चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 मार्च 2023

Date : 4 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

महिला क्रिकेटच्या नव्या युगाला प्रारंभ, महिला प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात

  • महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) शनिवारपासून सुरुवात होत असून महिला क्रिकेटच्या नवीन युगाचा प्रारंभ लीगच्या माध्यमातून होईल. या लीगमुळे भारतातील महिला खेळाडूंना मोठय़ा खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव मिळेल. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यानच्या पहिल्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत एकूण २१ सामने खेळले जातील.
  • मुंबई संघाचे नेतृत्व भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर करेल. तर गुजरातची जबाबदारी बेथ मूनीवर असेल. ‘डब्ल्यूपीएल’मध्ये दिग्गज खेळाडूंसह स्नेहा दीप्ती आणि जासिया अख्तरसारख्या नवख्या खेळाडूंकडेही अनेकांचे लक्ष असेल. जम्मू आणि काश्मीरची जासिया मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. हरमनप्रीत, स्मृती मनधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा या भारताच्या खेळाडूंकडे सर्व जण लक्ष ठेवून असतील. या ट्वेन्टी-२० लीगची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. यामध्ये एकूण पाच संघ आणि ८७ खेळाडूंचा समावेश आहे. यामधील १५ वर्षांहून अधिक वयाच्या खेळाडूंना जगातील दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये होतील.
  • ‘डब्ल्यूपीएल’मध्ये पाचही संघांना एकूण ४,६६९ कोटी रुपयांना विकण्यात आले. यामध्ये अदानी समूहाने गुजरात संघाला १,२८९ कोटी रुपयांना खरेदी केले. खेळाडूंच्या लिलावावर पाच संघांनी एकूण ५९.५० कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे महिला खेळाडूंची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल. या लिलावात भारताची तारांकित फलंदाज स्मृतीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी) संघाने ३.४० कोटी रुपयांना खरेदी केले आणि अपेक्षेनुसार तिला कर्णधार बनवण्यात आले. या संघात सोफी डिवाइन आणि अ‍ॅलिस पेरी यांचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्स (९१२.९९ कोटी रुपये) लीगमधील दुसरा सर्वात महागडा संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हा संघ पुरुषांच्या पाच ‘आयपीएल’ विजेत्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. हरमनप्रीतसह संघात इंग्लंडची नॅट स्किव्हर-ब्रंट आणि वेगवान गोलंदाज इसे वाँग, न्यूझीलंडची अमेलिया केर, दक्षिण आफ्रिकेची क्लोए ट्रायॉन, वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाज हेथर ग्राहमचा समावेश आहे.
  • बेथ मूनीच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स संघात हरलीन देओल, स्नेह राणा (उपकर्णधार) आणि अनुभवी सुषमा वर्माचा सहभाग आहे. त्यांच्याकडे अ‍ॅश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅम, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि इंग्लंडची सोफिया डंकलेही आहे. भारताची माजी कर्णधार मिताली राज संघाची प्रेरक आणि सल्लागार आहे. यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाज एलिसा हीलीला कर्णधार बनवले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करत असून त्यांच्याकडे जेमिमा व शफालीसारख्या फलंदाज आहेत.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात Foxconn करणार मोठी गुंतवणूक; १ लाख नोकऱ्यांची होणार निर्मिती

  • Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. ही कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेत आहे. Apple चा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Foxconn (फॉक्सकॉन) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. Foxconn ने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. यासोबतच या कंपनीने राज्यातील या प्रकल्पात १ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे फॉक्सकॉन कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यभरात तब्बल १ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
  • Foxconn चे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या बैठकीनंतर ही गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी फॉक्सकॉन आणि तेलंगणा सरकारमध्ये हा करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. या करारामुळे १० वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यात १ लाखांपेक्षा अधिक लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. मात्र तैवानची कंपनी तेलंगणा राज्यात किती गुंतवणूक करणार याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
  • मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, फॉक्सकॉनचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेटअप युनिट तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यास मदत करेल. तसेच राज्यात असे अधिक उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल. या कराराच्या वेळी राज्याचे आयटी व उद्योग मंत्री के.टी. रामाराव तसेच इतर काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
  • केसीआर आणि यंग लिऊ यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात विविधता आणण्याचे महत्व व राज्य सरकारची भूमिका यावर चर्चा केली. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांना आकर्षित करण्यास सरकार यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. फॉक्सकॉनची मोठी गुंतवणूक आणि तेलंगणा राज्यामध्ये १ लाखांपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण करण्याची संधी कौतुकास्पद आहे. तसेच राज्य सरकार फॉक्सकॉन कंपनीला राज्यातील प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉनच्या अध्यक्षांना दिले.

दहशतवादविरोधी गट स्थापण्याची ‘क्वाड’ची घोषणा

  • मुक्त आणि खुल्या हिंदू-प्रशांत प्रदेशासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिली. या भागामध्ये कायद्याचे राज्य, स्वायत्तता, प्रादेशिक अखंडता आणि विवादांवर शांततापूर्ण समझोता या बाबींना जोरदार समर्थन देत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. क्वाड गटाची ही भूमिका म्हणजे नाव न घेता चीनला इशारा दिल्याचे मानले जात आहे.
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्रमंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांची शुक्रवारी बैठक झाली. त्या वेळी या दहशतवादविरोधी गटाची घोषणा करण्यात आली. हा गट दहशतवादाचे नवे स्वरूप, धार्मिक मूलगामित्वामध्ये वाढ आणि हिंसक अतिरेकी गट यांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचा शोध घेईल.
  • या बैठकीनंतर चारही परराष्ट्रमंत्र्यांनी रायसीना चर्चेतील एका सत्राला हजेरी लावली, या वेळी त्यांनी क्वाड सदस्य देशांच्या सामायिक हितसंबंधांबद्दल चर्चा केली. या बैठकीनंतर चारही परराष्ट्रमंत्र्यांनी रायसीना चर्चेला हजेरी लावली, या वेळी त्यांनी क्वाड सदस्य देशांच्या सामायिक हितसंबंधांबद्दल चर्चा केली. तसेच त्यांनी एकमताने सर्व स्वरूपांतील दहशतवादाचा निषेध केला आणि दहशतवादी गटांचा वापर करण्यास, तसेच दहशतवादी कारवायांसाठी त्यांना आर्थिक किंवा लष्करी पाठबळ देण्यास विरोध केला. या वेळी २६/११ चा मुंबई हल्ला आणि पठाणकोट हल्ल्यांसह सर्व दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. आरोग्य सुरक्षितता, हवामानातील बदल, हरित ऊर्जा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाबद्दलही परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली.

आयफोन निर्मितीचा प्रकल्प चीनमधून कर्नाटकात, ‘फॉक्सकॉन’च्या प्रकल्पातून एक लाख रोजगारनिर्मिती

  • जगभरातील उच्चभ्रूंच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या ‘अ‍ॅपल फोन’ची निर्मिती लवकरच भारतात होणार आहे. ‘अ‍ॅपल’ची भागीदार असलेली प्रख्यात ‘फॉक्सकॉन’ कंपनी कर्नाटकात ‘अ‍ॅपल फोन’च्या सुटय़ा भागांची निर्मिती करणारा कारखाना कर्नाटकात सुरू करणार असून त्यासाठी सुमारे ७०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. 
  • ‘अ‍ॅपल’चा कारखाना कर्नाटकात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव शेखरन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी दिली. बंगळूरु विमानतळापासून जवळच ३०० एकरावर हा कारखाना सुरू होणार असल्याचे ट्वीट केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखरन यांनी केले. ‘अ‍ॅपल’निर्मिती कारखान्यामुळे एक लाख रोजगार उपलब्ध होतीलच, शिवाय कर्नाटकसाठी भरपूर संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
  • अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे ‘फॉक्सकॉन’ आपले प्रकल्प चीनमधून स्थलांतरित करण्यावर भर देत आहे. कर्नाटकात सुरू होऊ घातलेला अ‍ॅपलच्या सुटय़ा भागांचा कारखाना हा त्यापैकी एक असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.
  • जागेची पाहणी : अ‍ॅपलची भागीदार कंपनी ‘फॉक्सकॉन’चे अध्यक्ष यंग लिऊ यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी बंगळूरु येथे कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञानमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नियोजित कारखान्याच्या जागेची पाहणी ‘फॉक्सकॉन’च्या शिष्टमंडळाने केल्याची माहिती अश्वथ नारायण यांच्या कार्यालयाने निवेदनाद्वारे दिली.

