चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ डिसेंबर २०२१

Date : 4 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये - शिवसेना :
  • देशात भाजपासमोर यूपीएशिवाय नवी विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यातून त्याचा ‘शुभारंभ’ झाल्याचं देखील बोललं जात आहे.

  • खुद्द शरद पवारांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे आणि पवारांसमोरच ममतादीदींनी “देशात यूपीए अस्तित्वात नाही”, असं विधान केल्यामुळे त्याला दुजोराच मिळाला आहे. पण शिवसेनेने मात्र काँग्रेसच्याच नेतृत्वाखालील यूपीएचं जोरदार समर्थन केलं आहे. सामनामधील अग्रलेखातून काँग्रेसला वगळून नवीन आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

  • देशात यूपीएला वगळून दुसरी आघाडी उभी करणं म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखंच असल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आली आहे.

  • “मोदींच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कुणाकुणाला मान्य नाही, त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत. पडद्यामागून गुटरगूं करू नये”, असं शिवसेनेकडून सुनावण्यात आलं आहे.

पुस्तक विक्रीला ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून मान्यतेबाबत सरकारने विचार करावा :
  • पुस्तक विक्री ही ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून मान्य करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना राज्य व केंद्र सरकारने याचिकाकत्र्यांच्या मागणीचा विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. गिरीश पटेल व न्या. माधव जामदार यांनी दिले.

  • नाशिकमध्ये साहित्य पंढरीचा मेळा भरला असताना न्यायालयाने दिलेल्या या सूचनांची अंमलबजावणी होऊन, पुस्तक विक्री टाळेबंदीसारख्या काळात निर्बंधमुक्त होईल, अशी अपेक्षा प्रकाशक व विक्रेत्यांमध्ये व्यक्त होत आहे.

  • मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत याविषयीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केला होती. यात केंद्र सरकारचे ग्राहक मंत्रालय व राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

  • शिक्षण हा जर मूलभूत हक्क आहे तर, ज्या पुस्तकांच्या माध्यमातून आपण शिक्षणाचा हक्क प्रत्यक्षात बजावतो ती पुस्तके विकणे हा आवश्यक सेवेचा भाग समजला गेला पाहिजे. परंतु कोविड टाळेबंदी काळात पुस्तक-विक्रीसुद्धा बंद करण्यात आली होती. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या मराठी प्रकाशन व्यवसायास प्रचंड फटका बसला. वाचनसंस्कृती, वाचकांचे अभिव्यक्ती स्वातंर्त्य धोक्यात आले, असे मत याचिकेतून मांडल्याचे मराठी प्रकाशन परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे व मनोविकास प्रकाशनचे अरिवद पाटकर यांनी सांगितले.

ओमायक्रॉनच्या संकटामुळे गुगलने घेतला मोठा निर्णय; वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाबाबत दिली महत्त्वाची माहिती :
  • जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या करोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे गुगलने १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.

  • अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने गुरुवारी सांगितले की, करोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे जागतिक स्तरावर धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल.

  • गुगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते की नवीन वर्षात १० जानेवारीपासून आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करणार आहोत. त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल.

  • गुरुवारी गुगलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ऑफिस टू रिटर्न प्लॅन लागू केला जाणार नाही. पुढील परिस्थिती पाहूनच कार्यालयात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतला जाईल.

४० वर्षांपुढील नागरिकांना वर्धक मात्रेची शिफारस - ‘ओमायक्रॉन’च्या धोक्यामुळे निर्णय :
  • चाळीस आणि त्यापुढील वयाच्या लोकांना करोना लशीची एक वर्धक मात्रा (बुस्टर डोस) देण्याची शिफारस देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी केली आहे.  

  • जनुकीय क्रमनिर्धारण करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूने (आयएनएसएसीओजी) आपल्या २९ नोव्हेंबरच्या साप्ताहिक वार्तापत्रात या बाबत स्पष्टीकरण केले आहे. अधिक जोखीम आणि संसर्गाचा धोका असलेल्यांना प्राधान्य देत ४० वर्षांवरील नागरिकांना करोना लशीची वर्धक मात्रा देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

  • करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ‘ओमायक्रॉन’च्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर करोनाची वर्धक मात्रा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच लोकसभेतही करोना साथीच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करताना अनेक खासदारांनी वर्धक मात्रा देण्याची मागणी केली होती.

  • सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना सक्षम करण्यासाठी ‘ओमायक्रॉन’ या नव्या करोना विषाणूचे अस्तित्व निश्चित करणे महत्त्वाचे आहे, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ‘ओमायक्रॉन’चे बाधित आढळलेल्या जोखमीच्या देशांतून येणाऱ्या आणि तेथे जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याबरोबरच बाधित देशांतून येणाऱ्या करोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणेही आवश्यक असल्याचेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा - भारत विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयशी :
  • भारताला हॉकीमधील कनिष्ठ गटाचे विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयश आले. उपांत्य फेरीत सहा वेळा विश्वविजेत्या जर्मनीकडून भारताने २-४ अशा फरकाने पराभव पत्करला. त्यामुळे रविवारी कांस्यपदकासाठी भारताची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे, तर विजेतेपदासाठी जर्मनी आणि अर्जेटिना यांच्यात सामना होईल.

  • लखनऊ येथे २०१६ मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारताचा जर्मनीपुढे निभाव लागला नाही. जर्मनीकडून ईरिक क्लिनलिन (१५व्या मि.), आरोन फ्लॅटन (२१व्या मि.), कर्णधार हॅनीस म्युलर (२४व्या मि.) आणि ख्रिस्टोफर कुटर (२५व्या मि.) यांनी गोल साकारले. भारताकडून उत्तम सिंग (२५व्या मि.) आणि बॉबी सिंग धामी (६०व्या मि.) यांनी गोल केले.

  • उपांत्यपूर्व फेरीमध्ये बेल्जियमविरुद्ध दिलेली लढत वाखाणण्याजोगी होती, परंतु तो कित्ता भारताला जर्मनीविरुद्ध गिरवता आला नाही.  

  • जर्मनीने मध्यांतरालाच ४-१ अशी आघाडी घेऊन भारतावर दडपण आणले. तिसऱ्या सत्रात भारताने गोल करण्यासाठी काही उत्तम प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. सामना संपायला काही सेकंदांचा अवधी असतना धामीने भारताच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला.

‘बीसीसीआय’च्या वार्षिक सभेत आफ्रिका दौऱ्याचा निर्णय :
  • ‘ओमायक्रोन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तनाचा धोका वाढत असल्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा निर्णय शनिवारी होणाऱ्या ९०व्या वार्षिक  सर्वसाधारण सभेत घेतला जाण्याची शक्यता आहे. सभेच्या २४ मुद्दय़ांच्या विषयपत्रिकेमध्ये भविष्यातील दौऱ्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवरही चर्चा होणार आहे.

  • दक्षिण आफ्रिकेच्या नियोजित दौऱ्याला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून, या दौऱ्यातील दोन कसोटी सामने जोहान्सबर्गला आहेत. परंतु ‘ओमायक्रोन’च्या विषाणू संसर्गामुळे आफ्रिकेमधील स्थिती गंभीर आहे.

  • भारतीय संघ ९ डिसेंबरला मुंबईहून जोहान्सबर्गला रवाना होणार होता. परंतु दौऱ्याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. भारतीय संघ आफ्रिकेत तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.

०४ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.