चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 मे 2023

Date : 5 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बंगालपुढे हैदराबादी नवाब पडले फिके! कोलकाताचा पाच धावांनी थरारक विजय
  • आयपीएलच्या ४७व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी संपन्न झाला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. त्यात कोलकाताच्या वरुण चक्रवर्तीने शेवटचे जादुई षटक टाकत नाईट रायडर्सला अटीतटीच्या सामन्यात पाच धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. कोलकाताने हैदराबादच्या घरात जाऊन त्यांना मात दिली. यापराभवामुळे हैदराबादची प्ले ऑफमध्ये जाण्याची वाट बिकट झाली आहे.
  • कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात नऊ धावा कराव्या लागल्या. अशा स्थितीत नितीश राणाने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला गोलंदाजीसाठी बोलावले. त्याच्यासमोर अब्दुल समद आणि भुवनेश्वर कुमार हे स्फोटक फलंदाज होते. वरुणने पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा दिल्या. तिसऱ्या चेंडूवर त्याने अब्दुल समदला अनुकुल रॉयकरवी झेलबाद केले. मयंक मार्कंडे समद बाद झाल्यानंतर क्रीजवर आला. चौथ्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. पाचव्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली, स्ट्राईक भुवनेश्वर कुमारला मिळाली. सामना जिंकण्यासाठी त्याला षटकार मारायचा होता, मात्र वरुणने त्याला एकही धाव काढू दिली नाही आणि संघाला विजय मिळवून दिला.
  • कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघ २० षटकांत ८ गडी गमावून १६६ धावाच करू शकला. २०२० नंतर हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील हा आठवा सामना होता. कोलकाताने सहावा विजय मिळवला आहे. त्याला केवळ दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मोसमात सनरायझर्स संघ पाचव्यांदा धावत होता. त्यांना चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.
बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण
  •  बौद्ध तत्त्वज्ञानाने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. आज आपल्याकडे संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय बौद्ध धर्म हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हे जरी खरे असले तरी प्राचीन काळात भारताबाहेरील इतर देशांना बौद्ध धर्माचे आकर्षण होते, हेही संशोधनातून सिद्ध झाले आहे.
  • प्राचीन जगाला भारतीय बौद्धधर्माची भुरळ पडली होती, हे सांगणारे पुरावे इजिप्त येथे झालेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात अलीकडेच समोर आले आहेत.
  • इजिप्त येथे एका मंदिरात ‘गौतम बुद्ध’ यांची मूर्ती सापडल्याची नोंद पुरातत्त्व अभ्यासकांनी केली आहे. अशा प्रकारे इजिप्तसारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देशामध्ये सापडलेली ही बुद्ध मूर्ती प्राचीन भारत व इजिप्त यांच्यातील दृढ संबंधांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करते.
‘मन की बात’चे अमेरिकेतही श्रोते, पण राज्यनिहाय यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही; टॉप टेनमध्ये कोणती राज्ये?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा नुकताच १०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. भाजपाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती. हेच ‘मन की बात’ ऐकण्यात भारतासह अमेरिका आणि इंडोनेशिया देशाचाही क्रमांक लागतो. तर, भारतातील गुजरात राज्य हा कार्यक्रम ऐकण्यात क्रमांक एकवर आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या टॉप टेनमध्ये येत नाही. नमो अॅपवर अपलोड करण्यात आलेल्या फोटोंवरून ही आकडेवारी काढण्यात आली आहे. जागरण या वृत्तस्थळने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
  • ‘मन की बात’ ऐकण्यात भारतानंतर दुसरा क्रमांक अमेरिकेचा लागतो. तर, त्यानंतर इंडोनेशियाचा लागतो. म्हणजेच, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या कार्यक्रमाचे श्रोतावर्ग आहे. परंतु, भाजपाची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात ‘मन की बात’ ऐकण्यात नागरिकांची संख्या कमी आहे.
  • ‘मन की बात’ कार्यक्रमाचा राज्यनिहाय विचार केल्यास गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. तर बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, झारखंड असे अनुक्रमे क्रमांक लागतात. तर, लोकसभा मतदारसंघनिहाय पूर्वी चंपारण, सूरत, राजकोट, अररिया, सीतामढी असे पहिल्या टॉप फाईव्हमध्ये क्षेत्र येतात.