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

राज्य मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात पसरल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याची माहिती असून, या प्रकाराची राज्य मंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजनाही करण्यात येत असूनही गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झालेल्या गैरप्रकारात काही शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात फिरल्याचे दिसून आले. सिंदखेड राजा येथे हा प्रकार झाल्याची माहिती आहे.

 

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 मार्च 2022

 

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा - नागपूरच्या दिव्याला राष्ट्रीय जेतेपद : 
  • नागपूरच्या १६ वर्षीय दिव्या देशमुखने ५८व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे जेतेपद पटकावले. किशोरवयातच राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी ती पाचवी बुद्धिबळपटू ठरली आहे.

  • वसंती (१९७४), जयश्री (१९७५) आणि रोहिणी (१९७६) या खाडिलकर भगिनींव्यतिरिक्त कोनेरू हम्पीने २००३मध्ये असा पराक्रम केला होता. २०१९च्या राष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने कांस्यपदकाची कमाई केली होती. दिव्याने नवव्या फेरीअंती सर्वाधिक आठ गुण कमावून पहिल्या राष्ट्रीय जेतेपदावर मोहोर उमटवली.

  • नवव्या फेरीत दिव्याने सौम्या स्वामीनाथनला १८ चालींमध्ये बरोबरीत रोखले. महाराष्ट्राच्या साक्षी चितलांगेला दुसऱ्या, तर आंध्र प्रदेशच्या प्रियंका नुटाक्कीला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. दिव्याने विविध वयोगटांतील २४ स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना १७ सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदकांवर नाव कोरले आहे.

परिमल विखे यास विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचा पुरस्कार जाहीर :
  • पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये पीएचडी करीत असलेल्या तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील परिमल लक्ष्मण विखे या तरुणाने गव्हातील जीन शोधून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या संकरीत जातीच्या केलेल्या संशोधनास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २०२१ साठी अवसर कार्यक्रमाद्वारे देशातील संशोधन कार्य करीत असलेल्या संशोधकांकडून त्याबाबतचे पेपर्स मागविले होते व त्यासाठी पुरस्कार ठेवले होते.

  • संशोधनासाठी तीन गट करण्यात आले होते. परिमल गेल्या पाच वर्षांपासून आघारकर इन्स्टिटय़ूटमध्ये गव्हावरील संशोधन करीत आहे. त्यासाठी त्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्तीही मिळत आहे. वेगवेगळय़ा शेतावर आणि प्रयोगशाळेत काम करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे संशोधन केले आहे.

  • गव्हाचे अनेक वाण बनवण्यात आले असले तरी खोलवर पेरणीमुळे उगवण कमी होणे, उगवण झाली तरी वाढ अधिक झाल्याने पीक जमीनदोस्त होऊन नुकसान होणे हे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरत असते.परिमल हे शेतकरी कुटुंबातील असल्याने लहानपणापासून ते आपल्या डोळय़ांनी हे बघत आलेले आहे.यातून त्यांचे झालेले अस्वस्थ मन त्यांना संशोधनाकडे घेऊन गेले.

