चालू घडामोडी आणि दिनविशेष - 06 एप्रिल 2023

Date : 6 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
न्यूझीलंड-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका:मिल्नेमुळे न्यूझीलंडचा विजय
  • वेगवान गोलंदाज ॲडम मिल्नेच्या (५/२६) भेदक माऱ्यानंतर टीम सेइफर्टच्या (४३ चेंडूंत नाबाद ७३) तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने बुधवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर नऊ गडी राखून सहज विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
  • मिल्नेच्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव १९ षटकांत १४१ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर न्यूझीलंडने १४.४ षटकांत १ बाद १४६ धावा करून विजय मिळवला. सेइफर्टने नाबाद ७३ धावांच्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याला चॅड बोव्स (१५ चेंडूंत ३१) आणि कर्णधार टॉम लॅथम (३० चेंडूंत नाबाद २०) यांची साथ मिळाली.
  • तत्पूर्वी, धनंजय डिसिल्वा (२६ चेंडूंत ३७) आणि कुसाल परेरा (३२ चेंडूंत ३५) या श्रीलंकेच्या दोनच फलंदाजांना ३० धावांचा टप्पा ओलांडता आला. पहिल्या सामन्यात परेराने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. श्रीलंकेने तो सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना शनिवारी (८ एप्रिल) होणार आहे.
मुंबईतील एअर इंडियाची इमारत शिंदे सरकार ‘इतक्या’ कोटींना विकत घेणार
  • राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची प्रसिद्ध इमारत विकत घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे त्या इमारतीला शिंदे सरकार मंत्रालयाच्या विस्तारात रूपांतरित करण्याच्याही प्रयत्नात आहे. इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या १,६०० कोटी रुपयांच्या अंतिम ऑफरला तत्त्वतः मान्यता दिली होती. केंद्र सरकारनं तिथली सगळी कार्यालये हलवून १०० टक्के इमारतीचा ताबा आमच्याकडे दिल्यासच हा करार प्रत्यक्षात उतरणार असल्याचंही एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितलं आहे.

इमारत २,००० कोटींहून अधिक किमतीची

  • एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगितले होते की, त्यांच्या मते या इमारतीची किंमत २,००० कोटींहून अधिक आहे. परंतु सरकारला एअर इंडियाकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची असल्याचंही राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

उद्धव सरकारने १४५० कोटी देऊ केले होते

  • विशेष म्हणजे त्या इमारतीसाठी मागील उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुमारे १,४५० कोटी रुपये देऊ केले होते. परंतु त्यावेळी काही तांत्रिक कारणास्तव तो करार होऊ शकला नव्हता.

