चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ मे २०२०

Date : 5 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनच्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव ? अमेरिकेच्या आरोपावर WHO म्हणत : 
  • “चीनच्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव झाल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र त्या दाव्याला पाठबळ देणारा अद्याप एकही पुरावा अमेरिकेने उपलब्ध करुन दिलेला नाही”, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

  • एका दिवसापूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोना व्हायरसचा फैलाव झाला असल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं होतं. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनाच्या फैलावासाठी वारंवार चीनला दोषी ठरवत असून जाहीरपणे आरोप करत आहेत.

  • त्यावर प्रतिक्रिया देताना “वुहानच्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव झाल्याबाबत वॉशिंग्टनकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा डेटा किंवा विशिष्ट पुरावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आमच्यासाठी तो आरोप केवळ काल्पनिक ठरतो”, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.

‘या’ राज्यात पहिल्याच दिवशी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री : 
  • लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीला परवानगी मिळताच वेगवेगळयां राज्यांमध्ये दारूच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दारू खरेदीसाठी दुकानांबाहेर झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. दारुच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी आवरण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठी चार्जही करावा लागला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • मुंबईत दारुची दुकाने उघडायला परवानगी द्यायची की, नाही या गोंधळातच काही तास वाया गेले. अखेर उशिराने आदेश आला. बहुतांश मालकांनी मंगळवारी सकाळी दुकान उघडायचे ठरवले आहे. सोलापूर शहर आणि औरंगाबादमध्ये जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही.

  • बंगळुरुमध्येही दुकानांबाहेर लागलेल्या रागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. अनेकांनी स्वत:हासाठी दुसऱ्यांना रांगेत उभे केले होते. दारूची दुकाने सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक राज्यांना बऱ्यापैकी महसूल मिळाला आहे.

औषध पुढील आठवडय़ात उपलब्ध : 
  • विषाणूरोधक रेमडेसीवीर हे औषध करोना विषाणूवर उपयुक्त असल्याने त्याच्या वापरास अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली असून हे औषध पुढील आठवडय़ात रुग्णांसाठी उपलब्ध केले जाईल असे सांगण्यात आले.

  • या औषधाची निर्मिती करणाऱ्या गिलीड सायन्सेस या औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन ओडी यांनी म्हटले आहे, पुढील आठवडय़ात औषध रुग्णांना उपलब्ध करून दिले जाईल. अमेरिकेतील कुठली शहरे जोखमीची आहेत हे सरकार ठरवेल व नंतर गरजेनुसार हे औषध उपलब्ध केले जाईल.

  • अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून ११ लाख लोकांना संसर्ग झाला आहे तर ६७ हजार लोकांचा बळी गेला आहे. भारतीय अमेरिकी डॉ. अरुणा सुब्रमण्यम व इतर काहींनी रेमडेसीवीर हे औषध काही रुग्णांमध्ये उपयुक्त ठरल्याचे संशोधनाअंती म्हटले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने या औषधाला मान्यता दिली असून आता ते अमेरिकेत वितरित करण्यात येणार आहे. हे औषध शिरेतून दिले जाते. गंभीर अवस्थेतील करोना रुग्णांत त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

विषाणूचे गांभीर्य चीनने लपवल्याचा आरोप : 
  • करोना विषाणूच्या साथीचे गांभीर्य, त्याची संसर्गजन्यता याची माहिती लपवण्याचा प्रयत्न चीनने केला व दरम्यानच्या काळात त्यांच्या देशात वैद्यकीय साधनांचा साठा करून ठेवला, असा आरोप अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या गुप्तचरांनी सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

  • चिनी नेत्यांनी हेतुत: करोना संसर्गाचे गांभीर्य लपवून ठेवले. जानेवारीच्या सुरुवातीलाच चीनमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता व त्याची माहिती चीनने बाहेर येऊ  दिली नाही असे अहवालात म्हटले आहे.

  • ट्रम्प प्रशासनाने करोना साथीला चीनच कारणीभूत असल्याचा आरोप वारंवार केला असून त्याला या अहवालाने पुष्टी मिळाली आहे. दरम्यान करोनाची साथ चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबाबत ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांनी टीका केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी चीनमुळेच करोनाचा प्रसार झाला असा आरोप अनेकदा केला आहे.

दारुवर ७०% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’, दिल्ली सरकारचा निर्णय : 
  • लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकानं बंद करावी लागली. दिल्लीमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर ‘स्पेशल करोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

  • दिल्ली सरकारने दारू विक्रीवर 70 टक्के करोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पेशल करोना फी’अंतर्गत हा कर मंगळवारपासून आकारला जाईल. यानुसार ‘एमआरपी’वर 70% स्पेशल करोना टॅक्स आकारला जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल.

  • दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी यापूर्वी दिला आहे. याशिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकानं सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

०५ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.