चालू घडामोडी आणि दिनविशेष - 04 फेब्रुवारी 2024

Date : 4 February, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा
 • भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत.
 • गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राजकारणातून अलिप्त राहिले होते. जानेवारी महिन्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली. बाबरी मशीदीच्या विवादित जागेवर राम मंदिर व्हावं म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना निमंत्रण नाकारण्यात आलं होतं. यावरून प्रचंड गदारोळ झाला. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. परंतु, प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येत तापमान घसरलं होतं. थंडी वाढली होती, त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी तिथे जाणं टाळलं.
अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची पहिली भेट कुठे झाली होती? वाचा रंजक किस्सा
 • भाजपाचे वरिष्ठे नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. (Bharat Ratna Lal Krishna Advani) देशातला सर्वात मोठा नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार. हा पुरस्कार हा जाहीर झाला आहे. ही घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. एक काळ असा होता ज्या काळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची जोडी हे देशभरात गाजलेली जोडी होती. या जोडीमुळेच देशात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकारही स्थापन होऊ शकलं. लालकृष्ण आडवाणी यांना राम मंदिराच्या रथयात्रेचं श्रेय तर जातंच पण राजकारणात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची मैत्री कायमच चर्चेत राहिली. (Latest News)

लालकृष्ण आडवाणी यांनी राजकारणात सुरु केलं ‘यात्रा कल्चर’

 • लालकृष्ण आडवाणी हे असे नेते आहेत ज्यांनी राजकारणात यात्रांची संस्कृतीच एक प्रकारे रुजवली. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे ही मागणी जेव्हा सातत्याने होत होती तेव्हा लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रथायात्रा काढली होती. ज्यानंतर देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचं राजकारण उदयाला आलं. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी समस्तीपूरमध्ये लालकृष्ण आडवाणी यांना अटक केली. या निर्णयामुळे लालकृष्ण आडवाणी आणि लालूप्रसाद यादव हे दोघंही त्या काळातले चर्चेतले चेहरे ठरले होते.

आडवाणी आणि वाजपेयी यांची जोडी

 • शुद्ध आणि संस्कृत शब्दांचा साज असलेली हिंदी भाषा बोलण्यासाठी लालकृष्ण आडवाणी ओळखले जातात. त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं की वयाच्या २० व्या वर्षापर्यंत त्यांना हिंदी नीट बोलता यायचं नाही. त्या काळात ते अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणं ऐकत. या दोघांची मैत्री खूप गहिरी होती. लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा त्यानंतर त्यांना झालेली अटक या सगळ्यानंतर लालकृष्ण आडवाणी हेच भाजपाची सत्ता आल्यावर पंतप्रधान होतील अशा चर्चा होत्या. मात्र त्यावेळी भाजपाचं मुंबईतलं जे अधिवेशन पार पडलं त्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयींचं नाव जाहीर केलं आणि त्यावेळी हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरला होता. भारतीय जनता पार्टीला बळ देण्यात लालकृष्ण आडवाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. जेव्हा आडवाणी यांनी वाजपेयींचं नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं तेव्हा लालकृष्ण आडवाणी हे भाजपाचे अध्यक्ष होते.
‘लोकसत्ता’च्या ‘रत्नभूमी कॉफी टेबल बुक’चे आज प्रकाशन; रत्नागिरीचे वैभव पुस्तक रुपात, उदय सामंत यांची उपस्थिती 
 • रत्नागिरीला जितका संपन्न वारसा लाभला आहे तितकेच आश्वासक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्यही दृष्टिपथात आहे.  प्रगतीच्या वाटेवर असलेल्या रत्नागिरीच्या समृद्धतेची साक्ष देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या कॉफी टेबल पुस्तकाचे आज, रविवारी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
 • रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्टय़े, येथील संस्कृती, समाजजीवन, लोककला, साहित्य, शिक्षण, उद्योग अशा विविध विषयांवर या कॉफी टेबल पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. मीनल ओक, डॉ. विवेक भिडे, दीपक गद्रे, आशुतोष बापट, ऋत्विज आपटे, प्रतीक मोरे, प्रशांत पटवर्धन, ज्योती मुळय़े, कॅ. दिलीप भाटकर, विनय महाजन, केदार फाळके, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या लेखांचा पुस्तकात समावेश असून जिल्ह्याच्या वैभवाच्या खुणा दर्शवणारी छायाचित्रेही त्यात असतील.
 • या प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने ‘रत्नागिरी २०५०’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह नामवंत उद्योजक सहभागी होणार आहेत. 

कधी? रविवारी दुपारी ३.४५वा. 

कुठे? हॉटेल ‘सिल्व्हर स्वान’, विश्रामगृहासमोर, माळनाका * कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी केलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल.

