चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 मार्च 2023

Date : 5 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

भारताची कौतुकास्पद प्रगती : बिल गेट्स

  • विकास, आरोग्य व पर्यावरणासारख्या क्षेत्रांत भारताच्या प्रगतीची प्रशंसा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी शनिवारी केली. ‘विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण गुंतवणूक केली जाते, तेव्हा काय काय होऊ शकते,’ याचे हे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’चे सह अध्यक्ष बिल गेट्स यांनी सुरक्षित, प्रभावी व किफायतशीर लसनिर्मिती करण्याच्या भारताच्या अभूतपूर्व क्षमतेची प्रशंसा केली. यातील बहुसंख्य लसमात्रा विकसित करण्यासाठी ‘गेट्स फाउंडेशन’ने सहाय्य केले आहे. गेट्स म्हणाले, की या लसमात्रांमुळे करोना महासाथीत लाखो नागरिकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. तसेच जगभरात इतर आजारांचाही प्रादुर्भाव रोखण्यास भारताने विकसित केलेल्या लशींमुळे मोठी मदत झाली आहे.
  • गेट्स यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली. मोदींनी शनिवारी केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की बिल गेट्स यांना भेटून व त्यांच्याशी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करून आनंद वाटला. आपल्या वसुंधरेला अधिक सुंदर आणि त्याच्या शाश्वत अस्तित्वासाठी गेट्स यांची बांधिलकी, झपाटलेपण आणि त्यांची विनम्रता भावते.
  • ‘डिजिटल’ तंत्रज्ञानाचा सरकारकडून प्रभावी वापर!’ - गेट्स यांनी नमूद केले, की महासाथीच्या काळात भारताने २० कोटी महिलांसह ३० कोटी नागरिकांना आपत्कालीन ‘डिजिटल पेमेंट’ केले. हे केवळ शक्य झाले कारण भारताने ‘आधार’सारख्या ‘डिजिटल आयडी प्रणाली’मध्ये गुंतवणूक करून ‘डिजिटल बँकिंग’साठी नाविन्यपूर्ण व्यासपीठ तयार केले. त्याद्वारे आर्थिक व्यवहारातील सहभागास प्राधान्य दिले. त्यामुळे उत्तम आर्थिक गुंतवणूक होण्यास मदत झाली.

आता तुम्ही बोलताच रेल्वे तिकीट होणार बुक, कसे ते जाणून घ्या?

  • भारतीय रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी सातत्याने सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आता आयआरसीटीसी (IRCTC) प्रवाशांसाठी अशी एक सुविधा आणत आहे ज्यात तुम्ही बोलताच तुमचं रेल्वे तिकीट बुक होणार आहे. यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक करताना माहिती भरण्याची गरज भासणार नाही. आता तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करताना टाईप करून माहिती भरावी लागते. मात्र भविष्यात तुम्ही फक्त बोलून सर्व माहिती भरू शकता. यासाठी आयआरसीटीसी नवी सुविधा घेऊन येत आहे. आस्क दिशा २.० या नावाने प्रवाशांना ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • तिकीट बुक करणे होईल सोपे - आयआरसीटीसी सध्या AI वर आधारित आस्क दिशा २.० या नव्या प्लॅटफॉर्मची यशस्वी चाचणी झाली आहे. यामुळे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या चॅटबॉटमध्ये व्हॉइस कमांड वापरून संपूर्ण ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. यात प्रवासी बोलून सहज आपलं रेल्वे तिकीट बुक करू शकतात. IRCTC च्या या नवीन अपडेटमुळे तिकीट बुक करणे आता सोपे होणार आहे.
  • आयआरसीटीसीचे म्हणणे आहे की, व्हॉईस कमांडद्वारे तिकीट बुकिंगची चाचणी सुरू यशस्वी झाली आहे. आता प्रवाशांना लवकरच ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एवढेच नाही तर प्रवाशांना तिकिट रद्द करण्यासह प्रिंट आणि शेअरही ऑप्शन देण्यात येईल. यात प्रवासी ट्रेनशी संबंधित कोणतीही माहिती व्हॉईस कमांडद्वारेच मिळू शकतात.
  • आरआयसीटीसीने प्रवाशांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आस्क दिशा नावाचं फिचर तयार केलं आहे. या फीचरद्वारे प्रवासी प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये विचारू शकतात. याच फिचरमध्ये काही बदल करत व्हॉईस कमांड ऑप्शन अॅड केल जात आहे.