मन की बात ऐकणारे टॉप टेन राज्य

  • गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, झारखंड, तमिलनाडू, प.बंगाल, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान असे अनुक्रमे टॉप टेन राज्यांची नावे आहेत. यातील अनेक राज्यांत भाजपाची सत्ता नसतानाही तिथे हा कार्यक्रम ऐकला जातो. परंतु, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असतानाही हा कार्यक्रम ऐकण्यात महाराष्ट्र राज्य टॉप टेनमध्ये गणला गेलेला नाही.

लोकसभा मतदारसंघानुसार टॉप टेन यादी

  • पूर्वी चंपारण, सूरत, राजकोट, अररिया, सीतामढी, वडोदरा, गांधी नगर, नवसारी, बनासकांठा, रांची हे लोकसभा मतदारसंघ टॉप टेनच्या यादीत येतात. यामध्ये महाराष्ट्रातील एकही लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश नाही.
पदके, पुरस्कार परत करण्याची तयारी! दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलक कुस्तीगिरांचा इशारा
  • आम्ही जिंकलेली सर्व पदके आणि पुरस्कार सरकारला परत देण्यास तयार आहोत. आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर या पदकांचा आणि पुरस्कारांचा काय उपयोग, असा सवाल आंदोलक कुस्तीगीर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी उपस्थित केला.
  • नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे निदर्शने करणारे कुस्तीगीर आणि दिल्ली पोलिसांमध्ये बुधवारी रात्री झालेल्या झटापटीनंतर आता आंदोलक आक्रमक झाले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूसह एकूण सात महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत देशातील आघाडीचे कुस्तीगीर
  • २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. दिल्ली येथे रात्रीच्या वेळी पाऊस होत असल्याने आंदोलक कुस्तीगिरांना अतिरिक्त गाद्या आणि लाकडी खाटा आंदोलनाच्या ठिकाणी आणण्याच्या होत्या. आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी ‘फोिल्डग’ खाटा तिथे आणल्या होत्या. सहायक पोलीस आयुक्तांनी त्यांना या खाटा आंदोलनाच्या ठिकाणी नेण्यास परवानगी दिली नाही. मात्र, कुस्तीगिरांनी लाकडी खाटा आत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि आंदोलक कुस्तीगिरांमध्ये झटापट झाली. यात बजरंग पुनियाच्या खांद्याला, तर विनेश फोगटच्या गुडघ्याला मार लागला. तसेच दुष्यंत फोगटच्या डोक्याला दुखापत झाली.
  • ‘‘कुस्तीगिरांना अशी वागणूक मिळत असेल, तर त्या पदकांचा काय उपयोग? त्यापेक्षा आम्ही पदके आणि पुरस्कार भारत सरकारला परत करून सामान्य जीवन जगतो. पद्मश्री पुरस्कारप्राप्त कुस्तीगिरांना पोलीस धक्का देत होते, शिवीगाळ करत होते. माझ्यासह साक्षीही (मलिक) तिथे होती. पोलीस आमच्याशी गैरवर्तन करत होते,’’ असे बजरंग म्हणाला.
  • विनेश, साक्षी आणि बजरंग हे तिघेही खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत. साक्षी (२०१७) आणि बजरंग (२०१९) यांना पद्मश्री, तसेच बजरंग (२०१५) आणि विनेश (२०१६) यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.
नोकरीला पर्याय ठरतेय का ‘गिग’ मॉडेल? या कर्मचाऱ्यांना कायद्याचे संरक्षण किती?
  • गेल्या काही वर्षांत ओला, उबर, झोमॅटो, स्विगी आदी कितीतरी व्यवसाय पद्धती रूढ झाल्या आणि बहुतांश प्रमाणात यशस्वी ठरल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे बंधन नाही. मात्र कर्मचाऱ्याने अधिकाधिक मेहनत करून ठरावीक रक्कम कमवायची, अशी पद्धत रूढ झाली आहे. अलीकडेच ‘ब्लिंकिट’चे गिग कर्मचारी आठवड्याभराच्या संपावर गेल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांना संपाचा अधिकार आहे का? त्यांना कायदेशीर संरक्षण आहे का? याचा हा आढावा…
  • दिल्लीतील ‘गिग’ कर्मचारी संपावर का गेले?
  • झोमॅटोचा एका भाग असलेल्या ‘ब्लिंकिट’ने आपल्या गिग कर्मचाऱ्यांना डिलिव्हरीमागे २५ रुपयांऐवजी १५ रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दररोज १२०० रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमाई ६०० ते ७०० रुपयांवर आली. परिणामी दिल्लीतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. सुमारे दोन आठवडे संप सुरू होता. गेल्या वर्षी ‘ब्लिंकिट’कडून प्रत्येक डिलिव्हरीमागे ५० रुपये दिले जात होते. ते २५ रुपये करण्यात आले. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी ते सहन केले. मात्र आता ही रक्कम आणखी कमी केल्यामुळे कर्मचारी संतापले आहेत. संपामुळे कंपनीने गुडगाव व नॉएडा येथील स्टोअर्स बंद केली. त्यामुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी हरयाणाच्या कामगार आयुक्तांकडे तक्रार केली असून कामगार मंत्रालयाने कंपनीला नोटीसही बजावली. परंतु त्यानंतर प्रत्यक्षात काहीही झाले नाही.

