मुंबई : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचा दावा खोटा ठरवत आयुक्त इकबालसिंह चहल यांनी महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प बुधवारी जाहीर केला. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा ३९,०३८.८३ कोटींचा व ११.५१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना आयुक्तांनी सादर केला.
यामध्ये कोणतीही नवीन करवाढ प्रस्तावित नसून आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. यासाठी दोन हजार कोटी बचतीतून तर अंतर्गत कर्जातून ५८७६ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे संकल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
कोविडकाळात महापालिकेच्या उत्पन्नात घट आणि आरोग्याचा खर्च वाढल्याने अर्थसंकल्पावर त्याचा मोठा परिणाम होईल, असे अंदाज व्यक्त होत होते. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात आकड्यांचा मोठा खेळ करण्यात आला आहे.
सन २०२०-२१ मध्ये ३३ हजार ४४१ कोटींच्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात १६.७४ कोटींची वाढ करण्यात आली आहे. मात्र कोविडमुळे पालिकेच्या उत्पन्नात पाच हजार ८७६ कोटी १७ लाख रुपयांची तूट येणार आहे. त्यामुळे आस्थापना खर्चात २० टक्के बचत करून त्याचा वापर प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विकासकामांसाठी तब्बल १८ हजार ७५०.९९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
भारत, अमेरिकेसह जगातील २० देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियाने प्रवेशबंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून २० देशातील प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करत असल्याचे सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी जाहीर केले.
भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान आणि अन्य देशाच्या प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
प्रवेशबंदीच्या या नियमातून राजनैतिक अधिकारी, सौदीचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलत देण्यात आली आहे. सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. सौदी अरेबियात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. ६,४०० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे युव्हेंट्सने इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात इंटर मिलानचा २-१ असा पराभव केला.
लॉटारो मार्टिनेझ याने नवव्या मिनिटालाच इंटर मिलानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रोनाल्डोने २६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर ३५व्या मिनिटाला इंटर मिलानच्या बचावपटूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे रोनाल्डोने दुसरा गोल करत युव्हेंट्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुढील आठवडय़ात होणाऱ्या परतीच्या लढतीत युव्हेंट्सने ही आघाडी कायम राखली तर त्यांना १९ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत नापोली आणि अॅटलांटा यांच्यातील विजेत्याशी लढावे लागेल.
युनायटेडचा सर्वात मोठा विजय - मँचेस्टर युनायटेडने नऊ जणांसह खेळणाऱ्या साऊदम्प्टनचा ९-० असा पराभव करत इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमधील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद केली. अँथनी मार्शलचे दोन गोल तसेच आरोन व्हॅन बिसाका, मार्कस रॅशफोर्ड, इडिन्सन कावानी, स्कॉट मॅकटोमिनाय, ब्रूनो फर्नाडेस आणि डॅनियल जेम्स यांनी विजयात योगदान दिले. यासह युनायटेडने ४४ गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे. मँचेस्टर सिटी गोलफरकाच्या आधारावर अग्रस्थानी आहे.
केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेमध्ये कोणत्याही देशातील सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेलं नाही आहे असं म्हटलं आहे. मात्र त्यावेळी कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांमधील भारतीय वंशाच्या ‘काही प्रेरित’ व्यक्तींनी या कायद्याला विरोध केल्याचंही सरकारने म्हटलं आहे. आयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलीली यांनी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या देशांची यादी असेल तर ती सरकारने जाहीर करावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना ही माहिती सरकारने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं होतं अशी माहिती दिली. मात्र त्रुडो यांच्या या वक्तव्यानंतर भारताने त्यांना भारताच्या अंतर्गत प्रकरणांसंदर्भात अशाप्रकारचे वक्तव्य हे अयोग्य आणि स्वीकार करण्यासारखं नसल्याचं सांगितलं होतं, असंही मुरलीधरन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकन पॉप स्टार रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्याने ज्या दिवशी गोंधळ झाला त्याच दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलं आहे. रिहाना तसेच पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसारख्या व्यक्तींनी केलेले ट्विट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपप्रचार करण्याचा डाव आहे. भारताची आणि भारत सरकारची बदनामी करण्यासाठी हे केलं जात आहे, असा दावा भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी केला. परराष्ट्र मंत्रालयानेही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींसदर्भात स्पष्टीकरण दिलं. या सेलिब्रिटींकडून केली जाणारी वक्तव्य ही योग्य आणि जबाबदार नाहीत, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.