चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ मे २०२१

Date : 5 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह :
  • देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४वा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आल्याने आता ऑक्टोबरमध्ये भारतातच होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतात त्यादरम्यानच्या काळात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते.

  • ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत १६ संघांमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. परंतु भारतातील सद्य:स्थिती आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता अन्य संघ विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दर्शवण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेसुद्धा (बीसीसीआय) तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) जून महिन्यात होणाऱ्या बैठकीदरम्यान विश्वचषकाच्या यजमानपदाविषयीचा अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे.

  • ‘‘आयपीएलचा हंगाम अर्धवटच स्थगित करावा लागल्याने भारतात विश्वचषकाचे आयोजन करणे धोक्याचे ठरू शकते, असे चित्र आहे. त्याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ‘बीसीसीआय’ स्वीकारणार असली, तरी ही स्पर्धा अमिराती येथे खेळवण्याचा पर्याय सध्या उत्तम ठरेल,’’ असे मत ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यांसारखे बलाढय़ देश भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्याच्या विरोधात आहेत, अशी माहितीही ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

मराठा आरक्षणप्रश्नी आज निकाल :
  • मराठा आरक्षणप्रश्नी आज, बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे.  या निकालाकडे राज्याबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नाझीऱ, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली.

  • सामाजिक व आर्थिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार राज्य विधिमंडळांना आहे का, या मुद्याबरोबच न्यायालय सहा महत्त्वाच्या मुद्यांचा विचार करून निकाल जाहीर करणार आहे. त्यात आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादाभंगाच्या मुद्याचाही समावेश असेल. अनेक राज्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आधीच भेदलेली आहे. परिणामत: मराठा आरक्षण निकालाचा देशव्यापी आरक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे न्यायालयाचा निकाल दूरगामी परिणाम करणारा असेल, असे मानले जाते.

  • “मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल लागेल याबाबत आपण पूर्ण आशावादी आहोत. सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुनही याबाबतच्या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात चांगल्या आणि निष्णात वकिलांनी युक्तीवाद केला आहे. मराठा आरक्षण हे कसं योग्य आहे, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणं हे कसं बरोबर आहे, या सर्व मुद्द्यांमध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाही, असं सांगत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सकारात्मक निकालाबद्दल आशावाद व्यक्त केला आहे.

भारत-ब्रिटन यांच्यात गुंतवणूक करार :
  • ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर बैठकीपूर्वी १ अब्ज ब्रिटिश पौंड  गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये ६५०० रोजगार निर्माण होणार आहेत. मंगळवारी दोन्ही नेत्यांमध्ये शिखर बैठक होत आहे.

  • डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने सोमवारी सायंकाळी विस्तृत व्यापार भागीदारी करारातून अपेक्षित गुंतवणुकीचे निष्कर्ष जाहीर केले असून या करारांना दोन्ही नेते आभासी मान्यता देणार आहेत.

  • व्यापार करारातून ब्रिटन व भारत यांच्यातील गुंतवणूक २०३० पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या दरम्यान प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी मुक्त व्यापार कराराचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता आहे. भारत व ब्रिटन यांच्यादरम्यान आर्थिक संबंध अधिक मजबूत व सुरक्षित असतील अशी ग्वाही पंतप्रधान जॉन्सन यांनी दिली आहे.

  • ब्रिटन व भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना करोनामुळे फटका बसला असून भारताच्या गुंतवणुकीनंतर ब्रिटनमध्ये ६५०० रोजगार निर्माण होणार आहेत. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया तेथे एका आस्थापनेची निर्मिती करणार असून त्याद्वारे ही रोजगारनिर्मिती होईल.  मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार क्षमता दुप्पट होणार आहे. व्यापार व गुंतवणूक योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केली असून भारत ब्रिटनमध्ये ५३.३० कोटी  पौंडाची गुंतवणूक करणार असून सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया त्यातील २४ कोटी पौंडाची गुंतवणूक करणार आहे.

भारत लवकरच 5G होणार; Jio, VI, Airtel करणार चाचण्या, चायनिज कंपन्यांना मात्र बंदी :
  • भारत आता लवकरच 5G नेटवर्क सुविधेचा लाभ घेणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या संप्रेषण मंत्रालयाने आता भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. या चाचण्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल तसंच व्हिआय(VI) या कंपन्या सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. ह्या चाचण्या कधीपर्यंत चालतील याबद्दल मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. या चाचण्यांसाठी कोणत्याही चायनिज कंपन्यांना परवानगी नसल्याचं अधिकाऱ्यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.

  • गेल्या काही महिन्यांपासून भारतातल्या 5G सेवेसंदर्भात हालचाली सुरु होत्या. मात्र, 5G चाचण्या घेण्यासंदर्भातल्या परवानगीची प्रतिक्षा कंपन्यांना लागून राहिली होती. रिलायन्स जिओने यापूर्वीच आपण स्वदेशी 5G नेटवर्क उभारणार असल्याबद्दल पुष्टी केली होती. स्वतःची 5G उपकरणं बनवण्यावरही काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  • संपूर्णपणे भारतात विकसित झालेलं जिओचं 5G नेटवर्क हा मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणांचा एक भाग आहे.

  • भारतातलं 5G नेटवर्क हे १८००, २१००, २३००, ८००, ९०० मेगाहर्ट्झ वारंवारितेच्या पट्ट्यांवर काम करणार आहे. मात्र हे वारंवारितेचे पट्टे सर्विस प्रोव्हाइडरनुसार बदलू शकतात.

आयपीएल सप्टेंबरमध्ये :
  • जैव-सुरक्षित वातावरणाचे चक्रव्यूह भेदून करोनाने प्रवेश केल्याने आता क्रिकेटपटूंनाही या संसर्गाची बाधा होऊ लागली आहे. मंगळवारी आणखी दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा मध्यातच अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली आहे.

  • सनरायजर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमन साहा तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा या दोन खेळाडूंचे करोना अहवाल मंगळवारी सकारात्मक आल्यानंतर ‘आयपीएल’च्या स्थगितीचा निर्णय ‘बीसीसीआय’ला घ्यावा लागला.

  • ‘‘अनिश्चित कालावधीसाठी आम्ही स्पर्धा स्थगित करत आहोत. या महिन्यात ही स्पर्धा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून स्थान मिळवत ही स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. कदाचित सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा घेणे शक्य होईल. पण तूर्तास तरी आम्ही थांबत आहोत,’’ असे ‘आयपीएल’चे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले.

  • ‘‘सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. उर्वरित स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता या वर्षांत ही स्पर्धा घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी कधी मिळेल, याची चाचपणी करत आहोत. कदाचित सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा विचार असला तरी सद्य:स्थितीत या सर्व शक्यता आहेत,’’ असे ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

०५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.