चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ मार्च २०२१

Date : 6 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘ओटीटी मंचावर कारवाईसाठी केंद्राचे नियमच नाहीत’ :
  • डिजिटल मंचावर जर अयोग्य पद्धतीचा आशय दाखवला जात असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वात कुठलीही तरतूद नसल्याचा शेरा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मारला आहे.

  • अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओजच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्यावर तांडव मालिकेबाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा आदेश न्यायालयाने जारी केला.

  • न्या. अशोक भूषण व न्या. आर. एस. रेड्डी यांनी उत्तर प्रदेश सरकारला नोटिसा जारी करताना म्हटले आहे की, तांडव या मालिकेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी त्यावर पुरोहित यांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. केंद्राने समाज माध्यमांबाबत केवळ मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत त्यात डिजिटल माध्यमांवर कारवाईसाठी कुठल्याही उपाययोजनांची तरतूद नाही. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले की, सरकार याबाबत नियामक तत्त्वे किंवा कायदा तयार करणार आहे. त्याचा मसुदा न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुरोहित यांना सांगितले की, त्यांच्या याचिकेत केंद्रालाही पक्षकार करण्यात यावे.

  • पुरोहित यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचे चुकीचे प्रतिमा चित्रण केले आहे. हिंदू देवतांचा अपमान केला असून पंतप्रधानांचे विरोधाभासी चित्र रंगवले आहे.  न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी मंचावर काहीवेळा पॉर्नोग्राफिक आशयही दाखवला जातो. त्यामुळे असे कार्यक्रम प्रसारित करताना त्यावर देखरेख असायला हवी. केंद्राने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत असे न्यायालयाने सांगितले. मेहता यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्त्वे व डिजिटल माध्यम नैतिक संहिता नियम २०२१ आम्ही सादर करीत आहोत.

CBSE बोर्डाच्या १०वा, १२वी पेपरच्या तारखांमध्ये बदल! वाचा बदललेल्या तारखा :
  • CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या तारखा बदलून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • त्यासोबतच १२वीच्या फिजिक्स, इतिहास आणि बँकिंग या विषयांच्या पेपरच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. बदललेल्या तारखांचं नवीन वेळापत्रत सीबीएसईच्या cbse.nic.in या संकेतस्थावर देखील देण्यात आलं आहे.

  • काय आहेत बदल - नव्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाचा १०वीचा विज्ञान विषयाचा पेपर २१ मे रोजी घेण्यात येणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार या दिवशी गणिताचा पेपर होता. गणित विषयाचा पेपर २ जून रोजी घेण्यात येणार आहे. सीबीएसई १२वीच्या परीक्षांमध्ये फिजिक्स विषयाचा पेपर ८ जून रोजी घेण्यात येणार आहे. बँकिंगचा पेपर ९ जून रोजी तर इतिहासाचा पेपर १० जून रोजी घेण्यात येणार आहे.

मेरी कोमला कांस्यपदक :
  • सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या एमसी मेरी कोमला संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागल्याने बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या ३७ वर्षीय मेरीला अमेरिकेच्या विर्जिनिया फच्स हिने हरवले. दोघींनी तोडीस तोड खेळ केल्यानंतर पंचांनी फच्सच्या बाजूने कौल दिला. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा बाळगला. पण दुसऱ्या फेरीत मेरीने अधिक आक्रमक खेळ केला. तिसऱ्या आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंनी एकमेकींना ठोसे लगावले. पण मेरीला अधिक ठोसे मारल्यामुळे पंचांनी फच्स हिला विजयी घोषित केले.

  • तत्पूर्वी, सतीश कुमार (९१ किलोवरील) आणि आशीष कुमार (७५ किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. सतीशने डेन्मार्कच्या गिवस्कोव्ह नील्सनला ५-० असे, तर आशीषने इटलीच्या रेमो सल्वातीला ४-१ असे पराभूत केले.

  • सिमरनजित कौर (६० किलो) तसेच जास्मिन (५७ किलो) आणि  पूजा राणी (७५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. जास्मिनने इटलीच्या सिरिन चाराबी हिला तर सिमरनजितने प्यूएटरे रिकोच्या किरिया तापिया हिला हरवले. पूजाने पनामाच्या अथेयना बायलॉन हिच्यावर वर्चस्व गाजवले.

देशात लसीकरणाचा उच्चांक :

  • देशात गुरुवारी एकाच दिवशी जवळपास १४ लाख लोकांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.

