चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ जुलै २०२१

Date : 6 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘सीबीएसई’ दहावी, बारावी परीक्षा दोन सत्रांत :
  • करोना विषाणूसाथीमुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा विचार करून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागले असून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचीही एक वार्षिक परीक्षा घेण्याऐवजी दोन परीक्षा घेण्यात येणार आहेत.

  • दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत यंदा पेच निर्माण झाला. गेल्यावर्षी काही विषयांची परीक्षा रद्द करावी लागली तरी यंदा सर्वच परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सलग दोन शैक्षणिक वर्षे निर्माण झालेल्या या परिस्थितीपासून धडा घेऊन चालू शैक्षणिक वर्षांचे (२०२१-२२) नियोजन मंडळाने केले आहे.

  • वर्षभरातील चाचण्या, प्रकल्प यांचे मूल्यमापन अधिक  काटेकोर आणि विश्वासार्ह व्हावे यासाठी आता शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागण्यात आले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना एकच वार्षिक परीक्षा देण्याऐवजी दोन सत्र परीक्षा द्याव्या लागणार आहेत. वर्षभराचा अभ्यासक्रमही दोन सत्रांत विभागण्यात येणार आहे. मंडळाशी संलग्न शाळांसाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रकही देण्यात आले आहे.

लसीकरणासाठी भारताचे ‘कोविन’ सर्व देशांना उपलब्ध करून देणार - मोदी :
  • करोना लसीकरणासाठी भारताचे तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले ‘कोविन’ लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे सांगितले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले कौशल्य आणि स्रोत जागतिक समुदायाला उपलब्ध करून देण्यास भारत बांधील आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

  • ‘कोविन’ जागतिक बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदी म्हणाले की, कोणतेही राष्ट्र मग ते कितीही शक्तिशाली असो या साथरोगाचे आव्हान सोडवू शकलेले नाही हे अनुभवावरून स्पष्ट होत आहे. करोनाविरुद्धच्या लढय़ात भारत सुरुवातीपासूनच आपले अनुभव, कौशल्य आणि स्रोत जागतिक समुदायाला उपलब्ध करून देण्यास बांधील राहिला आहे. मर्यादा असतानाही भारताने जगाला शक्य तितकी मदत केली आहे, असेही मोदी म्हणाले.

  • भारतीय संस्कृतीनुसार संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे आणि करोनामुळे या मूलभूत तत्त्वाची बहुसंख्य जणांना जाणीव झाली आहे, आणि त्यामुळेच कोविड लसीकरणासाठी आपले तंत्रज्ञान व्यासपीठ असलेले ‘कोविन’ लवकरच सर्व देशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

दोन टर्ममध्ये होणार परीक्षा, ‘असा’ असेल अभ्यासक्रम :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE ) २०२१-२२ सत्रासाठी १० आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजना जाहीर केली. त्याअंतर्गत २०२१-२२ च्या तुकडीची बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येईल आणि प्रत्येक टर्ममध्ये ५० टक्के अभ्यासक्रम असेल. प्राप्त माहितीनुसार पहिली टर्म नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर दुसरी टर्म मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे.

  • सीबीएसईने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०२१-२२ चा अभ्यासक्रम दोन कालखंडात विभागला जाईल.  बोर्ड प्रत्येक सत्राच्या शेवटी द्विभाषिक अभ्यासक्रमाच्या आधारे परीक्षा घेईल.

  • दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या योजनेबाबत सीबीएसई म्हणाले की, अंतर्गत मूल्यांकन आणि प्रकल्पांचे काम अधिक विश्वासार्ह व वैध बनविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच शैक्षणिक वर्षात करण्यात आलेल्या सर्व मूल्यांकनांसाठी विद्यार्थ्यांचे प्रोफाइल तयार केले जाईल. हे सर्व डिजिटल स्वरूपात दिले जाईल.

लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतिमान :
  • राज्य लोकसेवा आयोगावरील रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरल्या जातील. लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रि या गतिमान करण्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा मागास (ईएसबीसी) वर्गातील उमेदवारांचे वयोमर्यादा ४३ वर्षे करणे तसेच ११ महिन्यांकरिता झालेल्या नियुक्त्या कायम करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत के ली.

  • लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळालेल्या स्वप्निल लोणकर या युवकाच्या आत्महत्येचे पडसाद सभागृहात उमटले. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्निल लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची गंभीर बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तर आणखी ४३० उमेदवारांनी अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

  • त्यावर लोणकर यांच्या आत्महत्येची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. लोणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

तीन वर्षांपासून एमपीएससी सदस्यांच्या नियुक्त्यांची रखडकथा :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यांच्या रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरण्याची राज्य सरकारच्या वतीने सोमवारी विधिमंडळात घाईघाईने घोषणा करण्यात आली असली, तरी गेल्या तीन वर्षांपासून या नियुक्त्यांची रखडकथा सुरू आहे.

  • विशेष म्हणजे ज्यांच्या मान्यतेने अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका केल्या जातात, त्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सात महिन्यांपूर्वी पाठविलेल्या पत्राचीही दखल घेतली गेली नाही. सध्या अध्यक्ष आणि एकच सदस्य एमपीएससीचा कारभार संभाळत आहेत. अध्यक्षांची मुदतही पुढील महिन्यात संपत आहे.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या के ल्याने राज्य सरकारची उदासीनता आणि एमपीएससीचा कारभार समोर आला आहे. एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा, तसेच विविध परीक्षांचे प्रलंबित असलेले निकाल, हे प्रश्नही पुन्हा एरणीवर आले आहेत.

  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमकपणे हा विषय सभागृहात मांडला. त्यावर सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सदस्यांच्या सर्व रिक्त जागा भरल्या जातील, अशी घोषणा के ली. परंतु जून २०१८ पासून या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, त्यामुळे आधीच्या भाजप-शिवसेना सरकारच्या काळात आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या नियुक्त्यांच्या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे एका अधिकाऱ्याने निदर्शनास आणले.

मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक :
  • महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या  उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. ८ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) टोक्यो स्पर्धा संयोजन समितीशी चर्चा करून ध्वजवाहकांची निवड केली आहे. लैंगिक समानतेला महत्त्व देत भारताने पुरुष आणि महिलांमधून प्रत्येकी एक असे दोन ध्वजवाहक निवडण्याचे ठरवले होते.

  • ‘‘ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस म्हणता येईल. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याचा अभिमान वाटत आहे. याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि ‘आयओए’ची ऋणी आहे. यामुळे मला प्रेरणा मिळाली असून देशाला पदक मिळवून देण्याचे आश्वासन मी देते,’’ असे सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोमने सांगितले.

०६ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.