चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 जानेवारी 2024

Date : 6 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी यांचा रोड शो
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. या महोत्सवाचे बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले. शुभंकर चिन्ह म्हणून महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ची निवड करण्यात आली आहे.
  • विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होत आहे. महाराष्ट्राला १६ वर्षानंतर ही संधी मिळाली आहे. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत असताना रामभूमी नाशिकमध्ये हा महोत्सव होत आहे. अयोध्येत सुरू असलेल्या जय्यत तयारीचा प्रभाव या महोत्सवात दिसणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी युवा महोत्सवाचे उद्घाटन तपोवन येथील मैदानावर होणार आहे. यावेळी हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळ असा रोड शो होईल. महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील. न भूतो, न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
  • केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी युवा महोत्सवामुळे युवकांना देशात आपला ठसा उमटवू शकण्यासाठी व्यासपीठ मिळते, असे नमूद केले. दरम्यान, पंतप्रधानांच्या रोड शोचा मार्ग कसा असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमस्थळालगत हेलिपॅड उभारून रोड शोचे नियोजन करण्यावर प्रशासन विचार करत आहे.
राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुकारणार राज्यव्यापी बेमुदत संप
  • राज्य सरकारने आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात सात हजार, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते. मात्र दीड महिना उलटला तरी याबाबत कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार फसवणूक करीत असल्याची भावना आशा स्वयंसेविकांच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा १२ जानेवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
  • राज्यातील सुमारे ७० हजार आशा स्वंयसेविका व साडेतीन हजारांहून अधिक गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत आहेत. आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मानधनात वाढ करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. आरोग्य मंत्र्यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी कृति समितीसोबत बैठक आयोजित करून आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळीची भेट म्हणून दोन हजार रुपये, आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात सात हजार आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास मोबदला देण्याचेही मान्य केले होते. मात्र गटप्रवर्तकांच्या मानधनात समाधानकारक वाढ नसल्याने संप पुढे लांबला.
  • त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत गटप्रवर्तकांचे मानधन १० हजार रुपये करण्याच्या सूचना अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना दूरध्वनीवरून दिल्या. त्यानंतर संप स्थगित करून १० नोव्हेंबरपासून आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी आ.भा. कार्ड आणि गोल्डन कार्ड काढणे, पीएमएमव्हीवायचे अर्ज ऑनलाईन भरणे अशी कामे पूर्ण केली. मात्र संपकाळात कपात केलेला मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही. तसेच मानधनात वाढ करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप शासन निर्णयही जारी केलेला नाही.
जेएन.१ चा धोका वाढला! राज्यात पुण्यात सर्वाधिक ९१ रुग्ण
  • करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चे राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ७२ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
  • राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यात जेएन.१ चे गुरुवारी पुण्यात ७२ आणि नांदेड २, सोलापूर १, नागपूर १ असे ७८ नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील जेएन.१ च्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक पुण्यात आहेत.
  • पुण्यातील ही रुग्णसंख्या ९१ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ५ रुग्ण असून, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नांदेड २, कोल्हापूर १, अकोला १, सिंधुदुर्ग १, नाशिक १, सातारा १, सोलापूर १, नागपूर १ अशी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, पुण्यात गुरुवारी करोनाचे १५ नवीन रुग्ण आढळले.
राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना; मंदिर ट्रस्टनी शेअर केले फोटो
  • अयोद्धेत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राम मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. १०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता, तो आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनाने एक नवी सुरुवात होत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राम भक्त उत्सूक आहेत.अनेक लोकांना हे भव्य राम मंदिर कसे असेल आणि मंदिराची रचना कशी असेल, याबाबत कायम उत्सूकता होती पण आता सोशल मीडियावर राम मंदिराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • राम मंदिराच्या बांधकामाविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या मुर्तींचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
  • अयोध्येतील राम मंदिराबाहेर गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना स्थापना करण्यात आली. फिक्या गुलाबी रंगाच्या या मुर्ती अतिशय आकर्षक दिसतात. राजस्थानच्या बंसीपहाडपूर गावातून हे दगड अयोद्धेत आणण्यात आले. या दगडाला बलुआ दगड म्हणतात. बलुआ दगडाच्या या मुर्तीनी राम मंदिराची शोभा वाढवली आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळमच्या निमंत्रण पत्रिकेवर मंदिराचे चित्र
  • अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळयासाठीची निमंत्रण पत्रिका निर्माणाधीन मंदिराच्या भव्यतेचे दर्शन घडवत आहे. निमंत्रण पत्रिकेवर मंदिराच्या भव्य छायाचित्रासह प्रभू रामाचे बालरूप समाविष्ट आहे.  मोठया आकाराच्या आणि सुंदर डिझाइन केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एक पुस्तिका देखील असून त्यात रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींचा संक्षिप्त परिचय देण्यात आला आहे.
  • ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळयासाठी अयोध्येची सजावट केली जात आहे. या सोहळयात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र मंदिर ट्रस्टच्या निमंत्रित यादीत सात हजारांहून अधिक लोकांची नावे आहेत, ज्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर,  क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचा समावेश आहे. पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली जात आहेत. अतिथींच्या यादीत मोठया संख्येने संत व काही परदेशी निमंत्रितांचाही समावेश आहे.
  • मुख्य निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर ‘अपूर्व अनादिक निमंत्रण’ (हिंदी) देखील छापलेले आहे. त्यात ‘प्राण प्रतिष्ठे’चा ‘शुभ मुहूर्त’ दुपारी १२ वाजून २० मिनिटे  असाही उल्लेख आहे. ‘रामायण’ या मालिकेत भगवान राम आणि देवी सीता यांच्या भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