२०२१ मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली

  • अधिकाऱ्याने सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अंतर्गत २०२१ मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, परंतु कोणताही करार झाला नाही.
बारावीच्या अभ्यासक्रमातून गांधीजींवरील प्रकरणे ‘गायब’; हिंदू अतिरेकी, संघबंदीबाबत परिच्छेदांनाही ‘एनसीईआरटी’ची कात्री
  • राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) नवीन शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्र पाठय़पुस्तकातून महात्मा गांधींवरील काही प्रकरणे काढून टाकण्यात आली असून हिंदूू अतिरेकी, संघावरील बंदी आदी उतारेही वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र एनसीईआरटीने गतवर्षी जूनमध्ये हा अभ्यासक्रम निश्चित झाला असून यंदा कोणताही मजकूर वगळला नसल्याचा दावा केला आहे.
  • अभ्यासक्रम तर्कसंगत करण्याचे कारण सांगून ‘एनसीईआरटी’ने गुजरात दंगल, मुघल राजवट, आणीबाणी, शीतयुद्ध, नक्षलवादी चळवळ आदी संदर्भातील काही अंश पाठय़पुस्तकातून वगळला होता. यावर टीका होत असतानाच आता ‘एनसीईआरटी’च्या बारावीच्या सामाजिकशास्त्राच्या पाठय़पुस्तकात ‘पॉलिटिक्स इन इंडिपेंडंट इंडिया पार्ट-२’ या पाठय़पुस्तकात महात्मा गांधींच्या हत्येचा देशातील धार्मिक स्थितीवर परिणाम, गांधींजींच्या हिंदूू-मुस्लीम ऐक्याच्या संकल्पनेमुळे हिंदू अतिरेक्यांना मिळालेली चिथावणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळासाठी लादलेली बंदी आदी उताऱ्यांचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.
  • यावर स्पष्टीकरण देताना ‘एनसीईआरटी’चे संचालक दिनेश सकलानी म्हणाले, की डॉ. रामचंद्र गुहा, प्रा. सुनील खिलनानी आणि डॉ. महेश रंगराजन या तज्ज्ञांना आशयासंदर्भात संपूर्ण तटस्थता राखली जावी, यासाठी पुस्तक अभ्यासण्याची विनंती केली होती. अभ्यासक्रम तर्कसंगत बनवण्याचे काम गेल्या वर्षी झाले. या वर्षी या संदर्भात काही नवीन झालेले नाही. परंतु अभ्यासक्रम ‘तर्कसंगत’ करताना वगळलेल्या भागांबाबत भाष्य करणे मात्र सकलानी यांनी टाळले.
  • करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार कमी करण्यात आल्याचे एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत नवीन अभ्यासक्रमाच्या आराखडय़ावर अद्याप काम सुरू आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ पासून नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल.
बायडेन यांच्या काळात जगात तिसरे महायुद्ध- डोनाल्ड ट्रम्प
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या प्रशासनावर अमेरिका उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला असून, जो बायडेन यांच्या कारकीर्दीत जगाला तिसरे महायुद्धास तोंड द्यावे लागेल. यात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा दावा केला. ७६ वर्षीय ट्रम्प यांनी एका प्रकरणात दोषी आढळल्यानंतर आरोप निश्चित झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक भाषणात हे सांगितले.गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजेरी लावताना व्यावसायिक नोंदींमध्ये फेरफार करण्यासंदर्भातील ३४ गंभीर आरोपप्रकरणी निर्दोष असल्याचाही दावा केला.
  • २०१६ च्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारादरम्यान तिने अश्लील चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री (पोर्न स्टार) स्टॉर्मी डॅनियल्सला मौन राखण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपाशी संबंधित फौजदारी सुनावणीसाठी ट्रम्प मंगळवारी न्यायालयात दाखल झाले होते.
  • न्यूयॉर्कहून परतल्यानंतर फ्लोरिडा येथील त्यांच्या ‘मार-ए-लागो रिसॉर्ट’मध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, की अनेक देश उघडपणे अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देत आहेत. आपल्या कारकीर्दीत अशी धमकी कोणीही दिली नाही. आपल्या काळात असे वक्तव्य, साधा उल्लेखही कोणी केला नाही. बायडेन प्रशासनाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अण्वस्त्रयुक्त तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होण्याची दाट शक्यता दिसत आहे. अध्यक्ष बायडेन यांच्या राजवटीत देश गोंधळात पडला आहे. आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे.
  • महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. रशियाने चीनशी हातमिळवणी केली आहे. सौदी अरेबियाने इराणशी हातमिळवणी केली आहे. चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांनी विध्वंसक युती केली आहे. आपल्या काळात हे कधीच घडले नसते. युक्रेनमधील विध्वंसाचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘जर मी तुमचा अध्यक्ष असतो तर असे कधीच घडले नसते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला नसता.
कर्मचारी कपातीविरोधात लंडनमधील कर्मचाऱ्यांचे वॉकआऊट; युनाइटचे ​​अधिकारी मॅट व्हेली म्हणाले, “जोपर्यंत गुगल…”
  • आर्थिक मंदीचा फटका बसत असल्याने खर्च कमी करण्यासाठी अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी दोन वेळा कर्मचारी कपात केली आहे. Google मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्यात आली होती.

  • गुगलने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाच्या विरोधात लंडनमधील गुगलच्या कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी वॉकआउट केले. या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल २,९०,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. संपूर्ण टेक क्षेत्रामध्येच नोकर कपातीची लाट पसरली आहे.

  • गुगलच्या लंडन कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ट्रेड युनियन युनाइटने कर्मचार्‍यांच्या चिंतेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनाइटचे ​​प्रादेशिक अधिकारी मॅट व्हेली म्हणाले की , Google ला याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत Google त्यांच्या कामगारांना सन्मानाने वागवत नाही तोपर्यंत ते आणि युनाइट मागे हटणार नाही.

  • गुगलचे यूकेमध्ये ५,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. गुगलने जानेवारीमध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर अमेरिकेत छाटणीचा टप्पा सुरू झाला. सर्च इंजिन कंपनी गुगलने केलेल्या घोषणेनंतर सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.


 

कोरिया खुली बॅडिमटन स्पर्धा: लक्ष्य, मालविका दुसऱ्या फेरीत :
  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि उदयोन्मुख खेळाडू मालविका बनसोड यांनी संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवत मंगळवारी कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

  • लक्ष्यने कोरियाच्या चोई जी हूनला १४-२१, २१-१६, २१-१८ असे पराभूत केले, तर मालविकाने चीनच्या हान युईला २०-२२, २२-२०, २१-१० असे नमवत आगेकूच केली. स्विस खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या एचएस प्रणॉयने मलेशियाच्या चीम जून वेईकडून १७-२१, १७-२१ अशी हार पत्करली.

