चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ मे २०२१

Date : 4 May, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीयांना प्रवेशबंदीचे ऑस्ट्रेलियाकडून समर्थन :
  • भारतातील व्यक्तींना ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी करण्यात आली असून जे ऑस्ट्रेलियन लोक भारतातून परत येतील त्यांना  तुरुंगात टाकून दंडही केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयाचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी समर्थन केले.

  • ऑस्ट्रेलियाच्या सरकारने म्हटले आहे की,  देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या देशाच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याची वेळ आली आहे.  जर भारतीय व्यक्ती १४ दिवस मायदेशी राहिली तर त्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळणार नाही. सरकारने या लोकांवर खटले भरून पाच वर्षे तुरुंगवासात टाकण्याचा इशारा दिला आहे तसेच ६६ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे ५०८९९ अमेरिकी डॉलर्स दंड करण्यात येणार आहे.

  • मॉरिसन यांनी सांगितले की, ही प्रवेशबंदी तात्पुरती आहे. ऑस्ट्रेलियात कोविडची तिसरी लाट येऊ नये यासाठी ही  उपाययोजना गरजेची आहे.  भारतीय व्यक्तींना हा निर्णय भयानक वाटणे साहजिक आहे पण हॉवर्ड स्प्रिंग्ज केंद्रात रुग्णांची संख्या सात पटींनी वाढली असून ते लोक भारतातून परत आलेले आहेत.

या महिन्यातल्या सगळ्या ऑफलाईन परीक्षा पुढे ढकला- शिक्षण मंत्रालयाचा आदेश :
  • शिक्षण मंत्रालयाने आज एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. मंत्रालयाने सर्व केंद्रिय अनुदान प्राप्त शिक्षण संस्थांना या महिन्यातल्या सर्व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश दिला आहे. देशातली करोनाची दुसरी लाट लक्षात घेता हा आदेश देण्यात आला आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. त्याच्यात अद्याप तरी बदल होणार नाही.

  • दिल्ली विद्यापीठासह अनेक शिक्षण संस्थांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दिल्ली विद्यापीठाचे डीन दिवान रावत यांनी म्हटलं आहे की, सर्व कुलगुरु आणि डीन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी हेही सांगितलं की देशातली करोनाची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • या परीक्षा आता जूनमध्ये घेण्यात येतील. दरम्यान, आज वैद्यकीय क्षेत्रासाठीची नीट(NEET) ही परीक्षा चार महिने पुढे ढकलण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ :
  • अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

  • तर, सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय झाला आहे. तर, शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या सर्वांची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

  • ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. तसेच,  ममता बॅनर्जींनी सर्व आमदार, नेते व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की, कोरनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नका, जल्लोष करू नका असं ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करावी :  
  • करोना महामारीचे संकट प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढत असतांना विद्यार्थी या आजाराने बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत इयत्ता १२ वीची परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. या प्रतिकू ल वातावरणात परीक्षा देण्याबाबत विद्याथी, पालक, शिक्षक अशी सर्वच यंत्रणा अस्वस्थ आहे. याचा विचार करुन १२ वीची परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

  • जिल्हा तसेच राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहेत. करोनाग्रस्त रुग्णांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा धोकादायक वातावरणात परीक्षा घेणे कितपत योग्य ठरेल, याविषयी धास्तावलेले पालक मुख्याध्यापकांना दूरध्वनीवरून सातत्याने विचारणा करत आहेत.

  • समाज माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. परीक्षा घ्यायच्याच असतील तर १२ वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांंना १०० टक्के  लसीकरण करावे, त्यांना विमा कवच द्यावे, सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, सोबत परीक्षा संचालनालयात काम करणाऱ्या यंत्रणेचे लसीकरण करून विमा कवच द्यावे, अशी मागणी.

“भारतात करोनामुळे अजून वाईट स्थिती येईल”, गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचं भाकीत :
  • देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेतच संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडताना दिसत आहे. तसेच ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. करोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे.

  • त्यातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला इशारा देत करोनाबाबत भाकीत वर्तवलं आहे. सीएनएन या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अद्याप वाईट स्थिती येईल असं भाकीत केलं आहे.

  • ‘भारतात करोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे. भारताची करोनामुळे सध्या बिकट अवस्था आहे. अमेरिकेकडून भारताला मदत मिळत असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.’, असं त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

  • ‘आमचं लक्ष लोकांना खरी आणि योग्य माहिती देण्यावर आहे. त्यामुळ लोकांना मदत मिळेल.’, असं त्यांनी गुगल कंपनी भारतासाठी काय करते? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

केंद्रीय लसधोरण आरोग्यहक्कास बाधक; बदलाचे निर्देश :
  • केंद्र सरकारचे लसीकरण धोरण हे जनतेच्या आरोग्यहक्कास बाधक असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे सरकारने लसधोरणात बदल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एल. नागेश्वर राव आणि एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने केंद्राला दिले आहेत.

  • करोनाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, रविवारी न्यायालयाने आदेशपत्राद्वारे महत्वाच्या शिफारशी व निर्देश दिले. आरोग्य हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ चा अविभाज्य आहे, याकडे लक्ष वेधत न्यायालयाने लसधोरणात बदल करण्याचे केंद्राला निर्देश दिले.

  • रुग्णांकडे स्थानिक निवासाचा दाखला वा ओळखपत्र नसले तरी, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून वा अत्यावश्यक औषधांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत दोन आठवडय़ांत राष्ट्रीय धोरण निश्चित करण्याचे आदेश केंद्राला दिले असून या धोरणाचे देशातील सर्व रुग्णालयांना पालन करावे लागेल.

  • अहमदाबादमध्ये करोनाच्या रुग्णाला विशिष्ट रुग्णवाहिकेतून न आणल्याचे कारण देत रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला होता. आता हा नियम गुजरात प्रशासनाने रद्द केला आहे. काही ठिकाणी निवासाचा दाखला नसल्याचे कारण देत करोना रुग्णांवर उपचार करण्यास रुग्णालयांनी नकार दिला होता. रुग्णालयांसंदर्भातील धोरणातील विसंगतीची दखल घेत, रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत देशभर समान सूत्र लागू करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

०४ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.