 

परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार; ‘यूजीसी’ची नियमावली : प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरविण्याची मुभा :
  • परदेशातील नामांकित किंवा जागतिक क्रमवारीनुसार अव्वल ५०० विद्यापीठांसाठी भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे आता पूर्णपणे उघडली आहेत. भारतातील विद्यापीठांसाठी असलेले नियम, आरक्षण, शुल्कनियमन परदेशी विद्यापीठांना लागू होणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.

  • विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावलीचा अंतरिम मसुदा तयार केला असून, त्यावर आलेल्या सूचना, हरकतींचा विचार करून तो या महिनाअखेरीस अंतिम केला जाणार आहे. आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 

  • सध्या साधारण १८ लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. परदेशांतील विद्यापीठांकडे धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात राहूनच परदेशी विद्यापीठांत शिकण्याची मुभा येत्या काळात मिळू शकेल. विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यापीठांना भारतात केंद्र किंवा शाखा सुरू करता येईल. सर्वसाधारण क्रमवारी, विद्याशाखानिहाय किंवा विषयनिहाय क्रमवारी यापैकी कोणत्याही क्रमवारीत पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये स्थान असलेली विद्यापीठे त्यासाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे क्रमवारीत सहभागी न होणारी नामांकित विद्यापीठेही पात्र ठरतील. प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांकडेच राहतील. त्यावर आयोगाचे किंवा इतर अधिकार मंडळांचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही. मात्र, भारतात विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग भरवावे लागतील.

  • ऑनलाइन किंवा दूरशिक्षण वर्ग सुरू करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवृत्ती, योजना आखण्याची मुभा विद्यापीठांना असेल. मात्र, त्याची आर्थिक तरतूदही विद्यापीठांनीच करायची आहे. सुरुवातीला दहा वर्षांसाठी परवानगी देण्यात येईल. त्यानंतर परवान्याचे नूतनीकरणही करता येऊ शकेल.

अखेर राम मंदिराची तारीख ठरली; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर : 
  • त्रिपुरा येथे भाजपाची जन विश्वास यात्रा सुरु आहे. या सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल.त्रिपुरामधील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमित शाह म्हणाले की, २०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, “मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे”. तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.”

