चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 मे 2023

Date : 4 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : २० गाड्या रद्द, ट्रेनच्या विलंबाची समस्या डिसेंबरपर्यंत कायम राहणार
  • गेल्या दोन महिन्यांपासून हावडा-मुंबई मार्गावरील पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही समस्या अशीच राहणार असल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. याचे कारणही रेल्वे विभागाने दिले आहे.
  • गुरुवारपासून अनेक गाड्यांची चाके थांबणार आहेत. खरे तर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर रेल्वे विभागाच्या रायपूर-रायपूर आरव्ही ब्लॉक हट दरम्यान दुसरा रेल्वे मार्ग आणि रायपूर यार्डच्या आधुनिकीकरणाचे काम ४ ते १० मे दरम्यान प्रस्तावित आहे.
  • यासाठी २० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ६५ गाड्या वळवलेल्या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. देशातील विविध ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा नाही. ज्याचा वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. त्यासाठी मालगाड्यांद्वारे वीज केंद्रांपर्यंत कोळसा पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी प्राधान्याने मालगाड्या सोडण्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
  • वीज प्रकल्पातील कोळशाचा साठा पावसापूर्वी पूर्ण न झाल्यास भविष्यात देशात वीज संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रवासी गाड्यांऐवजी मालगाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच हावडा-मुंबई मार्गावरील नागपूर ते डोंगरगड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गाड्या उशिराने धावत आहेत.
सिरॅमिकच्या पुनर्वापरातून नव्या वस्तूंची निर्मिती करणारा उद्योजक - शशांक निमकर
  • अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाइनमध्ये शिक्षण घेतलेल्या शशांक निमकरने टाकाऊ सिरॅमिकपासून नव्या वस्तूंची निर्मिती करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे.
  • तसंच त्याचं पेटंटही त्यानं मिळवलं आहे. या नवकल्पनेला व्यापक रुप देण्यासाठी शशांकने अर्थ तत्त्व ही स्वत:ची कंपनी देखील उभारली आहे. या कंपनीचा तो संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
  • अनेकदा उद्योगांकडून खराब व त्रुटी राहिलेलं सिरॅमिक फेकून दिलं जातं. फेकून दिलेल्या या सिरॅमिकचं विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
  • यावर तोडगा म्हणून शशांकला सिरॅमिक पुनर्वापराची कल्पना सुचली. शैक्षणिक प्रकल्पाच्या निमित्ताने शशांकने घेतलेला हा पुढाकार आज पर्यावरण जतनासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची आणखी घसरण; १८० देशांमध्ये १६१ वे स्थान
  • जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ११ क्रमांकाने घसरण झाली आहे. जगातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक १६१ इतक्या तळाला गेला आहे, तर शेजारी देश पाकिस्तानात प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्यांचे स्थान ७ अंकांनी वर गेले आहे. पाकिस्तान या यादीमध्ये १५० व्या क्रमांकावर आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (आरएसएफ) या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 
  • भारताचा अन्य एक शेजारी देश श्रीलंकेमध्येही प्रसारमाध्यमांची स्थिती काही प्रमाणात सुधारली असून त्यांनी २०२२ च्या १४६ व्या स्थानावरून या वर्षी १३५ व्या स्थान मिळवले आहे. नॉर्वे, आर्यलड आणि डेन्मार्क हे देश पहिल्या तीन क्रमांकावर आहेत तर व्हिएतनाम, चीन आणि उत्तर कोरिया हे सर्वात तळाला आहेत. त्याआधीच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये भारताचे स्थान १४२ वे होते.
  • आरएसएफ ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर-सरकारी संस्था असून ती दरवर्षी जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध करत असते. जगभरातील पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याची तुलना करणे हे या निर्देशांकाचे उद्दिष्ट आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हे आपले ध्येय असल्याचे ही संस्था सांगते. संस्थेचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून त्यांना संयुक्त राष्ट्रांनी सल्लागाराचा दर्जा दिलेला आहे.
मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा! पंतप्रधानांचे जाहीर सभेत आवाहन

काँग्रेसमध्ये ‘शिवराळ संस्कृती’ असून कर्नाटकच्या जनतेने त्यांना धडा शिकविण्यासाठी मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार तोफ डागली.

  • ‘मी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यंत्रणा मोडित काढल्यामुळे त्या पक्षाचे नेते माझा तिरस्कार करतात आणि माझ्याबाबत अपशब्द वापरतात. काँग्रेस निवडणुकीत एकतर त्यांच्या निवृत्त होत असलेल्या नेत्यांच्या नावे मते मागते किंवा दुसरा मार्ग म्हणजे मोदींना शिव्या दिल्या जातात. कर्नाटकातील जनता ही शिवराळ संस्कृती खपवून घेईल का, कर्नाटकची जनता अपशब्द वापरणाऱ्यांना माफ करेल का, आता तुम्ही काय कराल, तुम्ही त्यांना शिक्षा कराल का, तुम्ही जेव्हा मतदानकक्षात जाल, तेव्हा यंत्रावरील बटण दाबताना जय बजरंगबली म्हणा आणि त्यांना शिक्षा करा,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी मतदारांना आवाहन केले आहे.
  • काँग्रेसचे संपूर्ण राजकारण हे फोडा आणि राज्य करा याच धोरणावर अवलंबून असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलकी येथील प्रचारसभेत केली. भारताच्या लोकशाहीबाबत जगभरात कौतुकाने आणि आदराने बोलले जाते. मात्र काँग्रेस पक्ष देशाला बदनाम करत फिरत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.

‘हनुमान चालिसा’ पठणाचे कार्यक्रम करण्याचा बजरंग दलाचा निर्णय

  • काँग्रसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर, संपूर्ण राज्यभरात गुरुवारी ‘हनुमान चालिसा’ पठणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे या संघटनेने जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसने हे आश्वासन मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी दिले असल्याचे कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी म्हटले आहे.

04 मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.