१० लाखांहून अधिक नागरिक युक्रेनबाहेर :
  • रशियाच्या आक्रमणामुळे १० लाखांहून अधिक लोक युक्रेनमधून बाहेर पडले असून, या शतकातील हे सर्वात जलदगतीने झालेले निर्गमन अ्सल्याचे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठय़ा शहरावरील आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत.

  • निर्वासितांची ही संख्या लक्षात घेता, युक्रेनच्या लोकसंख्येपैकी २ टक्क्यांहून अधिक लोकांना गेल्या सात दिवसांत देशाबाहेर पडणे भाग पडले आहे. हे सामूहिक स्थलांतर सुमारे १५ लाख लोकसंख्येच्या खारकिव्ह शहरात नजरेला पडत होते. सतत येऊन पडणारे तोफगोळे आणि बॉम्ब यांच्यापासून बचावासाठी नागरिकांनी शहरातील रेल्वे स्थानकावर गर्दी केली आणि गाडय़ांमध्ये प्रवेश मिळवला. त्यापैकी बहुतेकांना आपल्याला कुठे जायचे आहे हे ठाऊक नव्हते.

  • रणगाडे व इतर वाहने गेले काही दिवस राजधानी किव्हच्या बाहेर थांबलेले असताना, युक्रेनमध्ये अनेक आघाडय़ांवर युद्ध सुरू होते. युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने बोलण्यांची दुसरी फेरी गुरुवारी उशिरा शेजारच्या बेलारूसमध्ये होणे अपेक्षित होते, तथापि दोन्ही देशांकडे त्यासाठी कुठलेही सामायिक मुद्दे नाहीत.

हवाई दलाच्या चार विमानांतून ७९८ भारतीय परत :
  • रुमानियाची राजधानी बुखारेस्ट व हंगेरीची राजधानी बुडापेस्ट यांच्यासह पोलंडमधील झेशुफ शहरांतून ७९८ भारतीयांना घेऊन आपली चार विमाने गुरुवारी सकाळी गाझियाबादमधील िहडन हवाई तळावर उतरल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली.

  • बुखारेस्टहून २०० जणांना घेऊन आलेले विमान दुपारी १.३० वाजता येथे उतरले. दुसऱ्या विमानाने २१० भारतीयांना बुडापेस्टहून परत आणले. दुसऱ्या विमानानंतर काही वेळातच झेशुफ येथून उडालेल्या विमानातून २०८ भारतीय हिंडन तळावर येऊन पोहोचले.

  • भारतीय हवाई दलाचे बुखारेस्टहून आलेले चौथे विमान सकाळी ८.१५ वाजता हिंडन तळावर उतरले. प्रामुख्याने विद्यार्थ्यांसह १८० जण या विमानात होते, असे हवाई दलाने एका निवेदनात सांगितले. हवाई दलाची ही चारही उड्डाणे सी-१७ या लष्करी वाहतूक विमानातून झाली.

  • स्थलांतरितांच्या स्वागतासाठी संरक्षण राज्यमंत्री अजय भट हे हवाई तळावर उपस्थित होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दल गुरुवारी आणखी तीन विमाने युक्रेनच्या शेजारी देशांतील निरनिराळय़ा ठिकाणी पाठवत आहे, अशी माहिती हवाई दलाने दिली.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - भारताला सांघिक प्रकारात सुवर्ण :
  • श्री निवेता, ईशा सिंग आणि रुचिता विनेरकर या भारताच्या महिला त्रिकुटाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

  • महिला त्रिकुटाने १६ अचूक लक्ष्यवेध करताना भारताच्या खात्यावर दुसरे सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक जमा केले. दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदकासह भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे. जर्मनीने रौप्यपदक पटकावले.

  • भारतीय महिला त्रिकुटाने पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ५७४ गुणांसह आघाडीचे स्थान मिळवले, तर जर्मनीच्या त्रिकुटाने ५७१ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. ईश, श्री निवेता आणि रुचिता या तिघींनी पात्रतेच्या पहिल्या टप्प्यातही पहिले स्थान काबीज केले.

०४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.