  • अमित शाह यावेळी म्हणाले की, “फक्त राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत आहे.”

  • अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. आता १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

गोव्यातील नव्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान; केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे यश :  
  • पणजी येथील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी पहिले प्रवासी विमान उतरले. याबरोबरच गोव्यातील या नव्या विमानतळाचे औपचारिक कामकाज सुरू झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ‘राज्य आणि केंद्र सरकारचे हे मोठे यश आहे.’

  • हैदराबाद येथून १७९ प्रवाशांना घेऊन आलेले इंडिगोचे विमान उत्तर गोव्यातील मोपा येथील नव्या विमानतळावर सकाळी नऊ वाजता पोहोचले. केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री सावंत आणि गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खौंटे यांनी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत प्रवाशांचे स्वागत केले. गोव्यात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले.

  • मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, ‘‘राज्य आणि केंद्र सरकारचे हे मोठे यश आहे. आता गोव्यात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ’’

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नव्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे.

  • अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी २ हजार ८७० कोटी रुपये खर्च झाला आहे. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे ४४ लाख जण प्रवास करू शकतात.

राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा; नागपूरच्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला दुसऱ्यांदा अजिंक्यपद; मेरी गोम्स उपविजेती : 
  • ४८ व्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी नागपूरची सतरा वर्षाची तिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने साडेनऊ गुणासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकाविला. तिला चषक व सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

  • दिव्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णीला चुरशीच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या भक्तीला अडीच लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले.

  • महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारीला उत्कृष्ट डावपेच आखत पराभूत करून उपविजेतेपदासह रोख पाच लाख रुपयाची कमाई केली. अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवालने महिला ग्रँडमास्टर निशा मोहोता हिला ५८ व्या चालीला पराभूत करून तिसऱ्या क्रमांकाचे चार लाखाचे बक्षिस मिळवले. उद्योगपती संजय घोडावत व ध्यानचंद पुरस्कार विजेते व भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अनुप देशमुख, शशिकांत कुलकर्णी, प्राचार्य विराट गिरी, विलास म्हात्रे भरत चौगुले, उपस्थित होते.

चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये रुग्णशय्या उपलब्ध नाहीत : 
  • चीनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून बीजिंगमध्ये रुग्णशय्याच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अनेक वृद्ध रुग्ण रुग्णालयाच्या आवारात स्ट्रेचरवर उपचार घेत आहेत, तर काही जणांना व्हीलचेअरवरच प्राणवायू लावण्यात आलेला आहे.

  • बीजिंग शहराच्या पूर्वेकडील चुईयांगलीयू रुग्णालय गुरुवारी नव्याने आलेल्या रुग्णांनी खचाखच भरले होते. गुरुवारी सकाळीच रुग्णशय्या संपल्या होत्या तरीही रुग्णवाहिका रुग्णांना आणत होत्या. डॉक्टर आणि परिचारिकांकडून अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांचीच तपासणी करण्यात येत होती. चीनमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक देशांनी चिनी प्रवाशांवर निर्बंध लादले असून चीनमधून प्रवास करणाऱ्यांना करोना चाचणीचा अहवाल उपलब्ध करणे सक्तीचे केले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ओमायक्रॉनचे ११ उपप्रकार

  • नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार सापडल्यानंतर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत असून २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान करोनाबाधित असलेल्या १२४ आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये ११ ओमायक्रॉनचे उपप्रकार आढळले आहेत. सरकारी सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.

  • या कालावधीत विमानतळे व सागरी बंदरे या ठिकाणी १९,२२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी १२४ करोनाबाधित आढळले असून त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १२४ करोनाबाधित नमुन्यांपैकी ४० जणांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्यापैकी १४ नुमन्यांमध्ये ‘एक्सबीबी’ आणि एका नमुन्यात ‘बीएफ ७.४.१’ हा उपप्रकार आढळला आहे.

