चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०५ डिसेंबर २०२०

Date : 5 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टीआरएस पहिल्या, भाजप दुसऱ्या क्रमांकावर :
  • हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत शुक्रवारी रात्रीपर्यंत १५० पैकी १४६ विभागांमधील निकाल जाहीर झाले. सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) ५६ जागा पटकावून आघाडीवर आहे. भाजप ४६ जागा पटकावून दुसऱ्या क्रमांकावर असून एआयएमआयएम ४२ जागा पटकावून तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने केवळ दोन जागांवर विजय मिळविला आहे.

  • भाजपने ४६ जागा पटकावून या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएस या प्रादेशिक पक्षाला  भाजपने आपला पर्याय निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. हा भाजपचा ‘सॅफ्रॉन स्ट्राइक’ असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

  • या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचे टीआरएसने मान्य केले आहे, मात्र पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव म्हणाले की, निकालामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही. टीआरएसला सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

भारतीय वंशाची संशोधक ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी :
  • न्यूयॉर्क :भारतीय -अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीस ‘टाइम’चा पहिलाच ‘किड ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.

  • टाइम नियतकालिकाने म्हटले आहे की,  हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

  • टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.

  • निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजलीने आभासी मुलाखतीत सांगितले. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली असून गप्पांमधूनही तिच्या बुद्धीची चमक प्रत्ययास आली.

  • ‘ प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा,’ असा  संदेश तिने तरुणांना दिला.

देशात लस काही आठवडय़ांत :
  • नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशीसाठी फार काळ थांबावे लागणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असल्याने पुढील काही आठवडय़ांत लस उपलब्ध होऊ शकेल. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दिल्यानंतर लगेच लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली.

  • लसीकरणाचे प्राधान्यक्रमही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक आदी करोनायोद्धे, तर पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा, सफाई कामगार हे आघाडीचे योद्धे, गंभीर व्याधिग्रस्त व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. या प्राधान्यक्रमाची यादी राज्यांकडून मागवली जात आहे. राज्यांच्या सूचनेनुसार लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.

  • शारीरिक अंतर नियम, मुखपट्टीचा वापर हे करोना प्रतिबंधक नियम कोणत्याही परिस्थितीत पाळले गेले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

UN चा ऐतिहासिक निर्णय, गांजा ड्रग्स नव्हे तर औषध ! भारतासह २७ देशांनी केलं समर्थन :
  • संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला (भांग) धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने (CND) बुधवारी हा निर्णय घेतला आहे.

  • जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले आहे. यासाठी झालेल्या मतदानात २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं. तर, चीन,पाकिस्तान आणि रशिया यांसारख्या २५ देशांनी विरोधात मतदान केले. “या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयानंतर गांजा किंवा भांगपासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या साइंटिफिक रिसर्चसाठीही चालना मिळू शकते. या निर्णयानंतर अनेक देश गांजा किंवा भांगच्या वापराबाबतच्या आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गांजाचे तोटे आणि त्याच्या वैद्यकिय फायद्यांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. सध्या ५० पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकीय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या १५ राज्यांमध्ये वैद्यकीय वापरासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.

शिक्षकांचे महत्त्व जनमानसात रुजणे महत्त्वाचे :
  • सोलापूर : जगाने मोठे म्हटल्यानंतर आपणही मोठे म्हणण्याची भारतीयांची मानसिकता हे आपले अपयश आहे. शिक्षकांचे महत्त्व, त्यांचे काम, त्यांचा सामाजिक दर्जा यांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शिक्षकांची गुणग्राहकता आणि योगदानाला मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.

  • युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक डिसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अभिनंदनासाठी दिवसभर मान्यवरांची रीघ लागली आहे. जगभरातून भ्रमणध्वनीही सतत खणखणत आहेत. प्रत्येकाकडून अभिनंदन स्वीकारताना संपूर्ण डिसले कुटुंबीय भारावले आहे. हा कौतुकवर्षांव स्वीकारतानाच डिसले गुरुजी ‘लोकसत्ता’शी बोलत होते.

  • डिसले यांनी भारतीय शिक्षण व शिक्षकांविषयी मते खुल्या मनाने मांडली. भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा, असा त्यांचा आग्रह आहे. परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता भारतात प्रचंड लोकसंख्या हा प्रमुख अडसर असल्याचे दिसते. परदेशात १८ ते २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते, तर भारतात हेच प्रमाण ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडे परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्त करणे कठीण आहे; परंतु अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो.

  • मात्र हे करीत असतानाही शिक्षण क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवण्याची गरज आहे. मंत्री, पुढाऱ्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार वा त्यात हस्तक्षेप असता कामा नये. शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. केवळ पाठय़क्रम पूर्ण करण्यापुरतेच शिक्षकांचे काम नसावे, तर उद्दिष्टे पूर्ण करताना शिक्षकांना जे प्रयोग किंवा उपक्रम राबवायचे आहेत, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असेही मत डिसले यांनी व्यक्त केले.

०५ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.