देशभर नव्या फ्लूची साथ; ‘आयसीएमआर’, ‘आयएमए’च्या मार्गदर्शक सूचना

  • देशभर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फ्लूसदृश लक्षणे असलेल्या आजाराची साथ पसरली असून हा फ्लूचाच एक प्रकार असल्याचे आणि ‘फ्लू ए’चा उपप्रकार ‘एच३एन२’ या विषाणूमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
  • फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा ‘एच३एन२’मुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलटय़ा, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे आहेत. त्यावर उपचार करताना सरसकट प्रतिजैवकांचा वापर करू नये आणि डॉक्टरांनी सध्या फक्त लक्षणांवर औषधे द्यावीत असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिला आहे. हा हंगामी ताप पाच ते सात दिवस येतो, असेही ‘आयएमए’ने स्पष्ट केले. हा ताप तीन दिवसांनी जातो, तर खोकला मात्र तीन आठवडय़ांपर्यंत राहू शकतो, असे ‘आयएमए’च्या समितीने सांगितले. 
  • या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. १५ पेक्षा कमी आणि ५०हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होतो आणि ताप येतो, असा निष्कर्ष १५ डिसेंबरपासून करण्यात आलेल्या पाहणीवरून काढण्यात आला आहे. हा आजार जीवघेणा नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले असले तरी काही रुग्णांच्या बाबतीत श्वसनयंत्रणेला संसर्ग होत असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागूू शकते.

अयोध्येतील मशिदीच्या आराखडय़ास अंतिम मंजुरी; रुग्णालय, स्वयंपाकघर, ग्रंथालयाची योजना 

  • बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अयोध्या विकास प्राधिकरणाने येथे धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाच्या आराखडय़ाला अंतिम मंजुरी दिली. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या पाच एकर जागेवर ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्ट’द्वारे (आयआयसीएफ) एक मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, समूदाय स्वयंपाकघर आणि ग्रंथालय बांधले जाणार आहे.
  • अयोध्या विकास प्राधिकरणाद्वारे मंजुरीस विलंब, जमीन वापरातील बदलाच्या प्रकरणांमुळे हे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होते. अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले, की शुक्रवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत आम्ही अयोध्या मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मंजूर नकाशे ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’कडे काही विभागीय औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुपूर्द केले जातील. ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल.
  • धनीपूर मशिदीचे ठिकाण अयोद्धेतील राम मंदिराच्या ठिकाणापासून सुमारे २२ किलोमीटरवर आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले व सरकारला जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यास आदेश दिले होते.
  • ‘आयआयसीएफ’चे सचिव अतहर हुसेन यांनी सांगितले, की सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर ‘ट्रस्ट’ एक बैठक घेईल व मशिदीच्या बांधकामाच्या योजनेस अंतिम स्वरूप देईल. २१ एप्रिल रोजी संपणाऱ्या ‘रमजान’नंतर ट्रस्टची बैठक होणार आहे. त्यात मशिदीचे बांधकाम सुरू करण्याची तारीख निश्चित केली जाईल. आम्ही २६ जानेवारी २०२१ रोजी मशिदीची पायाभरणी केली. आम्ही तो दिवस निवडला, कारण या दिवशी सात दशकांपूर्वी भारताची राज्यघटना देशात लागू झाली होती. धन्नीपूर मशीद बाबरी मशिदीपेक्षा मोठी असेल. अयोध्येत पूर्वीच्या संरचनेनुसार ती तयार केली जाणार नाही.
  • मशिदीच्या बांधकामासाठी स्थापण्यात आलेल्या ‘आयआयसीएफ’ ट्रस्टने मशिदीसह एक रुग्णालय, एक सामुदायिक स्वयंपाकघर, एक ग्रंथालय आणि संशोधन संस्था बांधण्याची घोषणा केली. हुसेन यांनी सांगितले, की नियोजित रुग्णालय १४०० वर्षांपूर्वी पैगंबरांच्या शिकवणीनुसार इस्लामच्या खऱ्या मानवतवादी श्रद्धेतून सेवा करेल.

दहशतवादविरोधी गट स्थापण्याची ‘क्वाड’ची घोषणा

मुक्त आणि खुल्या हिंदू-प्रशांत प्रदेशासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिली. या भागामध्ये कायद्याचे राज्य, स्वायत्तता, प्रादेशिक अखंडता आणि विवादांवर शांततापूर्ण समझोता या बाबींना जोरदार समर्थन देत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. क्वाड गटाची ही भूमिका म्हणजे नाव न घेता चीनला इशारा दिल्याचे मानले जात आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्रमंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांची शुक्रवारी बैठक झाली. त्या वेळी या दहशतवादविरोधी गटाची घोषणा करण्यात आली. हा गट दहशतवादाचे नवे स्वरूप, धार्मिक मूलगामित्वामध्ये वाढ आणि हिंसक अतिरेकी गट यांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेईल.