  • २४ डिसेंबरपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांसाठी सरकारने यादृच्छिक करोना चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. याशिवाय चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १ जानेवारीपासून करोना निगेटिव्ह अहवाल देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ जानेवारी २०२२

 

पंच अल्लाउद्दीन पालेकर यांची १५ वर्षांनी स्वप्नपूर्ती :
  • भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय वंशाचे अल्लाउद्दीन पालेकर मुख्य पंचांची भूमिका बजावत आहेत. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालेकर यांना प्रथमच कसोटी सामन्यात पंचगिरी करण्याची संधी मिळाली.

  • पालेकर आफ्रिकेचे ५७वे आणि विश्वातील ४९७वे पंच आहेत. मरायस इरास्मस यांना गुरू मानणारे पालेकर आज त्यांच्याच साथीने पंचगिरी करत आहेत. त्यांचे वडील आणि काकासुद्धा पंच असून रत्नागिरीत खेड तालुक्यात पालेकर यांचे गाव आहे.

  • १५ वर्षांपूर्वी पंच कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या पालेकर यांनी २०१८मध्ये भारत-आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत मैदानावरील पंचाची धुरा वाहिली. १ जानेवारी रोजी पालेकर यांनी वयाची ४४ वर्षे पूर्ण केली. २००६पर्यंत आफ्रिकेतील टायटन्स संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी पंचगिरीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

  • ‘‘जेव्हा मी पंचाची भूमिका बजावण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून एकदा तरी कसोटी सामन्यात पंच म्हणून कार्य करण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. त्यामुळे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो, त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,’’ असे पालेकर म्हणाले.

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद :
  • करोना, विशेषत: ओमायक्रॉन उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच स्वयंअर्थसहित, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या काळात वर्ग आणि परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील.

  • महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच राहील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. करोनाचा उद्रेक आणि विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षांबाबतही चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून जनतेश संवाद साधताना स्पष्ट केले. 

  • करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळांपाठोपाठ महाविद्यालये बंद करण्याबाबत मंगळवारी कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केल्यावर सामंत यांनी निर्णय जाहीर केला.  विद्यार्थी हा केंद्रिबदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्यभरात प्रतिजन चाचण्यांवर भर ; गृहविलगीकरण आता सात दिवस :
  • राज्यात आता   गृहविलगीकरणाचा कालावधी फक्त सात दिवस करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच प्रतिजन (अँटीजेन) चाचण्यांवर अधिक भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले. सध्या टाळेबंदीची गरज नसून, रुग्णसंख्येनुसार निर्बंध लागू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • राज्यात करोनाचा उद्रेक झाला असून, तीन-चार दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ दुप्पट होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून गृहविलगीकरण, आरटीपीसीआर चाचण्या, प्रतिजन चाचण्या व अन्य बाबींसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.

  • गृहविलगीकरणाचा दहा दिवसांचा कालावधी कमी करून सात दिवसांवर आणण्यात आला़  सात दिवसांनंतर पुन्हा रुग्णाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत किंवा फारसा त्रासही नाही.

  • एक-दोन टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

करोनाबाधितांच्या संख्येत ओमायक्रॉनचे प्रमाण अधिक :
  • देशभरातील विविध शहरांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून नव्या बाधितांमध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण अधिक असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. मात्र नागरिकांनी भयग्रस्त होऊ नये आणि करोना नियम आणि प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचनाही केंद्राकडून देण्यात आल्या.

  • अनेक शहरांमध्ये करोनाचा उद्रेक झाला असून दैनंदिन रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे चित्र आहे. करोनाबाधितांच्या नव्या नोंदींमध्ये ओमायक्रॉनचेच अधिक रुग्ण असून ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्बंधांसदंभातील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी मोठय़ा संख्येने गर्दी करणे आणि सामूहिक मेळावे यांवर निर्बंध घातले पाहिजे, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

  • जगभरात मंगळवारी २५.२ लाख नागरिकांना करोनाची लागण झाली असून एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ असून ओमायक्रॉनचा प्रसार किती वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

०६ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.