चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ ऑगस्ट २०२१

Updated On : Aug 04, 2021 | Category : Current Affairs


भारताला हार्पून क्षेपणास्त्र संच विक्रीस अमेरिकेची मंजुरी :
 • भारताला ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’म्हणजे जेसीटीएस यंत्रणा  विकण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. या संचाची किंमत ८.२ कोटी डॉलर्स असून त्यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय सामरिक संबंध सुधारणार असून हिंद प्रशांत क्षेत्रात भारत हा प्रमुख संरक्षण भागीदार ठरणार आहे.

 • पेंटॅगॉनच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने  हा संच भारताला देण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर आता त्याबाबतची अधिसूचना अमेरिकी काँग्रेसमध्ये मंजूर केली जाणार आहे. हार्पून ही जहाज विरोधी क्षेपणास्त्र संच मालिका आहे. भारत सरकारने ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’ची मागणी अमेरिकेकडे केली होती. त्यात हार्पून क्षेपणास्त्रच्या सुटय़ा भागांची निगा व दुरुस्ती यासाठी एक केंद्र उभारले जाणार आहे. यात तांत्रिक माहिती व प्रशिक्षण या बाबींचाही समावेश आहे.

 • प्रस्तावित क्षेपणास्त्र संच विक्रीने अमेरिका व भारत यांच्यातील परराष्ट्र धोरण योजना व राष्ट्रीय सुरक्षा यांना बळ मिळणार आहे. राजकीय स्थिरता, शांतता व आर्थिक प्रगती यांना यातून प्राधान्य मिळेल असे डीएससीए या पेंटॅगॉनच्या संस्थेने म्हटले आहे.

 • पंतप्रधान मोदी  यांनी जून २०१६ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती त्यावेळी अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती. त्यात संरक्षण तंत्रज्ञानाचाही समावेश होता. सदर हार्पून संचाच्या विक्रीने भारताची संरक्षण क्षमता अधिक वाढणार असून  त्यात हार्पून क्षेपणास्त्रांची देखभाल करणे सोपे जाणार आहे. यातून मूळ प्रादेशिक लष्करी समतोल ढळणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.

भारतीय- अमेरिकी मुलगी जगात सर्वात हुशार विद्यार्थिनी :
 • भारतीय -अमेरिकी मुलगी नताशा पेरी  अमेरिकी विद्यापीठाच्या सॅट व अ‍ॅक्ट या प्रमाणित चाचण्यांमध्ये चमकली असून ती सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली. तिचे वय अवघे अकरा वर्षे आहे.

 • स्कोलेस्टिक असेसमेंट टेस्ट व अमेरिकन कॉलेज टेस्टिंग म्हणझे सॅट व अ‍ॅक्ट या परीक्षांचा उद्देश हा मुलांना महाविद्यालयात प्रवेश देण्याची निवड चाचणी हा आहे. काही कंपन्याही या परीक्षांतील गुणांवरून संबंधित हुशार विद्यार्थ्यांंना काम देऊ शकतात. स्वयंसेवी संस्थाही त्यांच्या हुशारीचा उपयोग करून घेऊ शकतात.

 • महाविद्यालयात प्रवेशासाठी सॅट किंवा अ‍ॅक्ट या परीक्षा द्याव्या लागतात. त्यातील गुण हे विद्यापीठातील प्रवेशासाठीही ग्रा धरले जातात. पेरी ही न्यूजर्सीतील  थेलमा एल, स्टँडमियर एलेमेंटरी स्कूलची विद्यार्थिनी असून तिने सॅट, अ‍ॅक्ट व हॉपकिन्स विद्यापीठाच्या सीटीवाय परीक्षेत प्रावीण्य मिळवले आहे.

 • ८४ देशांतील १९ हजार विद्यार्थ्यांंनी सीटीवाय परीक्षा दिली होती. २०२१ मध्ये पेरी हिने जॉन हॉपकिन्स टॅलेंट सर्च चाचणी दिली होती त्यावेळी ती पाचवीत होती. पेरी हिने सांगितले की, जे आर आर टोलकिन यांच्या कादंबऱ्या तिने वाचल्या होत्या. तसेच तिला वाचनाची आवड आहे.

Maharashtra HSC Result 2021 : आता प्रवेशाची परीक्षा :
 • अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीपाठोपाठ बारावीचाही निकाल घसघशीत लागला. राज्याचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के  लागला असून, ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. या फुगलेल्या निकालाने राज्यातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या गोंधळाची पायाभरणी केल्याचे दिसत असून, अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.

 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली असून, १३ लाख १४ हजार ९६५ नियमित विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांच्या उंबऱ्यावर प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले असून, ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर साधारण २६ हजार ३०० खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.

 • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या (९१ हजार ४२०)अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांच्या अटीतटीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे (पान ९ वर) (पान १ वरून) लागणार आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.

‘सीबीएसई’ दहावीचा राज्यातील निकाल ९९.९२ टक्के :
 • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल ९९.९२ टक्के आहे. या मंडळाचे राज्यातील ८२ हजार ५०४ विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. देशाचा निकाल ९९.०४ टक्के लागला.

 • सीबीएसईची परीक्षाही यंदा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनानुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील ८२ हजार ५६९ विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने जाहीर केला असून त्यातील ८२ हजार ५०४ म्हणजेच ९९.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 • राष्ट्रीय पातळीवरील निकाल ९९.०४ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेरपरीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ६३६ आहे.

 • देशभरातील १६ विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेसाठी २१ लाख ५० हजार६०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २० लाख ९७ हजार १२८ विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाने जाहीर केला. १६ हजार ६३९ विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. साधारण १ हजार ६० शाळांच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार; मोदींचे ‘खास पाहुणे’ म्हणून लावणार उपस्थिती :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.

 • स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

 • समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. “१५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट गेणार आहेत तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत,” असं एएनआयने म्हटलं आहे.

 • तसेच लाल किल्ल्यावरील सत्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या ठिकाणी ते खेळाडूंशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

०४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)