‘गिग’ कर्मचारी म्हणजे काय?

  • मालक आणि नोकरदार यापेक्षा ही पद्धत वेगळी आहे. कर्मचाऱ्याने दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे आणि त्याचा मोबदला घेणे, अशी ही पद्धत आहे. थोडक्यात कर्मचाऱ्याच्या मासिक पगाराची जबाबदारी मालकांना घ्यावी लागत नाही. हे वेगळेच बिझनेस मॉडेल आहे. यामध्ये कामाप्रति प्रामाणिक राहावे लागते. तरच काम मिळते. यात प्लॅटफॉर्म आणि नॉन प्लॅटफॉर्म कर्मचारी असे दोन गट मानले जातात. ॲपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘प्लॅटफॉर्म कर्मचारी’ संबोधले जाते तर इतर कामे करणाऱ्यांना ‘नॉन प्लॅटफॉर्म’ कर्मचारी म्हणतात. नीति आयोगाच्या एका अहवालानुसार २०२९ पर्यंत गिग कर्मचाऱ्यांची संख्या साडेतेवीस कोटींच्या घरात पोहोचेल.

‘गिग’ पद्धती फायदेशीर आहे का?

  • स्वतंत्रपणे आणि कोणत्याही वेळेत काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी गिग हे मॉडेल खूप फायदेशीर आहे. कामे मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. गिगसाठी सध्या अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. या उपलब्ध संकेतस्थळांवर स्वतःची माहिती पुरवून कामे मिळवली जाऊ शकतात. भविष्यात गिग अर्थव्यवस्था बराच धुमाकूळ घालणार आहे, असे जाणकारांना वाटते. शिवाय प्रत्येकाला कामातील कौशल्य आणि सक्षम राहणे नितांत गरजेचे असणार आहे. रोजगार वा नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यावाचून पर्याय उरणार नाही. भारतात हे स्वयंरोजगार पद्धतीचे व्यवसाय मॉडेल अल्पावधीतच वेग पकडत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी भारत दौऱ्यावर; ‘एससीओ’ सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी
  • पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी गुरुवारी भारतात दाखल झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. गोव्यातील बेनौलिम येथे ही परिषद होत आहे. पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही प्रथमच वेळ आहे.
  • दहशतवादाच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना भुत्तो भारत दौऱ्यावर आले आहेत. मात्र त्यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी स्वतंत्र चर्चा होणार आहे की नाही याबद्दल सध्या काहीही नियोजन नाही. कारण दोन्ही बाजूंनी तशी कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. ‘एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी गोव्यात येऊन मला फार आनंद झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया भुत्तो यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ‘पाकिस्तान एससीओच्या ध्येयाशी कटिबद्ध असल्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला,’ असे  पाकिस्तानातून निघण्यापूर्वी भुत्तो म्हणाले होते.
  • बिलावल भुत्तो झरदारी यांच्या रूपाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात आले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खर भारतात आल्या होत्या. सध्या त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक काही तास भेट दिली होती.

05 मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.