  • दुहेरीच्या लढतीत कृष्ण प्रसाद गरगा आणि विष्णूवर्धन गौड या पुरुष दुहेरीच्या जोडीला इंडोनेशियाच्या प्रमुद्या कुसुमावर्दना आणि येरेमिया एरिचकडून १४-२१, १९-२१ असे पराभूत व्हावे लागले.

इलोन मस्क ‘ट्विटर’चे नवे संचालक ; कंपनीतील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक :
  • टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला. अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत. मस्क हे २०२४ पर्यंत ‘ट्विटर’चे वर्ग -२ संचालक असतील. कंपनीचा मालकीहक्क बदलू नये यासाठी केलेली ही उपाययोजना दिसते. नव्या नियुक्तीनुसार मस्क ट्विटरचे १४.९ भागांपेक्षा जास्त भाग भांडवल घेऊ शकणार नाहीत.

  • ‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांच्या संचालक मंडळावरील संभाव्य नियुक्तीस दुजोरा दिला. त्यांनी नमूद केले, की मस्क यांची प्रभावी सेवा पुरवण्यावर अतीव श्रद्धा असून, त्याबाबत ते कडवे टीकाकारही आहेत. ‘ट्विटर’च्या संचालक मंडळाला ते उंची प्राप्त करून देतील. 

  • ‘ट्विटर’ने आयोगाकडे सुपूर्द केलेल्या कागदपत्रांत नमूद केले आहे, की मस्क यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करणार असून, ते वर्ग -२ संचालक म्हणून कंपनीच्या भागधारकांच्या २०२४ मध्ये होणाऱ्या वार्षिक सभेपर्यंत कार्यरत राहतील. या कार्यकाळात आणि त्यानंतरचे तीन महिने मस्क स्वत: अथवा त्यांच्या समूहाचे सदस्य म्हणून कंपनीच्या १४.९ भागांपेक्षा जास्त भागभांडवलाची मालकी घेऊ शकणार नाहीत.

  • ‘ट्विटर’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांनी मस्क यांच्या ट्विटरच्या संचालक मंडळावरील नियुक्तीचे स्वागत करून, मस्क यांना जग व त्यातील ट्विटरच्या भूमिकेविषयी विशेष काळजी आहे व तशी ते समर्थपणे घेतील, असे सांगितले. डोर्से यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभार सोडला असला तरी ते मेपर्यंत ‘ट्विटर’च्या संचालकपदी असतील.

पश्चिम महाराष्ट्रात पहिले वन्यजीव उपचार केंद्र मंजूर; कराडजवळील वराडे गावाची निवड :
  • पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शासकीय वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) पुणे-बंगळूरू महामार्गावरील वराडे (ता. कराड) येथे मंजूर झाले आहे. त्यासाठी शासनाकडून उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे नुकताच ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

  • मंत्री पाटील म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीने सुसज्य असे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे. याचा फायदा सातारा जिल्हयाबरोबरच कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांवर तात्काळ उपचार करण्यासाठी होणार आहे.

  • सद्यस्थितीमध्ये जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतु, मूलत: वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी वेगळय़ा सुविधांची आवश्यकता असते, वन्यप्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासामध्ये सोडणे आवश्यक असते.

  • या दृष्टीने आवश्यक उपचारपद्धती जसे की रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यासारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. सदर उपचार केंद्रामध्ये मांसभक्षी प्राणी-पक्षी व प्राणी-पक्षी, तसेच जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळय़ा पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल. त्यांना आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक अधिवासाशी मिळते-जुळते वातावरणही येथे तयार करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

साताऱ्यात  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन :
  • साताऱ्यात  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सर्व मल्लांनी खिलाडू वृत्तीने मैदान गाजवावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले.  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मंगळवारी संध्याकाळी सुरवात करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,सहकार  व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,यावेळी कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबरावभाऊ पवार, धनाजी फडतरे, अमोल बुचडे, बलभीम शिंगरे, दीपक पवार, संदीप साळुंखे, जिल्‍हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल आदींच्या उपस्थितीत आज  ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

  • कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने साताऱ्यातील शाहू स्टेडियमला वेगळी झळाळी आली आहे.आज उदघाटना दिवशी ५७,७० आणि ९२ किलो वजनी गटातील कुस्त्या करून सुरवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आज शुभारंभाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. सुधीर पवार यांनी प्रास्ताविक केले.या आखाड्यात राज्यभरातून ९०० मल्ल ११० प्रशिक्षक पंच सहभागी होणार आहेत.या स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्ती शौकिन उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.