  • गुरुवारी लसीकरणाच्या ४८व्या दिवशी १३ लाख, ८८ हजार, १७० जणांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसातील हा उच्चांक आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

  • गुरुवारी १० लाख, ५६ हजार, ८०८ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली तर आरोग्यक्षेत्र आणि कोविडयोद्धे मिळून तीन लाख, ३१ हजार, ३६२ जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • * देशात आतापर्यंत एकूण १.८ कोटी लोकांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

  • * यामध्ये ६८ लाख, ५३ हजार, ०८३ जण आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे तर ३१ लाख, ४१ हजार, ३७१ कर्मचाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

उत्पादन क्षेत्रात पाच वर्षांत ५२० अब्ज डॉलरची वाढ - मोदी :
  • उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांमुळे येत्या पाच वर्षांत भारतातील उत्पादन क्षेत्रात ५२० अब्ज डॉलर्सची वाढ होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

  • एका वेबीनारमध्ये त्यांनी सांगितले की, सरकार देशांतर्गत उत्पादन क्षेत्रातील सुधारणांना प्रोत्साहन देत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात २ लाख कोटी रुपये उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांकरिता ठेवलेले आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत उत्पादन क्षेत्रात ५२० अब्ज डॉलर्सची वाढ अपेक्षित आहे. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांमुळे सध्या अनेक क्षेत्रांतील रोजगार वाढणार असून फायदेही दुप्पट होतील. सरकारने अनुपालनाचे ओझे कमी केले असून उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे उद्योगातील इतर खर्च कमी होणार आहे.

  • उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेमुळे दूरसंचार, वाहन उद्योग, औषध उद्योग या क्षेत्रातही विस्तार करणे शक्य होणार आहे. यातून निर्यातीलाही उत्तेजन मिळणार आहे. करोनामुळे सध्याच्या काळात उत्पादन क्षेत्रावर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे तो दूर होण्यास उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनांनी फायदा होणार आहे.

१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य :
  • १ एप्रिलपासून नवीन वाहनांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य असतील. रस्ता परिवहन व महामार्ग मंत्रालयाने यापूर्वी कायदा मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठविला होता. ज्यात त्यांनी वाहन उत्पादकांना पुढील सीटवरील प्रवाशांसाठी एअरबॅग बसविणे बंधनकारक करण्यात यावे असे नमूद केले होते. हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाने मान्य केला आहे.

  • आतापर्यंत, सर्व कारसाठी फक्त ड्रायव्हर सीटसाठी एअरबॅग अनिवार्य आहे. तथापि, एअरबॅगद्वारे संरक्षित नसल्यामुळे समोरच्या सीटवरील प्रवाशाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते किंवा अपघात झाल्यास मृत्यूचा धोकाही संभवतो यामुळेच ही तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने पुढच्या वर्षीपासून सर्व कारमध्ये पुढे बसणाऱ्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावर जनतेकडून सूचना मागविल्या होत्या.

  • विद्यमान मॉडेल्ससाठी नवीन नियम ३१ ऑगस्टपासून लागू केला जाईल. मुळात प्रस्तावित अंतिम मुदत जून २०२१ होती जी आता वाढविण्यात आली आहे. स्पीड अ‍ॅलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि सीट-बेल्ट इंडिकेटर यासारख्या बाबी समाविष्ट करणे बहुतेक कारमधील वैशिष्ट्ये बनली आहेत. परंतु, तरीही लाइफ-सेव्हिंग एअरबॅग या अनिवार्य नव्हत्या.

“आता भारतीयांच्या हाती अमेरिकेचा लगाम”, ‘नासा’च्या शास्त्रज्ञांसमोर बायडेन यांचं वक्तव्य :
  • अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा भारतीय वंशाच्या व्यक्तींवर खूपच विश्वास असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ५० दिवसांच्या आत बायडेन यांनी प्रमुख महत्वाच्या पदांवर ५५ हून अधिक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची नियुक्ती केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बायडेन यांनी आता अमेरिकेचा लगाम भारतीयांच्या हाती असल्याचेही वक्तव्य केलं आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या एका कार्यक्रमामध्ये बायडेन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

  • बायडेन यांनी मंगळावर पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या ऐतिहासिक लॅण्डींगसंदर्भात नुकतीच नासाच्या संशोधकांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये नासाच्या मंगळ मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय वंशाच्या संशोधक स्वाति मोहनसुद्धा सहभागी झाल्या होत्या.

  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, “भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या हाती अमेरिकाचा लगाम आहे. तुम्ही (स्वाति मोहन), माझ्या उपराष्ट्राध्यक्ष (कमला हॅरिस), माझे भाषण लिहीणारे (विनय रेड्डी),” अशी यादीच वाचून दाखवली. २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या बायडेन यांनी जवळवजळ ५५ महत्वाच्या प्रशासकीय पदांवर भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.

  • विशेष म्हणजे या ५५ लोकांच्या यादीमध्ये उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि नीरा टंडन यांचा समावेश नाहीय. टंडन यांनी व्हाइट हाउस ऑप मॅनेजमेंट अ‍ॅण्ड बजेटच्या निर्देशक पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. पहिल्यांदाच अमेरिकन प्रशासनाच्या कामामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

०६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.