चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ एप्रिल २०२२

Date : 4 April, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मियामी खुली टेनिस स्पर्धा - श्वीऑनटेक महिला एकेरीत अजिंक्य :
  • पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवले. तिने अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाला ६-४, ६-० असे सरळ गेममध्ये पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.

  • या विजयानंतर श्वीऑनटेक सोमवारी अॅखश्ले बार्टीला मागे टाकत महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेईल. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या बार्टीने गेल्या महिन्यात टेनिसमधून निवृत्ती घेतली.

  • मियामी स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीत २० वर्षीय श्वीऑनटेकने पहिल्या सेटमध्ये ओसाकाची सव्‍‌र्हिस मोडीत काढत ३-२ अशी आघाडी घेतली. मग चांगला खेळ सुरू ठेवत पहिला सेट ५२ मिनिटांत ६-४ असा आपल्या नावे केला.

  • ओसाकाने पहिल्या सेटमध्ये श्वीऑनटेकला आव्हान दिले. मात्र, दुसऱ्या सेट ओसाकाने निराशाजनक खेळ केला. श्वीऑनटेकने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर ओसाकाला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही आणि दुसरा सेट ६-० असा मोठय़ा फरकाने जिंकत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. श्वीऑनटेकचे २०२२ मधील हे तिसरे जेतेपद ठरले आहे.

महात्मा गांधींच्या नात सुमित्रा गांधींच्या हस्ते मोदींच्या जीवनावर आधारित ‘मोदी स्टोरी’ पोर्टल लाँच :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मोदी स्टोरी’ नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलंय. यामध्ये मोदींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या जीवनातील गोष्टींचा समावेश असेल. ‘मोदी स्टोरी’ हे पोर्टल आज रविवारी लाँच करण्यात आलंय.

  • मोदी स्टोरी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, “मोदी स्टोरी पोर्टलची घोषणा हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत नरेंद्र मोदींच्या जीवनाशी संबंधित रंजक कथा सांगितल्या जातील. नरेंद्र मोदींना जवळून पाहिलेल्या व्यक्तींकडून मोदींचे किस्से त्यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी एकत्र आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. कोणीही व्हिडिओ, ऑडिओ किंवा मजकूराच्या स्वरूपात यामध्ये योगदान देऊ शकते,” असे त्यात म्हटले आहे. महात्मा गांधींच्या नात सुमित्रा गांधी कुलकर्णी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

  • “नव्या भारताची निर्मिती ही सामान्य लोकांच्या एकत्र येण्याची कहाणी आहे, महानतेची आकांक्षा बाळगून, ‘आम्ही लोक’ या भावनेने… असे अनेक लोक आहेत, ज्यांनी मोदींच्या जीवनाची, त्यांच्या हेतूची झलक पाहिली आहे. मोदी स्टोरी अशा आवाजांबद्दल आहे,” असं पोर्टलच्या बायोमध्ये म्हटलंय.

  • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग, अभिनेता आणि राजकारणी मनोज तिवारी, माजी वित्त सचिव हसमुख अधिया आणि अध्यात्मिक नेते स्वामी अवधेशानंद गिरी यांच्यासह अनेक व्यक्तींनी या कथासंग्रहात योगदान दिले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार; पाच वर्षांत उलाढाल ५००० कोटी डॉलरवर नेण्याचे लक्ष्य :
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापारविषयक करारावर शनिवारी उभय बाजूने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांसाठी हा करार अत्यंत लाभदायक असल्याचा दावा करण्यात येत असून भारतातून निर्यात होणाऱ्या ९६ टक्के वस्तूंवर आता ऑस्ट्रेलियात शुन्य करआकारणी होईल. यात अभियांत्रिकी वस्तू, दागिने आणि जडजवाहिर, वस्त्रे, चामडय़ाच्या वस्तू आदींचा समावेश आहे.