  •    कुस्ती खेळणाऱ्यांना मदत करुन चालणार नाही तर ज्यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी घालवल अशा सेवानिवृत्त कुस्तीगिरांना मदत शासनाने केली पाहिजे. त्यांना पद दिले गेले पाहिजे. शासनाला हा निर्णय घ्यायला लागणार आहे असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा अशी ज्येष्ठ नेते शरद पवारांची इच्छा होती आणि त्यांच्या आग्रहावरून साताऱ्याला ही स्पर्धा होत आहे.

मोदी सरकाने सुरक्षेच्या दृष्टीने १८ भारतीय आणि ४ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्स केले बॅन; वाचा यादी :
  • केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ४ पाकिस्तानी YouTube चॅनेलसह २२ YouTube चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

  • हे चॅनल राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मंत्रालयाने ३ ट्विटर अकाउंट, १ ​​फेसबुक पेज आणि १ वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटलंय की, “माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी नियम, २०२१ अंतर्गत २२ YouTubeवरील न्यूज चॅनेल, ३ ट्विटर अकाउंट, १ फेसबुक अकाउंट आणि १ न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी आपत्कालीन अधिकारांचा वापर केला आहे.

  • या YouTube चॅनेलचे एकूण सब्स्क्रायबर्स लाखांमध्ये होते. या चॅनलवर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था या संवेदनशील विषयांवर खोट्या बातम्या दाखवल्या.”

आयआयटी कानपूरला १०० कोटींची देणगी देणारे ‘राकेश गंगवाल’ कोण आहेत माहिती आहे का? जाणून घ्या :
  • आयआयटी कानपूर महाविद्यालयाला तब्बल १०० कोटींची देणगी मिळाली आहे. प्रथमच एका माजी विद्यार्थ्याने एखाद्या महाविद्यालयाला एवढी मोठी आर्थिक मदत केली आहे. हा निधी स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीसाठी वापरला जाणार असून आयआयटी कानपूरमध्ये यासाठी एक इमारत तयार केली जात आहे. इतकी मोठी रक्कम देणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे नाव आहे राकेश गंगवाल.

  • आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांनी सोमवारी मुंबईत गंगवाल यांची भेट घेतली, जिथे गंगवाल यांनी त्यांच्या पूर्वीच्या महाविद्यालयासाठी १०० कोटींची देणगी जाहीर केली. आयआयटी कानपूर या प्रकल्पासाठी निधी उभारत आहे, ज्यासाठी ६०० कोटी खर्च येणार आहे. योजनेनुसार, या नवीन संस्थेमध्ये एकूण ९ प्रगत संशोधन केंद्रे बांधली जातील.

  • आयआयटी कानपूर या उपक्रमाद्वारे वैद्यकशास्त्राला अभियांत्रिकीसह एकत्रित करण्याचा आणि क्रॉस-डिसिप्लिनरी लर्निंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे क्षेत्रफळ सुमारे दहा लाख चौरस फूट असेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा तीन ते पाच वर्षांत पूर्ण होईल.

“इम्रान खान ‘या’ गोष्टीची किंमत मोजत आहेत”, पाकिस्तानमधील उलथापालथीबाबत रशियाचा गंभीर आरोप :
  • पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचं न ऐकता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यामुळे त्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे, असा आरोप रशियाने केलाय. या भेटीसाठीच इम्रान खान यांना शिक्षा दिली जात असल्याचं रशियाने म्हटलंय.

  • रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया झकारोव्हा यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “२३-२४ फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या भेटीची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी जोरदार दबाव आणला. तसेच हा रशिया दौरा रद्द करण्याबाबत अल्टिमेटम दिला. आपल्या स्वार्थी हेतूंसाठी एका स्वायत्त देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा अमेरिकेचा निर्लज्ज प्रयत्न आहे. वरील घटनाक्रम याला दुजोरा देतो.”

  • विशेष म्हणजे पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी देखील यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप केलाय. आपल्या रशिया दौऱ्यामुळे परकीय शक्ती विचलित झाल्याचं ते म्हटले. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याच दिवशी म्हणजे २५ फेब्रुवारीला मॉस्कोमधील क्रेमलिन येथे ब्लादिमीर पुतिन यांना भेटले होते. अशी भेट घेणारे इम्रान मागील २३ वर्षांमधील पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ठरले. त्याआधी नवाज शरीफ यांनी एप्रिल १९९९ मध्ये रशिया दौरा केला होता.

०६ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.