या बैठकीनंतर चारही परराष्ट्रमंत्र्यांनी रायसीना चर्चेतील एका सत्राला हजेरी लावली, या वेळी त्यांनी क्वाड सदस्य देशांच्या सामायिक हितसंबंधांबद्दल चर्चा केली. या बैठकीनंतर चारही परराष्ट्रमंत्र्यांनी रायसीना चर्चेला हजेरी लावली, या वेळी त्यांनी क्वाड सदस्य देशांच्या सामायिक हितसंबंधांबद्दल चर्चा केली.

तसेच त्यांनी एकमताने सर्व स्वरूपांतील दहशतवादाचा निषेध केला आणि दहशतवादी गटांचा वापर करण्यास, तसेच दहशतवादी कारवायांसाठी त्यांना आर्थिक किंवा लष्करी पाठबळ देण्यास विरोध केला. या वेळी २६/११ चा मुंबई हल्ला आणि पठाणकोट हल्ल्यांसह सर्व दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. आरोग्य सुरक्षितता, हवामानातील बदल, हरित ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दलही परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली.

 

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 05 मार्च 2023

 

विश्लेषण - महिला विश्वचषकाची रणधुमाळी सुरू : कोण आहेत संभाव्य विजेते :
  • यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याद्वारे शुक्रवारपासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला. झळाळत्या कारकीर्दीचा शेवट विश्वचषक विजयाने करण्यासाठी भारताची कर्णधार मिताली राज उत्सुक आहे. मात्र असंख्य आव्हानांना सामोरे गतउपविजेता भारतीय संघ पहिले विश्वविजेतेपद जिंकणार का? विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची बलस्थाने, कच्चे दुवे तसेच विश्वचषकातील अन्य बाबींचा घेतलेला हा सखोल आढावा.

  • नियोजित वेळापत्रकाप्रमाणे गतवर्षी विश्वचषक होणे अपेक्षित होते. परंतु करोनामुळे विश्वचषक वर्षभराने लांबणीवर पडला. २०१९मध्ये इंग्लंडला झालेल्या पुरुषांच्या विश्वचषकाप्रमाणे यंदा महिलांचाही विश्वचषक राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येत आहे. १९७३पासून सुरू झालेल्या विश्वचषकाचे यंदा १२वे पर्व आहे.

  • आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सात सामने खेळणार आहे. विजयासाठी २, बरोबरीत अथवा रद्द करण्यात आलेल्या लढतीसाठी १ गुण संघांना बहाल करण्यात येईल. साखळी सामने बरोबरीत सुटले तर सुपर-ओव्हर खेळवण्यात येणार नाही.

  • उपांत्य फेरीपासून मात्र सुपर-ओव्हरचा पर्याय उपलब्ध असेल. साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ३० आणि ३१ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगतील. ख्राइस्टचर्च येथे ३ एप्रिलला महाअंतिम फेरी होईल.

“एसटी कर्मचारी कामावर परतले नाहीत तर आम्हाला…”; विलीनीकरणाच्या अहवालावर अनिल परबांची प्रतिक्रिया :
  • राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी शक्य नाही अशी शिफारस तीन सदस्यीय समिती केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर हा अहवाल मांडला आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण शक्य नाही, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर मंत्री अनिल परब यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे.

  • “उच्च न्यायालयाने विलीनीकरणाच्या संदर्भांत त्रिसदस्यीय समिती नेमली होती आणि निर्णय घेण्यास सांगितले होते. समितीने विलीनीकरणासंदर्भात जो निर्णय घेतला तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीने उच्च न्यायालयात सादर केला. न्यायालयाच्या सूचनेनंतर तो अहवाल मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला होता.

  • अधिवेशन सुरु असल्याने तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. या अहवालामध्ये कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी समितीने फेटाळली आहे. समितीने व्यवस्थित अभ्यास आपले मत न्यायालयाला कळवले. यामध्ये विलीनीकरण होणार नाही हे स्पष्ट केले आहे,” असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले.

आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु, एसटी आंदोलनाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका :
  • करोना प्रादुर्भावानंतर राज्यात पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. राज्यभरात 14 लाखापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले असून आजपासून परीक्षेला सुरुवात झालीय. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

  • राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत आहेत. तसेच करोना प्रादुर्भावाचे संकट असूनदेखील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांतून गर्दीमध्ये प्रवास करावा लागतोय.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झालीय. करोना प्रादुर्भावामुळे ज्या ठिकाणी शाळा त्याच ठिकाणी परीक्षा असे सूत्र शिक्षण मंडळाने ठरवले आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा यामागील उद्देश आहे.

  • मात्र, राज्यातील काही ग्रामीण भागात प्रवासाची सुविधा नसल्यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजावे लागले. एकीकडे करोना संसर्गाचा धोका असल्यामुळे करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आव्हान विद्यार्थांसमोर आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप असल्यामुळे परीक्षा केंद्रावर कसे पोहोचावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकलाय.

“आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी :
  • रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचे युद्ध सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

  • तसेच युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे. मारिओपोल, चेर्निव्ह आणि खारकीव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे आपण युक्रेनशी चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलंय.

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोट केल्याचे आरोप फेटाळत  आपल्या मागण्या मान्य झाल्यास युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलंय. रशियाचे अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनने म्हटले आहे की युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोटांचे वृत्त खोटे आणि बनावट आहेत.

  • युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर प्रमुख शहरांमध्ये रशियाने हवाई हल्ला केल्याच्या बातम्या खोट्या असून आमचा अपप्रचार करण्यात येतोय, असं ते म्हणाले. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनसोबत चर्चा शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, या युद्धासंदर्भात युक्रेन आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची अट ठेवली आहे. 

रशियाने आतापर्यंत ५००हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, युक्रेनचा दावा :
  • रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला.

  • आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र असून तेथील आग आटोक्यात आणण्यात आली. आगीनंतर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग पसरलेला नाही, असा निर्वाळा संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक प्रकल्पविषयक निरीक्षकांनी दिला.

  • दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे. येथील मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव्ह येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा सातत्याने सुरु आहे. खेर्सन शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे. तर दुसरीकडे अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर असणाऱ्या मारियुपोल शहरामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे.

  • काळ्या समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा दिलाय. आठवड्याभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलीय.

माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज यांचे निधन :
  • देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी १९९० ते १९९३ दरम्यान लष्कराचे नेतृत्व केले होते. २००४ ते २०१० दरम्यान ते पंजाबचे राज्यपालही होते.

  • भारतीय सैन्यदलातर्फे ट्विटरवर ही माहिती देण्यात आली आहे.  त्यांच्या निधनाबद्दल लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्यासह भारतीय सैन्यदलाने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

  • जनरल रॉड्रिग्ज हे विचारवंत आणि रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी देशाची संपूर्ण समर्पणभावनेने सेवा केली, असे शोकसंदेशात म्हटले आहे. त्यांनी लष्करात ४० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर त्यांची दोन वेळा नियुक्ती झाली होती.

मेघालय राज्यातही सीबीआयला ‘नो एन्ट्री’, सरकारने घेतला हा मोठा निर्णय :
  • मेघालय सरकारने सीबीआयच्या तपास करण्याच्या अधिकाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सीबीआयला मेघालय राज्यात कोणतीही चैकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • सीबीआयच्या अधिकारांना कात्री लावणारे मेघालय हे नववे राज्य आहे. याआधी पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, केरळ तसेच महाराष्ट्र सरकारने असाच निर्णय घेतलेला आहे. मेघालयमध्ये भाजपा प्रणित नॅशनल पीपल्स पार्टीची सत्ता आहे. असे असतानादेखील येथील सरकारने हा निर्णय घेतलाय.

  • सीबीआय ही केंद्रीय तपास संस्था असल्यामुळे या संस्थेला कोणत्याही राज्यात जाऊन थेटपणे चौकशी करण्याचे अधिकार आहेत. मात्र भाजपाची सत्ता नसलेल्या एकूण आठ राज्यांनी या अधिकारांवर मर्यादा आणणारा कायदा केला. या कायद्यांतर्गत कोणतीही चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले.

  • मेघालय सरकारनेदेखील असाच निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी मेघालयचे मुख्यमंत्री कोनरॅड संगमा यांचे भाऊ जेम्स पी. के. संगमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांना वीजपुरवठा करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सौभाग्य योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप जेम्स यांच्यावर आहे. याच प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मेघालय सरकारने सीबीआयच्या तपास करण्याच्या अधिकारावर मर्यादा आणण्याचा हा निर्णय घेतलाय.

०५ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.