  • यातून दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवा पुरवठादारांना उत्तेजन मिळणार आहे. पाच वर्षांत ही उलाढाल ४५०० ते ५००० कोटी डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. सध्या ही उलाढाल २७०० कोटी डॉलर इतकी आहे. यातून भारतात १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. या करारानुसार आयातशुल्क माफीची योजना पाच वर्षांत शंभर टक्के भारतीय वस्तूंना लागू केली जाणार आहे.

  • गेल्या दशकभरात प्रमुख विकसित देशाबरोबर भारताने केलेला हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे. भारताचे व्यापार आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॅन टेहनन यांनी एका आभासी समारंभात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन उपस्थित होते.

आकाशातून पडलेले ‘ते’ ‘इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर’चे अवशेष :
  • सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे आकाशातून पडलेली लोखंडी शिंग, पवनपार, गुंजेवाही येथे मिळालेला गोलाकार अवशेष तथा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे मिळालेले सिलेंडरच्या आकाराचे अवशेष न्यूझीलंडच्या ‘ब्लॅक स्काय’ उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाणारे ‘इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर’चे अवशेष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सिंदेवाही तथा समुद्रपूर पोलिसांनी अवशेष ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

  • दरम्यान, रॉकेटच्या तुकडय़ांच्या तपासणीसाठी तज्ज्ञांची पाच सदस्यांचे पथक तयार करणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. शनिवार, २ एप्रिलचे संध्याकाळी ७.४५ वाजता आकाशातून मोठय़ा आकाराचे आगीचे गोळे पडताना पाहिले. या उल्का पडल्या असाव्या असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र न्यूझीलंड देशाचे ‘ब्लँक स्काय’ नावाचा उपग्रह संध्याकाळी ६.१०ला सोडण्यात आला होता. ती वेळ आणि मार्ग पाहता हे त्याच रॉकेटचे तुकडे असावेत, असा अंदाज आहे.

  • चीनचे सुद्धा एक रॉकेट पडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्याची शक्यता वाटत नाही. पडलेल्या अवकाशीय वस्तूंची पाहणी केली असता लाडबोरी येथे पडलेला रॉकेटचा बाह्य पत्रा आणि पवनपारजवळ एक गोल आकाराचा हायड्रोजन स्पिअर हा इंधन दाब नियंत्रण करणारी गोल सिलिंडर आढळले. अजूनही काही वस्तू परिसरात आढळण्याची शक्यता आहे.

  • निरीक्षणावरून या अवकाशीय वस्तू उपग्रहाच्या रॉकेटचीच असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही गोल शिंग १० बाय १० फूट व्यास, ८ इंच रुंद आणि ४० किलोची आहे. तर दुसरी गोल वस्तू रॉकेटचाच एक भाग असून ती दोन फूट व्यासाची आढळली. लाडबोरी येथे लोखंडी शिंग पडताना गावातील नऊ जणांच्या समूहाला सर्वप्रथम दिसली.

कोव्हॅक्सिनच्या पुरवठय़ास ‘डब्ल्यूएचओ’ची स्थगिती :
  • लस उत्पादन प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यानंतर भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लशीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या खरेदीदार संस्थांच्या माध्यमातून अनेक देशांना या लशीचा पुरवठा करण्यात येत होता. तो आता स्थगित करण्यात आला आहे.

  • ज्या देशांना कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा मिळाल्या आहेत त्यांनी वापराबद्दल योग्य तो निर्णय घेण्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरासाठी १४ ते २२ मार्चदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीतील निष्कर्षांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या लशीच्या उत्पादन पद्धतीच्या गुणवत्तेत काही त्रुटी आढळल्याने उत्पादनप्रक्रिया आणि साधनसुविधा अद्ययावत करण्याची गरजही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

  • आमच्याकडील उपलब्ध माहितीनुसार ही लस प्रभावी आहे. तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतेही प्रश्नचिन्ह नाही. या लशीचे जोखीम मूल्यांकन केले असले तरी जोखीम आणि लाभ यांच्या गुणोत्तरात कोणताही बदल आढळलेला नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

  • भारत बायोटेकने १ एप्रिलला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात काही काळासाठी घट करीत असल्याचे जाहीर केले होते.

०४ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.