विश्वनाथन आनंद याच्यानंतर पेंटाल्या हरिकृष्ण याने भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून गेली अनेक वर्षे मान पटकावला होता. पण नाशिकचा युवा ग्रँडमास्टर विदीत गुजराथी याने हरिकृष्णला मागे टाकत दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे.
अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार, विदीतने २७२१ एलो रेटिंग गुणांसह भारतीयांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. पाच वेळचा जगज्जेता आनंद २७५५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. हरिकृष्णला २७१३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत जगज्जेता मॅग्नस कार्लसन अग्रस्थानी विराजमान आहे. तर आनंद १५व्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’चा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार पटकावणाऱ्या विदीतने २०१९मध्ये खेळलेल्या ७५ क्लासिकल सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत २६९५वरून २७२१ एलो रेटिंग गुणांवर झेप घेतली आहे.
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आला आहे. या प्रकरणी एनआयएने आज नव्याने एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये एकूण 11 जणांची नावं असून त्यापैकी नऊजण तुरुंगात आहेत. या सर्वजणांवर दहशतवाद विरोधी कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र नव्या एफआयआरमध्ये संशयितांविरोधात देशद्रोहाचं कलम नाही. एनआयएने गुरुवारी कोर्टात अर्ज फाईल केला होता. हे प्रकरण मुंबईत वर्ग करण्यात यावं अशी मागणी या अर्जात करण्यात आली होती.
एल्गार परिषद प्रकरणातील नऊ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, वर्णन गॉन्साल्वीस, सुधीर ढवळे, रोना विल्सन, अरुण फरेरा, सुधा भारतद्वाज आणि वरवरा राव यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान एनआयएने केलेल्या अर्जाची प्रत आरोपींना मिळाली नसल्याने आरोपींच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढील तारीख मागितली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. एनआयने जी एफआयआर दाखल केली आहेत त्यामध्ये देशद्रोहाचं कलम नाही हे दिसून येतं आहे. मात्र पोलिसांकडून संपूर्ण कागदपत्रं दिलेली नाही. त्यामुळे काय काय गुन्हे दाखल केले गेले होते त्याची कल्पना नसल्याने सुरुवातीला हे कलम लावण्यात आलेले नाही. UAPA चे सगळे चार्जेस लावण्यात आले आहेत. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणाचा संदर्भही जोडण्यात आला आहे असंही सरकारी वकील एस. डी. पाटील यांन ीसांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाबळेश्वरची भेट ही पर्यटनस्थळाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. ठाकरे यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी महाबळेश्वर, त्याचे जंगल, त्या अनुषंगाने बफर झोन, व्याघ्र प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन आदींमुळे पर्यटनवाढीला येणाऱ्या मर्यादा, त्यावर करता येऊ शकतील अशा शासकीय उपाययोजनांची माहिती घेतली.
महाबळेश्वर आणि पांचगणी हे पर्यटन स्थळ म्हणजे राज्याची संपत्ती आहे. येथील जे विकास प्रकल्प आहेत, त्यांचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवावेत, दोन्ही पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे. त्या प्रकल्पांना थेट मंत्रालयातून मान्यता देण्यात येणार आह. महाबळेश्वर आणि पांचगणी परिसरातील जंगल हे स्थानिकांनी वाचविले आहे.
जंगलाच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे अभिवचन त्यांनी स्थानिकांना दिले. महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे. या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. उत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पादन वाढेल, तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरीचे पीक घेता येऊ शकेल.
राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे. यासाठी महाबळेश्वर येथे एक संशोधन केंद्र सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी मान्य करत तसा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. यापूर्वी त्यांनी महाबळेश्वर पांचगणी या पर्यटन स्थळांच्या प्रश्नांची माहिती घेतली.
स्थायी खाते क्रमांक (पॅन) ‘आधार’शी संलग्न करण्याची तारीख वाढवण्यात आली असतानाच, सरकारने ३० कोटीहून अधिक ‘पॅन’ युनिक आयडेंटिफिकेशन कोडशी संलग्न केले आहेत, अशी माहिती अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी संसदेत दिली. २७ जानेवारी २०२० पर्यंत एकूण ३० कोटी ७५ लाख २ हजार ८२४ पॅन क्रमांक आधारशी जोडले गेले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
सरकारने आधार- पॅन जोडणीची मुदत वाढवली आहे काय, या प्रश्नाला ठाकूर यांनी होकारार्थी उत्तर दिले. पॅन- आधार संलग्न करण्याची अखेरची तारीख ३१ डिसेंबर २०१९ वरून ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
२७ जानेवारी २०२० च्या आकडेवारीनुसार, एकूण १७,५८,०३,६१७ पॅन क्रमांक आधारला जोडण्यात आलेले नाहीत. त्यासाठीची मुदत वाढवण्यात आल्यामुळे, पॅन कार्डधारकांना जोडणीसाठी जादा वेळ मिळणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले. संवेदनशील माहिती हाताळणाऱ्या यंत्रणांकडून ती फुटू नये म्हणून युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूएडीएआय) ने या संदर्भात ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत असल्याचे ठाकूर म्हणाले.
माहितीची गोपनीयता राखली जावी म्हणून, प्राप्तिकर कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि इतर संबंधित कायद्यान्वये योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.