चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ मे २०२०

Date : 6 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :
  • राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

  • ‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले.

  • ‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ६४ विमाने :
  • करोनामुळे परदेशात अडकलेल्या जवळपास १४,८०० भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ६४ विमानांची व्यवस्था केली आहे. जवळपास १२ देशांत अडकलेल्या या नागरिकांना ७ ते १३ मे या कालावधीत मायदेशी आणण्यात येणार आहे.

  • एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमार्फत संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाइन्स, बांगलादेश, बाहरिन, कुवैत आणि ओमान येथून भारतीयांना मायदेशात आणण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • भारतामध्ये १७ मेपर्यंत टाळेबंदीला मुदतवाढ देण्यात आली असून सर्व प्रवासी विमानांची उड्डाणे या कालावधीत स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेल्या ज्या भारतीय नागरिकांना रोगाची लागण झालेली नाही त्यांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणण्याची व्यवस्था ७ मेपासून केली जाणार असल्याचे गृह मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. विमाने आणि नौदलाच्या जहाजांद्वारे भारतीयांना आणले जाणार असून त्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

दी अँकरेज डेली, प्रो पब्लिका यांना पत्रकारितेतील पुलित्झर पुरस्कार :
  • अलास्कातील एक  तृतीयांश खेडय़ात सार्वजनिक सुरक्षा नसून तेथे पोलीस संरक्षण नावाचा प्रकारच अस्तित्वात नसल्याची वृत्तमालिका प्रकाशित करणाऱ्या दी अँकरेज डेली न्यूज, प्रो पब्लिका या वृत्तपत्रांना  पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. करोना विषाणूच्या साथीमुळे या पुरस्कारांच्या घोषणेस विलंब झाला आहे.

  • ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला शोध पत्रकारितेसाठी या पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्यांनी न्यूयॉर्क शहरातील टॅक्सी उद्योगातील कर्ज व्यवस्थेचा पर्दाफाश केला होता. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारबाबत जोखीम पत्करून केलेल्या आंतरराष्ट्रीय वार्ताकनासाठीही ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला गौरवण्यात आले आहे.

  • ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ला स्पष्टीकरणात्मक वार्ताकनासाठी हा पुरस्कार मिळाला असून उच्च तापमानामुळे होणाऱ्या पर्यावरण हानीचा विचार त्यांनी मांडला होता.

  • ‘असोसिएटेड प्रेस’ला छायाचित्रांकनासाठी वृत्तछायाचित्र पुरस्कार मिळाला असून त्यात भारताने अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या परिस्थितीतील  छायाचित्रांचा समावेश आहे. रॉयटर्सला हाँगकाँगमधील आंदोलनाच्या छायाचित्रांसाठी ब्रेकिंग न्यूज छायाचित्र पुरस्कार मिळाला आहे. आधी पुलित्झर पुरस्कार कार्यक्रम २० एप्रिलला होणार होता, पण करोनामुळे तो लांबणीवर टाकण्यात आला.

देशातील करोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर; आतापर्यंत १६९४ जणांचा झाला मृत्यू :
  • जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची देशातील एकूण संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 33 हजार 514 रुग्ण, रुग्णालयातून उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले 14 हजार 182 जण व एक स्थलांतरित तसेच आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 694 जणांचा समावेश आहे.

  • करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने समूह संसर्ग सुरू झाला आहे का? या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढले पाहिजे. प्रतिबंधित भाग आणि अन्य ठिकाणीही श्वसनाच्या गंभीर आजाराची लक्षणे व्यक्तींमध्ये दिसत आहेत का, यावर देखरेख ठेवली पाहिजे, असे अगरवाल यांनी सांगितले.

  • स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्याची केंद्राने परवानगी दिल्यानंतर चार दिवसांमध्ये विविध राज्यांतून ६२ विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या. त्यातून ७२ हजार मजुरांनी प्रवास केला. आणखी किमान १३ रेल्वेगाडय़ा सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. राज्यांकडून होणाऱ्या मागणीनुसार विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

०६ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.