चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ जून २०२०

Date : 6 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नव्या सरकारी योजनांबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय :
  • नव्या सरकारी योजनांबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोदी सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत एकही नवी सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारत यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांना लागू होणार नाही असंही सरकारने म्हटलं आहे.

  • सरकारने नवीन सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे असं अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे. करोनामुळे सुरु असलेल्या आर्थिक संकटात भारत सरकारने कॉस्ट कटिंग उपाय अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

  • आत्मनिर्भर भारत आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना यांसाठी करण्यात येणारा खर्च सुरु राहिल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

२०२२च्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे भारताला यजमानपद :
  • भारतात १९७९ नंतर पहिल्यांदाच महिला आशियाई चषक फु टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २०२२ साली या स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) भारताला दिले आहेत.

  • ‘एएफसी’ महिला फु टबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात याच महिला समितीने भारताच्या नावाची शिफारस के ली होती. अखिल भारतीय फु टबॉल महासंघाला (एआयएफएफ) पाठवलेल्या पत्रात ‘एएफसी’च्या सरचिटणीस डाटो विंडडोर जॉन यांनी म्हटले की, ‘‘२०२२ एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे संयोजनपद आम्ही भारताकडे सोपवत आहोत.’’

  • २०२२च्या दुसऱ्या सहामाहीत ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. भारताने १९७९च्या स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले होते. ‘‘या स्पर्धेच्या यजमानपदासाठी आम्हाला योग्य समजल्याबद्दल आम्ही आशियाई फुटबॉल महासंघाचे आभारी आहोत. या स्पर्धेमुळे देशातील महिला फुटबॉलपटूंना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल, तसेच भारतातील महिला फुटबॉलला नवी चालना मिळू शकेल,’’ असे ‘एआयएफएफ’चे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.

UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर; पुढच्या वर्षी होणार मुख्य परीक्षा :
  • करोना प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

  • आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.

  • करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच काम ठप्प झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांवरही यांचा परिणाम झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली.

  • या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

यावर्षी नव्या योजना नाहीत :
  • करोनाच्या आपत्तीमुळे देश आर्थिक संकटातून जात असून नव्या योजनांसाठी निधी पुरवणे केंद्र सरकारला शक्य नसल्याने कोणत्याही मंत्रालयाने नवे प्रस्ताव आणू नयेत, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे. नवी योजना लागू करताना आर्थिक तरतुदीसाठी मंत्रालयांना अर्थ मंत्रालयाची तत्वत: मंजुरी घ्यावी लागते. ही मंजुरी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • टाळेबंदीच्या काळात प्रामुख्याने १.७० लाख कोटींची पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि २० लाख कोटींची आत्मनिर्भर भारत योजना यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त कोणत्याही नव्या योजनांसाठी तरतूद केली जाणार नाही, असे सूचनापत्र काढण्यात आले आहे.

  • करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सार्वजनिक वित्तीय संसाधनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून त्याचा विनियोग करावा लागणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

चर्चेद्वारे मतभेद हाताळण्यास भारत-चीनची मान्यता :
  • लडाखच्या पूर्वेकडील भागात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे त्याबद्दल दोन्ही देशांमध्ये शुक्रवारी राजनैतिक स्तरावर चर्चा करण्यात आली आणि या प्रश्नावर शांततापूर्ण चर्चा करून, एकमेकांच्या मतांचा आदर करून मतभेद सोडविण्याचे मान्य करण्यात आले.

  • परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव आणि चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालक वू जिआंघाओ यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली.

  • दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे याबाबतचा थेट उल्लेख टाळण्यात आला आणि सद्य:स्थितीसह दोन्ही देशांनी परस्पर संबंधांबाबतचा आढावा घेतला, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने जी मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत त्याद्वारे मतभेद सोडविण्याचे मान्य करण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

०६ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.