चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ फेब्रुवारी २०२०

Date : 6 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय कॅरम स्पर्धा - गतविजेते प्रशांत, रश्मी चौथ्या फेरीत : 
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सुरू असलेल्या ४४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत बुधवारी गतविजेता प्रशांत मोरे आणि रश्मी कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीची चौथी फेरी गाठली.

  • पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या प्रशांतने तेलंगणाच्या यू. नरेशवर २४-२०, २५-१८ अशी मात केली. मात्र माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीला उत्तर प्रदेशच्या अब्दुल रेहमानकडून २४-२५, १८-९, ७-२१ असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. याव्यतिरिक्त, महाराष्ट्राच्या राजेश गोहिलने आसामच्या अजित दासवर १७-१३, २०-१४ असा विजय मिळवला. तर निसार अहमदने एअर इंडियाच्या एम. नटराजला २५-९, २१-१७ अशी धूळ चारून पुढील फेरीत आगेकूच केली.

  • महिलांमध्ये पाटणाच्या रश्मी कुमारीने ऑटोमिक एनर्जीच्या अक्षता खोतचा २५-०, २५-० असा फडशा पाडला. पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या काजल कुमारीने भानू दास मेढीचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवला.

  • महाराष्ट्राच्या मैत्रेयी गोगटे हिने एम. खजिमा हिच्यावर ६-२०, २५-०, २२-१७ अशी चुरशीच्या लढतीत सरशी साधून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

पाच वर्षांत पाच अब्ज डॉलरच्या संरक्षण सामग्रीची निर्यात : 
  • भारताने येत्या पाच वर्षांत ५ अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्री  निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे अकराव्या संरक्षण सामग्री प्रदर्शनाचे उद्घाटन करताना सांगितले.

  • केंद्र सरकारने संरक्षण उत्पादन वाढ व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. भारतासारख्या खंडप्राय देशाने संरक्षण सामग्रीसाठी आयातीवर अवलंबून राहणे योग्य नाही असे सांगून ते म्हणाले की,‘ २०१४ मध्ये २१० संरक्षण उत्पादन परवाने दिले होते, आता त्यांची संख्या पाच वर्षांत ४६० झाली आहे. भारत लष्करी तोफा, विमानवाहू युद्धनौका, पाणबुडय़ा, हलकी लढाऊ विमाने, लढाऊ हेलिकॉप्टर्स तयार करीत आहे.

  • ‘मेक इन इंडिया फॉर इंडिया’ हा आमचा मंत्र आहे. २०१४ मध्ये भारतातून २००० कोटींची संरक्षण सामग्री निर्यात झाली, तर गेल्या दोन वर्षांत १७००० कोटींची संरक्षण सामग्री निर्यात करण्यात आली. येत्या पाच वर्षांत ५ अब्ज डॉलर्सची म्हणजे अंदाजे ३५ हजार कोटींची संरक्षण सामग्री निर्यात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उत्तर प्रदेशात मोठय़ा प्रमाणात संरक्षण उत्पादन कारखाने उभारण्यात येत आहेत.

  • गेल्या काही दशकात योग्य धोरणांच्या अभावी भारत हा संरक्षण सामग्रीचा मोठा आयातदार देश होता, आता हे चित्र बदलत आहे.’  जगाला तंत्रज्ञानाचा गैरवापर, दहशतवाद व सायबर गुन्हे यापासून मोठा धोका असल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करण्याची योजना आहे.

राम मंदिर न्यासाला मंजुरी : 
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीला फक्त तीन दिवस उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)च्या स्थापनेची बुधवारी लोकसभेत घोषणा केली. या घोषणेआधी केंद्रीय मंत्रिमंडळाने न्यासाच्या स्थापनेला परवानगी दिली. न्यासामध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात येणार असून त्यात दलित सदस्यही असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

  • न्यासाच्या स्थापनेच्या घोषणेमुळे केंद्र सरकारकडून आचारसंहितेचा भंग झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे केंद्र सरकारने पालन केले असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी निकाल देताना तीन महिन्यांत केंद्र सरकारने न्यासाची स्थापना करावी असा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत रविवारी ९ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने केंद्र सरकारने न्यासाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • राम मंदिराचे बांधकाम तसेच संबंधित विषयावर ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ न्यास स्वतंत्रपणे निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यासाची स्थापना करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा करताना मला आनंद होत आहे, असे मोदी लोकसभेत म्हणाले.

सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकेचा अंकुश : 
  • देशातील नागरी तसेच, बहुराज्यीय सहकारी बँकांच्या नियमनाची रिझव्‍‌र्ह बँकेची अधिकार कक्षा व्यापक करण्यासाठी बँकिंग नियमन कायद्यात दुरुस्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  • वित्तीय गैरव्यवस्थापनामुळे पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक डबघाईला येऊन हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले. या घटनेनंतर देशभरातील सहकारी बँकांच्या आर्थिक व्यवहारांबाबत साशंक नजरेने पाहिले जाऊ  लागले होते. पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेचे गैरव्यवस्थापन उघड झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने ठेवीदारांना सहा महिन्यांत फक्त एक हजार रुपये काढण्याची मर्यादा घातल्यानंतर ठेवीदारांमध्ये गोंधळ माजला होता. सहकारी बँकांमधील घोटाळे आटोक्यात आणण्यासाठी कायद्यात बदल केला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांंमध्ये सहकारी बँकांमध्ये दोनशे कोटी रुपयांहून अधिक रकमेचे एक हजार घोटाळे झाले आहेत. सहकारी बँकांमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत असा दबाव ठेवीदारांकडून येत होता.

  • सहकारी बँकांवर सहकारी निबंधक आणि रिझव्‍‌र्ह बँक या दोन्ही संस्थांचे नियंत्रण असते. नागरी सहकारी बँकांवर रिझव्‍‌र्ह बँकांचा अधिक अंकुश असतो. कायद्यातील दुरुस्तीत रिझव्‍‌र्ह बँकेची ही अधिकार कक्षा अधिक विस्तारण्यात येणार आहे. यात, ग्रामीण भागांतील सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला नसल्याचे सांगितले जाते. कायद्यात नेमक्या कोणत्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. देशभरातील १५४० सहकारी बँकांमध्ये ८.६ कोटी ठेवीदारांच्या ५ लाख कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवीदारांच्या हक्काच्या रक्षणासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

चीनमधील करोना बळींची संख्या ४९० : 
  • चीनमध्ये नवीन करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या मंगळवारी ४९० झाली असून निश्चित रुग्णांची संख्या २४३२४ झाली आहे. मंगळवार अखेरीस ३१ प्रांतात विषाणू पसरल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • मंगळवारी एकूण ६५ बळी गेले असून ते वुहानमधील आहेत. मंगळवारी एकूण ३८८७ नवीन रुग्ण निष्पन्न झाले असून  ४३१ रुग्ण हे गंभीर आजारी आहेत. २६२ जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. एकूण २.५२ लाख लोक रुग्णांच्या संपर्कात आले असून १.८५ लाख लोकांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

  • मंगळवार अखेरीस १८ रुग्ण सापडले असून हाँगकाँग प्रशासकीय विभागात एकाचा मृत्यू झाला तर मकाव येथे १० व तैवानमध्ये ११ रुग्ण सापडले आहेत.

०६ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.