चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ मार्च २०२१

Date : 4 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी सत्तेत आल्यापासून भारतामधील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल :
  • अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने स्वातंत्र्यासंदर्भात भारताच्या मानांकनामध्ये कपात केलीय. भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र वरुन अंशत: स्वतंत्रवर आणण्यात आला आहे.

  • नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य हे २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने म्हटलं आहे. खास करुन मुस्लिमांवर होणारे हल्ले, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने करोना परिस्थिती हाताळताना केलेला लॉकडाऊन या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारतातील स्वातंत्र्यावर गदा आल्याचं फ्रीडम हाऊसने नमूद केलं आहे.

  • स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेले गुण हे ७१ वरुन कमी करुन ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या यादीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानांनी घसरण झाली आहे.

  • फ्रीडम हाऊसने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये, “मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणाऱ्या संस्थावर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जणकार आणि पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्याचाही समावेश आहे. स्वतंत्र देशांच्या यादीमध्ये २०१९ साली मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर भारताची आणखीन घसरण झाली. त्यानंतर २०२० साली ज्या पद्धतीने भारत सरकारने करोनाची परिस्थिती हाताळली त्यादरम्यान मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालं,” असं नमूद करण्यात आलं आहे.

बुद्धिमान युवकांना अनेक क्षेत्रांची दारे खुली - मोदी :
  • बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी अवकाश, अणुऊर्जा, कृषी यासारख्या अनेक क्षेत्रांची दारे खुली आहेत. ज्ञान व संशोधनाला जर आपण मर्यादा घातल्या तर देशाच्या क्षमतेचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य ठरणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. अर्थसंकल्पातील शिक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या तरतुदींविषयी ते एका वेबिनारमध्ये बोलत होते.

  • पंतप्रधान म्हणाले, की नवे शैक्षणिक धोरण हे स्थानिक भाषेला प्रोत्साहन देणारे असून आता शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी व तज्ज्ञांनी प्रादेशिक भाषात चांगला आशय प्रादेशिक भाषात निर्माण करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या या जगात हे सगळे शक्य आहे. शिक्षण, कौशल्ये, संशोधन व नवप्रवर्तन या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणाचा संबंध रोजगाराशी जोडला असून उद्यमशील क्षमता निर्माण करण्यातही त्याचा उपयोग होणार आहे.

  • भारत आज वैज्ञानिक प्रकाशनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्ञान व संशोधनाला मर्यादा घालणे म्हणजे देशाच्या क्षमतेवर अन्याय करण्यासारखे आहे. आजच्या काळात अवकाश, अणुऊर्जा, डीआरडीओ, कृषी अशा अनेक क्षेत्रांची दारे बुद्धिमान युवकांसाठी खुली आहेत. स्वयंपूर्ण भारत घडवण्यासाठी युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.

सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नाही- सुप्रीम कोर्ट :
  • सरकारचं मत आहे त्याच्या अगदी भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह ठरत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका फेटाळून लावताना हे मत नोंदवलं आहे. “सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं याला देशद्रोह म्हटलं जाऊ शकत नाही,” असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

  • जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी भारताविरोधात पाकिस्तान आणि चीनकडूम मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करु शकला नाही. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.

  • नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्याच्याच आधारे ही याचिका करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

६,६,६,६,६,६… सहा चेंडूत सहा षटकार; पोलार्डने युवराजच्या विक्रमाशी केली बरोबर :
  • वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेदरम्यान (West Indies vs Sri Lanka) सुरु असणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. ४१ चेंडू आणि चार गडी राखत वेस्ट इंडिजच्या संघाने सामना खिशात घातला. विंडिजकडून कायरन पोलार्डने (Kieron Pollard) कर्णधारपदाला साजेसा खेळ केला.

  • पोलार्डने अकीला धनंजयच्या (Akila Dhananjay) एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. या पराक्रमबरोबरच पोलार्डने युवराज सिंग (Yuvraj Singh) , हर्शल गिब्सच्या (Herschelle Gibbs) विक्रमाची बरोबरी केली आहे. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. युवराजने टी-२० तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.

  • पोलार्डने विंडीज संघाची फलंदाजी सुरु असतानाच पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करत विक्रमी कामगिरी केली. पोलार्डने ११ चेंडूमध्ये ३८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता. विशेष गोष्ट म्हणजे पोलार्डने हे सहाही षटकार मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना मारण्याऐवजी सरळ मारले. पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची बरोबर केली आहे. तब्बल १४ वर्षांनंतर कोणत्याही खेळाडूला या विक्रमाची बरोबर करण्यात यश मिळालं आहे.

सात्त्विक-अश्विनीचा धक्कादायक विजय :
  • स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. याशिवाय पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने दुसरी फेरी गाठली, तर एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा यांना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.

  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या हफिझ फैझल आणि ग्लोरिआ इमॅन्युएल या जोडीला सात्त्विक-अश्विनी यांच्या जोडीने २१-१८, २१-१० असे सरळ दोन गेममध्ये नमवले. जानेवारीत झालेल्या थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत याच दुसऱ्या मानांकित जोडीने सात्त्विक-अश्विनीला उपांत्य फेरीत हरवले होते. आता दुसऱ्या फेरीत सात्त्विक-अश्विनी यांच्यापुढे इंडोनेशियाच्याच रिनोव्ह रिवाल्दी आणि पिथा मेंतारी या जोडीचे आव्हान असेल.

  • पुरुष दुहेरीत चिराग शेट्टीच्या साथीने खेळताना सात्त्विकने स्कॉटलंडच्या ख्रिस्तोफर ग्रिमले आणि मॅथ्यू ग्रिमले यांना २१-१८, १९-२१, २१-१६ असे पराभूत केले.

०४ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.