चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ ऑगस्ट २०२०

Date : 4 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राम मंदिर भूमिपूजन - असा असेल पंतप्रधानांचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त उद्या (बुधवार) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. दरम्यान, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचं पालनही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

  • ५ ऑगस्ट सकाळी ९,३५ वाजता दिल्लीतून प्रस्थान
  • १०.३५ वाजता लखनौ विमानतळावर लँडिंग
  • १०.४० वाजता अयोध्येसाठी हेलिकॉप्टरमधून प्रस्थान
  • ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग
  • ११.४० हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा
  • १२.०० राम जन्मभूमी परिसरात पोहोचण्याचा कार्यक्रम
  • १२,१५ वाजता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
  • १२.३० वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम
  • १२.४० राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम
  • १४.०५ वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडसाठी प्रस्थान
  • १४.२० वाजता लखनौसाठी प्रस्थान
  • लखनौ वरून दिल्लीसाठी रवाना
‘कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याची संधी भारताला द्या’ :
  • पाकिस्तानातील एका लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याकरिता भारताला आणखी एक संधी द्यावी, असा आदेश इस्लामबाद उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्याचे पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

  • जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पाकिस्तानने ‘परिणामकारक आढावा घेऊन फेरविचार करावा’, असा आदेश हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) जुलै २०१९ मध्ये दिला होता.

  • जाधव यांच्याकरिता वकील नेमण्याबाबत पाकिस्तान सरकारने केलेल्या याचिकेची मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला व न्या. मियाँगुल हसन औरंगजेब यांनी सुनावणी केली. आयसीजेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत आपली जबाबदारी पूर्ण करता यावी म्हणून जाधव यांच्यासाठी वकील नेमावा, अशी विनंती सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयाला केली.

  • लष्करी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका करण्यास किंवा त्यासाठी अर्ज करण्यास जाधव यांनी नकार दिल्याचा दावाही सरकारने केला. फेरविचार याचिकेबाबतच्या निर्णयाबद्दल भारत सरकार किंवा जाधव यांनी पुन्हा विचार करावा, तसेच वकील नेमण्यासाठी भारताला एक संधी दिली जायला हवी, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. त्यावर, या संदर्भात आम्ही परराष्ट्र कार्यालयामार्फत भारताशी संपर्क साधू, असे अ‍ॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी सांगितले.

इंटरनेट नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून वंचित :
  • पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने  बारावी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकियेत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • परीक्षा मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने उत्तीर्ण विद्यार्थी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व अर्ज भरण्याची धडपड करीत आहेत. ही मुदत आज संपत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मोखाडा,जव्हार, तलासरी, विक्रमगड अशा ग्रामीण भागांत इंटरनेटसह ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मुदतीत हे अर्ज भरले गेले नाहीत तर या सुविधेअभावी काही विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून दूर राहतील अशी भीती व्यक्त होत आहे. प्रवेश प्रक्रियेची ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी होत आहे.

  • विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व प्रक्रिया अवलंबताना त्यांच्या जवळ स्वत:चा ईमेल आयडी व मोबाइल क्रमांक असणे अनिवार्य आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने प्रवेशपूर्व अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीणबहुल भागात इंटरनेट व ऑनलाइन सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे किंवा खासगी इंटरनेट सुविधा केंद्रांमध्ये जावे लागते.

  • आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाहीत तर करोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी केंद्रे बंद आहेत. परिणामी हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत.असे असताना प्रवेशपूर्व अर्ज भरायचा कोठून असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. तर काही विद्यार्थी मित्र-मैत्रिणींकडून अर्ज भरून घेताना दिसत आहेत. महाविद्यालये स्वत: अशा वंचित विद्यार्थ्यांना संपर्कात आणण्यासाठी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मदत कक्ष स्थापन केले असल्याचे समजते.

द्रविड ‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाचा प्रमुख :
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोव्हिड कृती दलाची स्थापना केली असून त्यामध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे. द्रविडकडे कोव्हिड कृती दलाचा प्रमुख म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

  • खेळाडूंनी ‘एनसीए’मध्ये सरावाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची करोना चाचणी घेण्यात येणार आहे तसेच त्यांना सरावादरम्यान कोणती काळजी घ्यायची आहे याची सूचना देण्याची जबाबदारी या कृती दलाकडे आहे. ‘एनसीए’चा प्रमुख म्हणून द्रविडसह वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांचा समावेश आहे.  सरावाच्या दिवशी दररोज सकाळी खेळाडूंचे शरीराचे तापमानही तपासण्यात येणार आहे. जर एखादा खेळाडूमध्ये सरावादरम्यान करोनाची लक्षणे आढळली, तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येणार आहे.

  • क्रिकेट साहित्याच्या पुरस्कर्त्यांसाठी निविदा‘ - बीसीसीआय’ने भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्यासाठी पुरस्कर्त्यांकरता निविदा मागवल्या आहेत. ‘नायके’ हे सध्याचे ‘बीसीसीआय’चे क्रिकेट साहित्यासंदर्भातील पुरस्कर्ते आहेत. गेल्या चार वर्षांपासून ‘नायके’ पुरस्कर्ते असून त्यांचा ‘बीसीसीआय’शी असणारा करार पुढील महिन्यात संपत आहे.

०४ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.