भारताने पहिल्या डावात केल्या 396 धावा, यशस्वी जैस्वालने झळकावले द्विशतक
 • विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील भारतचा पहिलाय डाव शनिवारी सकाळी आटोपला. भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक २०९ धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
 • ३४ धावा करणारा शुबमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली. भारताचे शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आता पुढल्या सामन्यात या दोघांनाही संघातून वगळले जाऊ शकते. तिसऱ्या कसोटीसाठी संघनिवड अजून व्हायची आहे. विराट कोहली संघात परतला तर श्रेयस अय्यर टीम इंडियातून बाहेर पडू शकतो. त्याचवेळी राहुलही फिट झाल्यास शुबमन गिललाही संघातून वगळले जाऊ शकते.
 • भारतीय संघाच्या पहिल्या डावात स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच भारताची एक बाजू लावून धरली. यशस्वी जैस्वालला इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून फार काळ साथ मिळाली नाही, तरीही त्याने सर्व फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वाच्या भागीदारी केल्या.
 • पहिल्या डावात यशस्वी फलंदाजी करताना कोणताही इंग्लिश गोलंदाज त्याच्याविरुद्ध प्रभावी दिसला नाही. इंग्लंडचा प्रत्येक गोलंदाज यशस्वीसमोर असहाय्य दिसत होता. यशस्वीने २९० चेंडूंचा सामना करताना २०९ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि ७ षटकार आले. यशस्वी जैस्वालची विकेट पहिल्या डावात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने घेतली. त्याने जैस्वालला बेअरस्टोकरवी झेलबाद केले.

 

आशिया कप २०२३ साठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? आज होणार निर्णय

 • आशिया चषक २०२३ च्या आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानकडे आहे. पीसीबी या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे, परंतु भारताने या स्पर्धेसाठी शेजारील देशात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती. त्यानंतर पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी एसीसीची बैठक बोलावण्याची चर्चा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक बहरीनमध्ये आज म्हणजेच शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे स्पष्ट होईल.
 • २०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वीही जय शाह यांनी आपल्या एका वक्तव्यात ही गोष्ट स्पष्ट केली होती. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली होती, त्यानंतर पीसीबीचे नवे प्रमुख नजम सेठी यांनी एसीसीची बैठक बोलावण्याची चर्चा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक बहरीनमध्ये आज म्हणजेच शनिवार, ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे स्पष्ट होईल.
 • आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानला जाणार नाही या निर्णयावर भारत ठाम असल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये हलवली जाऊ शकते, तर दुसरा पर्याय श्रीलंकेकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. जर पाकिस्ताननेही ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याचा निर्णय बदलला नाही, तर यावेळी ही स्पर्धा टीम इंडियाशिवाय खेळवली जाऊ शकते.
 • बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “जय शाह एसीसीच्या बैठकीसाठी बहरीनमध्ये आहेत. बीसीसीआयची भूमिका बदलणार नाही. सरकारकडून आम्हाला कोणताही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याने भारत पाकिस्तानला जाणार नाही.”

गौतम अदाणींचा पाय आणखीन खोलात; S&P Dow Jones च्या यादीतून ‘अदाणी’ची गच्छंती! नेमकं घडतंय काय?

 • अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी आता पहिल्या दहामधूनही बाहेर फेकले गेले आहेत. त्यांचा सर्वात मोठा FPO त्यांना बाजारातून गुंडाळावा लागला आहे. खरेदीदारांना पैसे परत करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या एकूण बाजारमूल्यामध्ये तब्बल ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी अदाणींना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना विनंती करावी लागत आहे. आणि हे सगळं घडलं हिंडनबर्ग रीसर्चच्या एका अहवालामुळे, ज्यामध्ये अदाणी एंटरप्रायजेसनं बाजारपेठेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता भरीस भर म्हणून S&P Dow Jones नंही आपल्या निर्देशांक यादीतून अदाणी एंटरप्रायजेसची गच्छंती केली आहे. यामुळे नेमकं काय होणार आहे?
 • S&P Dow Jones Indices काय आहे - सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास S&P Dow Jones निर्देशांकामध्ये जागतिक स्तरावरील बाजारपेठेतील कंपन्यांची त्यांच्या गुणवत्ता, विकासाचा दर आणि क्षमता या आधारावर क्रमवारी ठरवतो. S&P Dow Jones Sustainability World IndeX च्या संकेतस्थळावर अशा कंपन्यांची यादी जाहीर केली जाते. या यादीमधील कंपन्या या आर्थिकदृष्ट्या सक्षम, आवाक्याच्या दृष्टीने व्यापक आणि शाश्वततेच्या दृष्टीने दीर्घकाळापर्यंत बाजारात अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या असतात. त्यामुळे या यादीमध्ये समावेश असणाऱ्या कंपन्यांची बाजारातील पत आपोआपच वाढलेली असते. पण त्याउलट या यादीतून अशा प्रकारे बाहेर काढण्यात आलेल्या कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. थोडक्यात एखाद्या कंपनीची विश्वासार्हता ठरवणारा हा एक महत्त्वाचा निकष ठरतो.
 • या यादीमध्ये S&P Global Broad Market Index अर्थात BMI मध्ये नोंद असलेल्या २५०० कंपन्यांपैकी अग्रगण्य १० टक्के कंपन्यांचा समावेश असतो. त्यामुळे या यादीमधून बाहेर पडल्यामुळे अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची पत गुंतवणूकदारांच्या लेखी ढासळल्याचं मानलं जात आहे. ‘अदाणी’ला यादातून बाहेर काढल्याची घोषणा होताच त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आला. अदाणी एंटरप्रायजेसचे शेअर्स १५ टक्के खाली उतरले आहेत.NSE नं अदाणी एंटरप्रायजे, अदाणी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांना अॅडिशनल सर्वेलन्स मेजर्स (ASM)खाली ठेवलं आहे. अर्थात, या कंपन्यांच्या शेअर्सच्या व्यवहारांवर आता बारीक नजर ठेवली जाणार आहे.

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम वेगात; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

 • महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळे आणले होते, त्यांनी या प्रकल्पासंदर्भात एकही परवानगी दिली नाही. आता गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही बुलेट ट्रेनचे काम धडाक्यात होईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
 • बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून िशदे-फडणवीस सरकारने आवश्यक सर्व परवानग्या दिल्या आहेत, निविदाही काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबई ते वापी या मार्गावर खांब उभारणीची कामे सुरू होतील. गुजरातमध्ये १४० किमीच्या पट्टय़ामध्ये खांब उभारणी झालेली आहे. जपानने अलिकडेच बुलेट ट्रेनच्या कामांचा आढावा घेतला आहे, असे वैष्णव म्हणाले. बुलेट ट्रेन प्रकल्प ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 • काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. २००९-२०१४ या काळात राज्याला रेल्वेविकासासाठी सरासरी १ हजार १७१ कोटी दिले जात होते. त्यातुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील रेल्वेविकासासाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आ ल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. राज्यातील १२३ रेल्वे स्टेशनांचे आधुनिकीकरण केले जात असून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसटीएम) आधुनिकीकरणाचे कामही गतीने होईल, असेही वैष्णव म्हणाले.

शुभमन गिल भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरणार का?

 • भारताचा सलामीवीर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. गेल्या काही काळात क्रिकेटच्या सर्व प्रकारांत त्याने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी तो निर्णायक खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याच्याकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जाते आहे. गिलचे योगदान का महत्त्वाचे ठरते आहे आणि त्याचा संघाला कसा फायदा झाला आहे, याचा आढावा.
 • ट्वेन्टी-२० मधील शतकामुळे गिलने कोणते विक्रम रचले? 
  न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यातील नाबाद १२६ धावांच्या खेळीत गिलने अनेक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यातील भारतीय फलंदाजाची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या (नाबाद १२२) नावे होता. तसेच गिलच्या नाबाद १२६ धावा ही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फलंदाजांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी २०१२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेवीने नाबाद ११७ धावांची खेळी केली होती. गिल हा भारतासाठी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वांत युवा (२३ वर्षे आणि १४६ दिवस) खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैनाचा (२३ वर्षे व १५६ दिवस) विक्रम मोडित काढला.
 • गेल्या काही काळात गिलची तिन्ही प्रकारांतील कामगिरी कशी राहिली? 
  न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलने १४९ चेंडूंत २०८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय लढतीत त्याने ७८ चेंडूंत ११२ धावा केल्या. त्यापूर्वी, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूंत ११६ धावांची खेळी केली. आता ट्वेन्टी-२० सामन्यातही त्याने शतक झळकावत संघासाठी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातही त्याने १५२ चेंडूंत ११० धावा केल्या होत्या. त्यापूर्वी, ऑगस्टमध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ९७ चेंडूंत १३० धावांची खेळी केली. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक झळकावणारा गिल हा भारताचा पाचवा आणि जगातील २१वा फलंदाज आहे. तसेच तिन्ही प्रकारांत शतकी खेळी करणारा तो जगातील दुसरा सर्वांत युवा फलंदाज आहे. गिलपूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद शेहजादने २२ वर्ष आणि १२७ दिवस वय असताना ही कामगिरी केली होती.

04 फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.