे. त्याचबरोबर टेबल-खुच्र्या, कपाटे, साधनसामग्री, लेखन साहित्य, पाण्याच्या टाक्या, स्वयंपाकघरे, उपाहारगृहे, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, ग्रंथालये यांचे निर्जंतुकीकरण करावे. वर्गखोल्यांसह सर्व ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
यकृताचा कर्करोग आणि यकृताची सूज या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ हार्वे जे. ऑल्टर, चार्ल्स एम. राइस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.
ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या कार्यामुळे रक्तातील ‘हेपॅटायटिस सी’ या रोगाचे मुख्य कारण स्पष्ट होण्यास मदत झाली. त्याचबरोबर चाचण्या आणि औषधे विकसित करून लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले, अशा शब्दांत नोबेल समितीने शास्त्रज्ञांचा गौरव केला. वैद्यकशास्त्रातील या ऐतिहासिक शोधाबद्दल नोबेल समितीने तिन्ही शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘त्यांच्या शोधामुळे ‘हेपॅटायटिस सी’ विषाणूविरोधी औषधांची निर्मिती वेगाने करता आली. हा रोग आता बरा करता येतो आणि जगातून या विषाणूचे समूळ उच्चाटन होऊ शकते,’’ अशी आशा नोबेल समितीने व्यक्त केली.
ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या शोधामुळे ‘हेपटायटिस सी’च्या रक्तचाचण्या उपलब्ध झाल्या. चाचण्यांमुळे जगाच्या अनेक भागांमध्ये रक्तसंक्रमणातून होऊ शकणारा रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका संपुष्टात आला आणि जागतिक आरोग्यात सुधारणा झाली, असेही नोबेल समितीने नमूद केले.
लाखो लोकांसाठी जीवनदान : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगात दरवर्षी सात कोटी लोकांना ‘हेपटायटिस सी’ विषाणूचा संसर्ग होतो, तर या रोगामुळे चार लाख लोकांचा मृत्यू होतो. या विषाणूच्या संसर्गानंतर यकृताचा कर्करोग होतो किंवा यकृताला सूज येते. हे दोन्ही आजार गंभीर मानले जातात.
येत्या ८ ऑक्टोबरला साजरा होत असलेल्या हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. १९३२ मध्ये ८ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती, त्यामुळे हा दिवस ‘हवाई दल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
यंदा गाझियाबाद येथील हिंडन हवाईतळावर वार्षिक संचलन होणार आहे. इतर विमानांबरोबरच राफेल विमाने त्या दिवशी सहभागी होतील. भारतीय हवाई दलाच्या एएफडे २०२० या हॅशटॅगवर म्हटले आहे,की राफेल ही लढाऊ जेट विमानांची नवी आवृत्ती आहे.
१० सप्टेंबरला पाच राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आली होती. चीनबरोबर पूर्व लडाखमध्ये संघर्ष सुरू असताना ही विमाने दाखल झाली. फ्रान्सच्या दसॉल्ट अॅव्हिएशनने ती तयार केली असून अचूक मारा करण्यात ती उपयोगी आहेत. एकूण ५९ हजार कोटी रुपयांचा करार ३६ राफेल विमानांसाठी करण्यात आला. आणखी पाच विमाने नोव्हेंबपर्यंत भारताला मिळणार आहेत. रशियाकडून सुखोई घेतल्यानंतर भारताने लढाऊ जेट विमानांची खरेदी २३ वर्षांनी केली आहे. त्यावर मिटीऑर क्षेपणास्त्र व स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
भारत हा देश AI साठी अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ग्लोबल हब व्हावा ही आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने देशाचे प्रयत्नही सुरु आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या बुद्धिजीवीतेला मिळालेलं एक वरदान आहे.
टूल आणि टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्हर्च्युअल परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भारतात ऑप्टिकल फायबरचं नेटवर्क वाढवलं जातं आहे. आम्हाला गतिमान इंटरनेट गावागावांमध्ये पोहचवायचं आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रमुख भूमिका निभावयाची आहे.
भारतात जगातली सगळ्यात युनिक आयडेंटेटी सिस्टीम आहे जिचं नाव आधार आहे. तर सर्वात नावीन्यपूर्ण अशी डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे ज्याचं नाव युपीआय आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.